राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या बहुचर्चित ‘कॅलेंडर गर्ल्स’ चित्रपटाचा ‘फर्स्ट लूक’ प्रदर्शित करण्यात आला आहे. एका प्रसिद्ध कॅलेंडरवर पाच मॉडेल्सचे छायाचित्र छापून आल्यानंतर त्या अचानक प्रसिद्धीच्या झोतात आल्याच्या कथानकावर आधारित असलेल्या या चित्रपटात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, या चित्रपटातील या नव्या चेहऱयांबाबत सध्या कमालीची गुप्तता बाळगण्यात येत आहे.  चित्रीकरणावेळी चित्रपटाशी संबंधित व्यक्तींशिवाय बाहेरच्या कोणालाही प्रवेशबंदी  करण्यात आली आहे तसेच चित्रीकरणावेळी सेटवर मोबाईल फोन्स आणि कॅमेरा आणण्यास सक्त मनाई आहे. इतकेच नव्हे, तर निर्मात्या संगिता अहिर यांनी स्टारकास्ट वगळता चित्रपटाच्या संपूर्ण स्टाफकडून चित्रपटाच्या स्टारकास्टची माहिती उघड न करण्याच्या करारावर सही करून घेतली आहे.
त्या म्हणाल्या की, “पाच नव्या चेहऱयांना मधुरजींनी या चित्रपटात संधी दिली असून त्यांच्याबद्दल योग्यवेळी माहिती देण्याचा उद्देश त्यामागे असल्यामुळे चित्रपटाचे चित्रीकरण आधी पूर्णत्वास येऊ देत. एकदा का चित्रीकरण पूर्ण झाले आणि प्रदर्शित होण्याच्या जवळ आम्ही पोहोचलो की, चित्रपटात संधी देण्यात आलेल्या नव्या चेहऱयांची ओळख करून देण्यात येईल असेही त्या म्हणाल्या.
चित्रपटाचे कथानकही दमदार असल्यामुळे ग्लॅमर सोबत अभिनयाचेही कसब असलेले चेहरे शोधणे महत्त्वाचे होते आणि त्यादृष्टीनेच सुयोग्य स्टारकास्ट मिळाली याचा आनंद असल्याचे मधुर भांडारकर म्हणाले. ‘कॅलेंडर गर्ल्स’ चित्रपट येत्या महिन्याभरात प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. 

Story img Loader