आर. बाल्की यांच्या ‘शमिताभ’ या आगामी चित्रपटात महान अभिनेते अमिताभ बच्चन एका अनोख्या भूमिकेत दिसणार आहेत. अलिकडेच अमिताभ यांनी चित्रपटातील त्यांच्या व्यक्तिरेखेचे छायाचित्र टि्वटरवर पोस्ट केले. छायाचित्रासोबतच्या संदेशात ते म्हणतात, ‘शमिताभ’चा दिवस… दाढी-मिशीवाल्या या अवतारात दिवसभर वावरणे फार जिकरीचे आहे. या छायाचित्रात अमिताभ बच्चन यांच्या अवतीभवती हॉलिवूड चित्रपटांची पोस्टर्स आणि वूडी अॅलनचे छायाचित्र दिसते. पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि जिन्स असा कॅजुअल पेहराव त्यांनी धारण केला आहे. करड्या रंगाची दाढी, मिशी, डोक्यावरील विस्कटलेले केस आणि डोळ्यात काजळ असे त्यांचे प्रभावी व्यक्तिमत्व पाहायला मिळते. चित्रपटातील दुसरा अभिनेता धनुष याला आवाज देताना अमिताभ बच्चन या चित्रपटात नजरेस पडतील. आर. बाल्की यांच्या चित्रपटात अमिताभ बच्चन साकारत असलेल्या व्यक्तिरेखेबाबत आणि तिच्या दिसण्याबाबत बीग बी आणि दिग्दर्शक आर. बाल्की या जोडीने नेहमीच अनोखे प्रयोग केले आहेत. ‘चिनी कम’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी एका खवट आचाऱ्याची भूमिका साकारली होती, जो तरुण तब्बूच्या प्रेमात पडतो. या चीत्रपटात अमिताभ यांनी ‘पोनीटेल’ केशरचना ठेवली होती. तर, ‘पा’ चित्रपटात त्यांनी ‘प्रोगेरिआ’ आजाराने ग्रासलेल्या एका १३ वर्षाच्या मुलाची भूमिका साकारली होती. या भूमिकासाठी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या दिसण्यावर कमालीची मेहनत घेतली होती. त्यांनी साकारलेली ही भूमिका खूप वाखाणली गेली. आर. बाल्की यांच्या ‘शमिताभ’ या आगामी चित्रपटाद्वारे कमल हसनची दुसरी मुलगी अक्षरा चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे. चित्रपटातील संगीत इलयराजा यांचे आहे.

Story img Loader