सलमान खान सह-निर्माता असलेल्या ‘डॉ. कॅबी’ चित्रपटात अभिनेत्री कतरिना कैफची धाकटी बहिण इसाबेला काम करताना दिसणार आहे. ‘डॉ. कॅबी’ चित्रपटाद्वारे ती चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. मोठी बहिण कतरिनाने ‘बूम’ या बॉलिवूडपटाद्वारे आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. तर, धाकटी बहिण इसाबेला कॅनेडियन चित्रपटाद्वारे आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करत आहे. असे असले तरी, चित्रपटाचा सुरुवातीचा भाग बॉलिवूडपटाशी साधर्म्य सांगणारा आहे. टोरॅन्टोमध्ये चित्रीकरण करण्यात आलेल्या या चित्रपटाची निर्मिती सलमान खानच्या ‘बिंग ह्युमन प्रॉडक्शन्स’द्वारे करण्यात येणार आहे. भारतातून कॅनडात गेलेल्या डॉक्टरची ही कथा आहे. सदर भारतीय डॉक्टराला तेथे काम न मिळाल्याने तो टॅक्सी ड्रायव्हरचे काम करण्यास सुरुवात करतो. कालांतराने तो आपल्या टॅक्सीचे ‘मोबाईल क्लिनीक’मध्ये रुपांतर करतो आणि साथानिक लोकांचा हिरो बनतो. कॅनेडियन दिग्दर्शक जेन फ्रॅन्कोइस पौलिऑट हा या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. इसाबेला शिवाय या चित्रपटात विनय विरमणी, अॅड्रिन पालिश्की, कुणाल नायर, ललित दुबे मिरसा मोनरो आणि रिझवान मानजी यांच्या भूमिका आहेत. इसाबेला ही या चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री नसून, तिची चित्रपटातील दुसऱ्या फळीतील हिरो कुणाल नायरशी जोडी साकारण्यात आली आहे.

Story img Loader