महानायक अमिताभ बच्चन यांना रुपेरी पडद्यावर पाहणे नेहमीच रोमांचक असते. चाहते त्यांच्या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत असतात. चाहत्यांची उत्कंठा वाढवण्यासाठी आता त्यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. त्यांच्या या आगामी चित्रपटाचे नाव आहे ‘गुडबाय.’ या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.
आणखी वाचा : ‘द फेम गेम’ सिरीजचा दुसरा सीझन नेटफ्लिक्स प्रदर्शित करणार नाही; कारण…
या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते या चित्रपटाची पहिली झलक पाहण्यासाठी आतुर झाले होते. अखेर ‘गुडबाय’चा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या समोर आला आहे. हा फर्स्ट लूक पाहून अमिताभ बच्चन यांचे चाहते आनंदी झाल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये बिग बींसोबत सुप्रसिद्ध दाक्षिणत्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आहे. यात अमिताभ बच्चन कुर्ता आणि स्लीव्हलेस जॅकेट परिधान करून पतंग उडवताना दिसत आहेत, तर त्यांच्या मागे हिरव्या रंगाचा कुर्ता आणि ओढणी परिधान करून रश्मिका मंदान्ना मांजा पकडून उभी आहे.
या चित्रपटाचे शूटिंग गेल्या वर्षी सुरू झाले होते. या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यानचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यातल्या काही फोटोंमध्ये बिग बी सेटवर पाळीव प्राण्यांसोबत खेळताना दिसले होते. त्यामुळे या चित्रपटाची सर्वजण खूप वाट बघत होते.
हेही वाचा : अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या तब्येतीबद्दल केले मोठे विधान, म्हणाले, “मी रोज….”
विकास बहल दिग्दर्शित या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदान्ना यांच्याशिवाय अभिनेत्री नीना गुप्ता आणि पावेल गुलाटी यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या ७ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.