प्रत्येक कलाकार त्याच्या कारकीर्दीमध्ये एका अशा आव्हानात्मक भूमिकेच्या शोधात असतो, ज्यामध्ये त्याचा एक अभिनेता म्हणून कस लागेल. ज्याक्षणी त्याला ती भूमिका मिळते, तेव्हा तिचं सोनं करण्यासाठी जिवाचं रान करतो. ‘बाजी’ चित्रपटाच्या बाबतीत आणि त्यातील आपल्या भूमिकेबद्दल असेच काहीसे झाल्याचे श्रेयस तळपदे सांगतो. मराठी मालिका आणि चित्रपटांपासून आपल्या कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या श्रेयसला ‘इक्बाल’ चित्रपट मिळाला आणि त्याचे बॉलीवूडशी नाते जोडले गेले. तब्बल आठ वर्षांनी तो मराठी चित्रपटसृष्टीमध्ये परतत आहे. मध्यंतरी त्याने निर्मितीक्षेत्रामध्ये पाऊल टाकत ‘पोश्टर बॉइज’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. वेगळ्या आशयाच्या या चित्रपटाने प्रेक्षकांसोबत समीक्षकांच्या कौतुकाची थापही मिळवली होती. आता तो ‘बाजी’ चित्रपटाच्या माध्यमातून मराठीतला पहिलावहिला सुपर हिरो घेऊन येत आहे. त्याच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल बोलताना सध्या तो स्वत:मधल्या ‘बाजी’च्या शोधात असल्याचे त्याचे म्हणणे आहे.
‘बाजी’ चित्रपटाचे ट्रेलर पाहिल्यावर पहिल्यांदा श्रेयसचे चित्रपटातील दोन लूक लक्षात येतात. ट्रेलरच्या पहिल्या भागामध्ये गावात राहणारा काहीसा बुजरा तरुण दिसतो, तर दुसऱ्या भागामध्ये गावाच्या रक्षणासाठी सज्ज असलेला रांगडा सुपर हिरो. त्याबद्दल विचारले असता तो म्हणाला, या चित्रपटामध्ये आपल्या एक-दोन नव्हे तर साडेतीन भूमिका आहेत. अर्थात या साडेतीन भूमिकांची मजा उलगडण्यासाठी प्रेक्षकांना चित्रपट पाहावा लागेल. एका गावातील १९-२०वर्षांचा निरागस, गौरीवर मनापासून प्रेम करणारा मुलगा ते बाजी या सुपर हिरो घडेपर्यंत प्रत्येक भूमिकेची शरीरयष्टी, वागण्या-बोलण्याची ढब वेगळी असेल, याची पूर्ण काळजी घेतल्याचे तो सांगतो. अर्थात ‘बाजी’ स्वीकारताना पुन्हा एकदा अॅक्शनपट साकारता येईल की नाही, याबद्दल शंका उपस्थित झाल्या होत्या, पण चित्रपट पाहिल्यावर या शंकांचेही निरसन होण्याची खात्री तो देतो.
चित्रपटातील ‘बाजी’बद्दल सांगताना, ‘बाजी’ ही व्यक्ती नसून ती एक वृत्ती असल्याचे तो सांगतो. त्याची प्रेरणा ‘झॉरो’, ‘फॅन्टम’सारख्या गरिबांच्या मदतीस धावून जाणाऱ्या सुपर हिरोंमध्ये दडल्याचे तो सांगतो. चित्रपट एका काल्पनिक गावात घडत असल्याचा अंदाज प्रेक्षकांना ट्रेलर पाहिल्यावरच येतो, पण म्हणून तो अविश्वसनीय अजिबात नसल्याचे श्रेयस सांगतो. निखिलच्या कथेतील या सुपर हिरोला हिंदीतील सुपर हिरोंप्रमाणे कोणत्याही दैवीशक्ती नाहीत. त्याच्याकडील आत्मविश्वास हीच त्याची जमापुंजी आहे आणि त्या जोरावर तो अन्यायाविरुद्ध सामना करण्याची धमक दाखवत असल्याचे तो सांगतो. ‘पुणे ५२’ सारखा गूढ रहस्यपट करणारा निखिल महाजन ‘बाजी’सारखा मसाला अॅक्शनपट दिग्दíशत करू शकेल याची खात्री त्याच्याकडून कथा ऐकताच पटल्याचे तो सांगतो. अर्थात ‘बाजी’ स्वीकारताना निखिलवर त्याचा विश्वास होताच पण त्यासोबतच आपल्या इतक्या वर्षांच्या अभिनयातील अनुभवाच्या जोरावर आपणही ही भूमिका तितक्याच सक्षमतेने पार पाडू, ही खात्रीही आपल्यात होती असे श्रेयस ठामपणे सांगतो.
श्रेयसने त्याच्या कारकीर्दीची सुरुवात अभिनेता म्हणून केली असली, तरी आता तो निर्माता आहे. लवकरच तो दिग्दर्शकाच्या रूपातही प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. अशा वेळी ‘बाजी’चा पडद्यावरील प्रवास संपला असला, तरी पडद्यापलीकडच्या त्याच्यातील ‘बाजी’च्या प्रवासाला आता खरी सुरुवात झाल्याचे तो सांगतो. ‘काम करायला मजा आली पाहिजे,’ हे सांगताना काहीतरी करायचे राहून गेले, ही खंत आपल्याला बाळगायची नसल्याचे तो आत्मविश्वासाने सांगतो.
क्रिकेटच्या वेडाने झपाटलेला १८-१९ वर्षांचा इक्बाल साकारताना आपण ३० वर्षांचे होतो, त्यावेळी एका १९ वर्षांच्या मुलाची भूमिका साकारणे हे आव्हान होते, ते आव्हान नव्याने आज दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा १९ वर्षांचा चिगू साकारताना स्वीकारले.. ‘इक्बाल’ केल्यानंतर मला त्याच प्रकारच्या चित्रपटांसाठी विचारणा होऊ लागली, पण त्या चाकोरीत अडकण्याऐवजी मी विनोदी चित्रपटांकडे वळलो. तेव्हाही मी विनोदी भूमिका साकारू शकेन, यावर लोकांचा विश्वास नव्हता. पण ‘गोलमाल’ बघितल्यावर लोकांनीच मला कौतुकाची पावती दिली.
श्रेयस तळपदे
-मृणाल भगत