‘बदलापूर’ या आपल्या आगामी चित्रपटातील सुरुवातीची दृष्ये न दवडण्याचे आवाहन चित्रपटाचा दिग्दर्शक श्रीराम राघवनने प्रेक्षकांना केले आहे. तसे झाल्यास प्रेक्षकांनी चित्रपटाचा तो खेळ न पाहाता, दुसऱ्या खेळासाठी थांबून सुरुवातीपासून चित्रपट पाहण्याचा सल्ला त्यानी प्रेक्षकांना दिला आहे. दिग्दर्शक श्रीराम राघवन, चित्रपटातील मुख्य अभिनेता वरुण धवन आणि अन्य कलाकारांनी मंगळवारी चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण केले. चित्रपटाविषयी बोलताना राघवन म्हणाले, चित्रपटाच्या सुरुवातीलाच महत्वाची घटना घडते, जी कोणीही दवडता कामा नये. चित्रपटाची सुरूवात दवडू नका, असे मी तुम्हाला कळकळीने सांगेन, त्याचप्रमाणे शेवटसुद्धा जरूर पाहा. काही कारणाने जर तुम्ही चित्रपटाची सुरुवातीची पंधरा मिनिटे पाहू शकला नाहीत, तर चित्रपटाचा तो शो न पाहता, पुढचा शो पाहण्याची विनंती मी तुम्हाला करीन. चित्रपटात हुमा कुरेशी आणि नवाझ उद्दिन सिद्दीकी यांच्यादेखील भूमिका आहेत. ‘बदलापूर’ चित्रपटाद्वारे वरुण धवन पहिल्यांदाच आपल्या रोमॅण्टिक कॉमेडी पठडीतील बाजूला सारत थरारक व्यक्तिरेखा साकारण्याचे धाडस करीत आहे. ‘बदलापूर’सारख्या थरारक सूडनाट्याचा भाग होऊन आनंद वाटत असल्याची भावना त्याने यावेळी व्यक्त केली. तो म्हणाला, याआधी मी तीन चित्रपटांमधून काम केले असून, त्या चित्रपटांमधील माझ्या भूमिका ह्या माझ्याच व्यक्तिमत्वाचा भाग असल्यासारख्या होत्या. परंतु, ‘बदलापूर’ चित्रपटातील माझी व्यक्तिरेखा अनोखी आहे. चित्रपटातील माझ्या व्यक्तिरेखेला भावनांचे अनेक पदर आहेत. श्रीरामने साकारलेला हा कलेचा उत्तम नमुना आहे. ‘बदलापूर’मध्ये काम करण्याचा अनुभव अतिशय छान असल्याची भावनादेखील त्याने व्यक्त केली. याआधी वरुण ‘स्टुडण्ट ऑफ द इयर’, ‘मै तेरा हिरो’ आणि ‘हंप्टी शर्मा की दुल्हनिया’ चित्रपटात दिसला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First 15 minutes of badlapur not to be missed director