‘अजना मोशन पिक्चर्स’ प्रस्तुत एक आणखी पठडीबाहेरचा विषय असलेला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘पन्हाळा’ असे या सिनेमाचे टायटल असून या सिनेमाचे दिग्दर्शन आणि निर्मिती हिंदी-मराठी सिने इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते नागेश भोसले यांनी केले आहे. तर सिनेमाच्या कथानकाला साजेशी अशी वेगळी स्टारकास्ट यात घेण्यात आली आहे. या सिनेमाचं फर्स्ट लूक लॉन्च सिनेमातील कलाकार आणि तंत्रज्ञांच्या उपस्थितीत नुकतंच करण्यात आलं. यावेळी प्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते अमोल गुप्ते, शेखर सुमन आणि प्रसिद्ध अभिनेत्री दिप्ती नवल यांनी उपस्थित राहून या सिनेमाच्या टीमला शुभेच्छा दिल्या.
‘पन्हाळा’ या लोकप्रिय ऎतिहासिक पर्यटन स्थळाच्या ठिकाणी ही कथा घडते. या पर्यटन स्थळाच्या मार्गावर एक अपघात घडतो आणि सुरू होतो एक वेगळा थरारक प्रवास. या थरारक प्रवासातून हळूहळू बदलत चाललेलं भारतीय समाजाचं रूप दाखवण्यात आलं आहे. तसेच आपला इतिहास आपण जपला तर तो आपल्या फायद्याचा कसा ठरू शकतो हे या सिनेमातून दाखवण्यात आलं आहे.
‘पन्हाळा’ या सिनेमाचे दिग्दर्शन आणि निर्मिती नागेश भोसले यांनी केली असून सिनेमाचे लेखन अरविंद जगताप, उमेश पाडलकर, विलास पाडलकर यांनी केलं आहे. तर सिनेमात लोकप्रिय आणि वेगळ्या भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले मकरंद देशपांडे यांच्यासोबतच नागेश भोसले, संग्राम साळवी, समिधा गुरू, अमृता संत यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर सिनेमाला आणखी देखणा करण्यासाठी सिनेमाची सिनमटोग्राफी अमरेन्द्र भोसले यांनी केली आहे. ‘पन्हाळा’ हा सिनेमा येत्या २४ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

Story img Loader