अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केल्यानंतर मनोरंजन क्षेत्रात खळबळ माजली आहे. तुनिषा शर्माने शनिवारी दुपारी वसईतील स्टुडिओत गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी तिचा प्रियकर आणि मालिकेतील सहकलाकार शिझान खान याला अटक केली आहे. त्याच्यावर तुनिषाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. शिझानने प्रेमसंबंध तोडल्याने तुनिषाने आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या आईने केली आहे. दरम्यान एफआयरआमध्ये प्रेमसंबंध तुटल्याने तुनिषा तणावात होती असा खुलासा झाला आहे.
तुनिषा ही ‘अलिबाब: दास्तान ए काबुल’ या टीव्ही मालिकेत मुख्य भूमिका साकारत होती. या मालिकेचे चित्रण वसई पूर्वेच्या कामण येथील भजनलाल स्टुडिओत सुरु होते. शनिवारी दुपारी मध्यंतरानंतर साडेतीन वाजता ती आपल्या मेकअप रुममध्ये गेली आणि गळफास घेतला. ही बाब संध्याकाळी ५ वाजता सहकाऱ्यांना समजली. तिला वसईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिलेली नव्हती.
तुनिषा शर्मा खरंच गरोदर होती का? पोस्टमार्टमनंतर पोलिसांचा मोठा खुलासा
आत्महत्येनंतर तुनिषाच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे वाळीव पोलिसांनी शिझानविरोधात गुन्हा दाखल केला आणि बेड्या ठोकल्या. दरम्यान एफआयआरमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, तुनिषा शर्मा आणि शिझान खान नात्यात होते. १५ दिवसांपूर्वी त्यांचं ब्रेक-अप झालं होतं. यानंतर तुनिषा शर्मा तणावात होती. या तणावातूनच तिने आत्महत्या केली.
शवविच्छेदन अहवालात तुनिषाचा मृत्यू श्वास गुदमरल्याने झाल्याचा उल्लेख आहे. तिच्या शरिरावर कुठेही जखमेच्या खुणा नाहीत. दरम्यान, शिझान खानला आज दुपारी वसई न्यायालयात हजर करण्यात आलं. यानंतर न्यायालयाने शिझान खानला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
वाळीव पोलीस आत्महत्या आणि हत्या अशा दोन्ही बाजूंनी तपास करत आहेत. पोलिसांना घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी मिळालेली नाही. पोलीस घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या सर्वांची चौकशी करत आहेत.
मुंबई पोलिसांनी आज सहकलाकार पार्थची चौकशी केली. यासंबंधी बोलताना त्याने सांगितलं की “मला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं. यावेळी त्यांनी नेहमीचेच प्रश्न विचारले. मी तिच्या नात्यावर भाष्य करु शकत नाही. तो तिचा वैयक्तिक मुद्दा आहे. तिने आत्महत्या केल्यानंतर मला समजलं”.