अभिषेक तेली
नाटयवर्तुळात चर्चेची ठरलेली, महाराष्ट्रातील तमाम युवा वर्गाला जोडणारी आणि त्यांना कलाक्षेत्रातील व्यावसायिक संधींची कवाडे खुली करून देणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचा उत्साहपूर्ण जागर हा गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, नाशिक, नागपूर या आठही केंद्रांवरील स्पर्धा प्राथमिक फेरीपासूनच उत्तरोत्तर चुरशीची होत गेली. त्यामुळे दर्जेदार एकांकिकांच्या संचातून सर्वोत्तम एकांकिकांची निवड करताना परीक्षकांचाही कस लागला. परीक्षकांच्या नजरेतून उत्तम ठरलेल्या आणि प्राथमिक तसेच विभागीय अंतिम फेरीतून तावून सुलाखून बाहेर पडलेल्या आठ विभागांच्या आठ सर्वोत्तम एकांकिकांमध्ये महाराष्ट्राची ‘लोकांकिका’ हा बहुमान मिळवण्यासाठी अंतिम लढत होणार आहे.
हेही वाचा >>> वझे महाविद्यालयाची ‘एकूण पट- १’ महाअंतिम फेरीत
दिग्गज लेखकांच्या कथांवर आधारित, कल्पक विचारांची भरारी घेत रचलेली काल्पनिक गोष्ट, गावखेडय़ातील समस्यांपासून ते आजच्या आधुनिक युगात भेडसावणाऱ्या विषयांपर्यंत वैविध्यपूर्ण विषयांवरील एकांकिका विद्यार्थिदशेतील तरुण रंगकर्मीनी सादर केल्या. काही एकांकिकांमधून स्थानिक प्रश्नांना वाचा फोडण्यात आली. त्यासाठी त्या त्या प्रांतातील बोलीभाषेचा केलेला वापरही वैशिष्टय़पूर्ण ठरला. काही एकांकिकांनी मनाचा ठाव घेत प्रेक्षकांना विचार पडण्यास भाग पाडले, तर काही एकांकिकांनी खळखळून हसवण्याचे कामही केले. राज्यातील विविध भागातील महाविद्यालयीन तरुण भवताली घडणाऱ्या घटनांचा किती सखोलपणे विचार करतात, त्यावर परखडपणे भाष्य करतात वा आपल्या नाटय़कृतीतून एखादा नवाच विचार समोर ठेवतात हे या स्पर्धेतील एकांकिकांवरून ठळकपणे जाणवले. एकांकिका म्हणजे केवळ मंचावरचे सादरीकरण नव्हे, त्यासाठी उत्कृष्ट संहिता हवी, दिग्दर्शन हवे, नेपथ्य-प्रकाशयोजना या सगळयाचा एकत्रित विचार हवा. या सगळयाचे भान राखत केलेले एकांकिकांचे सादरीकरण हा अनुभवच वेगळा.. ‘लोकसत्ता लोकांकिका’ या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या निमित्ताने हा सर्जनशील नाटय़ाविष्कार सध्या महाविद्यालयीन तरुणाईला अनुभवायला मिळतो. यंदाची ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा आता अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. आत्तापर्यंत जे जे सर्वोत्तम ठरले आहेत त्यांची आता महाअंतिम फेरीत जिंकण्यासाठीची लगबग, धडपड सुरू झाली आहे. आपली स्पर्धा नेमकी कशी असेल? आपल्याला सादरीकरणात कोणत्या सुधारणा करायच्या आहेत याची पुरेशी जाणीव आठ महाविद्यालयांच्या नाटय़कर्मी संघांना झाली आहे. त्यामुळे आता नाटय़प्रेमी प्रेक्षकांची गर्दी, कलाकारांची मांदियाळी आणि एकांकिका सादर करण्यासाठी उत्सुक असलेल्या तरुण रंगकर्मीचा एकच जल्लोष असा एकांकिकामय माहौल शनिवार, १६ डिसेंबर २०२३ रोजी माटुंगा येथील यशवंत नाटयगृहात होणाऱ्या लोकसत्ता लोकांकिका महाअंतिम सोहळयात अनुभवायला मिळणार आहे.