हिंदी चित्रपटांमध्ये ब्लॉकबस्टर, तद्दन गल्लाभरूच्या पलीकडे जाणारे वैविध्यपूर्ण आशय-विषय-मांडणीचे चित्रपट, बॉलीवूड भपकेबाजपणाला फाटा देणारे चित्रपटही येऊ लागले आहेत. मल्टिप्लेक्स संस्कृतीतले चित्रपट असेही त्यांना म्हटले जाऊ लागले आहे. आशय-विषय गंभीर नसलेला आणि संवाद व सादरीकरणातून ‘चिवित्र’ पण खुसखुशीत चटकदार चित्रपट म्हणून ‘फायण्डिंग फॅनी’ हा चित्रपट म्हणता येईल.
चित्रपटाच्या शीर्षकातूनच फॅनी नावाच्या महिलेचा शोध या चित्रपटात घेतला आहे हे प्रेक्षकांना लगेचच समजते. गोव्यातील रमणीय समुद्रकिनारे आणि पणजी किंवा लोकप्रिय ठिकाणांच्या व्यतिरिक्त आतापर्यंत फारशी पडद्यावर न दिसलेल्या चित्रीकरणस्थळी चित्रित करण्यात आलेला हा चित्रपट ताजातवाना ‘लूक’चा आहे.
अस्सल गोव्यातील ख्रिस्ती लोकांची जगण्याची पद्धत, त्यांचे वागणे-बोलणे, इंग्रजीमिश्रित कोंकणी भाषा वापरणे, वरवर आधुनिक वाटणारी पाच ख्रिस्ती माणसं, त्यांची निरनिराळी पाश्र्वभूमी, प्रत्येकाचा जीवनाकडे बघण्याचा वेगवेगळा दृष्टिकोन आणि ते पाचजण एकत्र येऊन काय गंमत घडते यावर हा चित्रपट बेतलेला आहे. पन्नाशी उलटून गेलेला फर्डी हा बोकोली गावातील जुना रहिवासी. त्याच्या शेजारी राहणारी आणि फर्डीचा तिरस्कार करणारी रोझी ऊर्फ रोझेलिना, रोझीची सून अॅन्जी, बोकोली गावातील एक चित्रकार असलेला प्रेडो आणि अॅन्जीवर प्रेम करणारा सडाफटिंग सॅव्हियो दी गामा हा तरुण असे पाच जण. प्रत्येकाच्या पूर्वायुष्यातील घटनांचे सावट त्यांच्या व्यक्तिमत्त्वांवर सतत असते. एकच गोष्ट या पाच व्यक्तिरेखांमध्ये समान दाखविण्यात आली आहे ती म्हणजे प्रत्येकाचे एकाकीपण. लेखक-दिग्दर्शकांनी पटकथेची मांडणी करताना छोटय़ा छोटय़ा संवादातून, व्यक्तिरेखांच्या दिसण्या-वागण्यातून अल्पावधीत प्रत्येकामधील ‘चिवित्र’पणा प्रेक्षकांच्या समोर मांडला आहे. ईप्सित ध्येय ठरविले आणि ते साध्य केले तरी तिथपर्यंतचा प्रवास हाही रोमांचक झाला तर त्यातला ध्येय गाठल्याचा आनंद मिळतो. ही बाब तरलपणे दिग्दर्शकाने अधोरेखित केली आहे.
जगण्यातली अपरिहार्यता प्रामुख्याने दिग्दर्शकाने सर्व पाच प्रमुख व्यक्तिरेखांमधून चांगल्या प्रकारे दाखवली आहे. काही सांगायचे आहे, कुणाची प्रेमकथा पूर्णत्वाला न्यायची आहे किंवा मुद्दामहून चित्रपटातून प्रेक्षकांना काही दाखवायचे आहे असा अट्टहास न करता दिग्दर्शकाने चित्रपटाची मांडणी केली आहे. त्यामुळे वरवर ‘फार्सिकल’ वाटणारा चित्रपट असला तरी घटकाभरात खुसखुशीत, चटकदार पद्धतीने यातील व्यक्तिरेखांच्या जगण्याबद्दल सांगणारा हा चित्रपट नक्कीच आहे.
नसीरुद्दीन शहा यांनी आपल्या शैलीत फर्डी तर पंकज कपूर यांनी प्रेडो हा चित्रकार साकारला आहे. व्यक्तिरेखांचे स्वभाववैचित्र्य या दोन्ही मातब्बर कलावंतांनी प्रेक्षकांसमोर सादर केले आहे. डिम्पल कपाडियाने रोझी या भूमिकेद्वारे बऱ्याच कालावधीनंतर रूपेरी पडद्यावर दर्शन दिले आहे. प्रमुख भूमिका असूनही ग्लॅमर नसलेली अॅन्जी साकारण्यात दीपिका पदुकोण सरस ठरली असून अर्जुन कपूरने संयत अभिनयातून सॅव्हियो ही व्यक्तिरेखा साकारली आहे.
गोव्यातील बोकोली एका आडगावातील या व्यक्तिरेखांमध्ये बोकोली या गावचे प्रेम आहे, गावातील वर्षांनुवर्षांचे शेजारी एकमेकांशी वागतील तसा जिव्हाळा त्यांच्यात आहे. तरी वरवर दाखविताना माणसे क्वचित खवचटपणे, तुसडेपणाने वागतात, पण त्यांच्यात एकाच गावातले राहणारे आहोत हा बंध कायम राहतो. तो दिग्दर्शकाने नेमकेपणाने दाखविला आहे.
फायण्डिंग फॅनी
निर्माता – दिनेश विजन
दिग्दर्शक – होमी अदजानिया
लेखक – होमी अदजानिया, केर्सी खंबाटा
छायालेखक – अनिल मेहता
संगीत – मॅथियास डय़ूपलेसी, सचिन-जिगर
संकलन – श्रीकर प्रसाद
कलावंत – दीपिका पदुकोण, नसीरुद्दीन शाह, डिम्पल कपाडिया, अर्जुन कपूर, पंकज कपूर, आनंद तिवारी, अंकुर तिवारी, अंजली पाटील, मिथाई फूसू, केविन डिमेलो, रणवीर सिंग.
खुसखुशीत
हिंदी चित्रपटांमध्ये ब्लॉकबस्टर, तद्दन गल्लाभरूच्या पलीकडे जाणारे वैविध्यपूर्ण आशय-विषय-मांडणीचे चित्रपट, बॉलीवूड भपकेबाजपणाला फाटा देणारे चित्रपटही येऊ लागले आहेत.
First published on: 14-09-2014 at 02:08 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Finding fanny review