गेल्या तीन-चार दिवसांमध्ये प्रियांका चोप्रा हिचे मराठी गीत बाबायूटय़ूब आणि इतर समाज माध्यमांतून जोमात पसरत आहे. आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटीने मराठीत गीत गायल्यामुळे मराठी चित्रपट लोकप्रिय होण्यात किंवा आशयघन चित्रपटांसाठी मोठय़ा संख्येने प्रेक्षक लोटण्यात मराठी पाऊल पुढे पडणार आहे का, याबाबत काही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न..

मनोरंजन विश्वात मराठी माणूस आणि मराठी अभिमान यांना गेल्या काही दिवसांत अभूतपूर्व महत्त्व आले आहे. एकेकाळी छोटय़ा पडद्याला हिणवणारी आणि संसर्गभयाने त्याच्यापासून लांब राहणारी बॉलीवूड नगरीतील यच्चयावत तारे-तारका ‘मराठी प्रेमापोटी’ छोटय़ा पडद्यावरच्या विनोदी कार्यक्रमात धम्माल वगैरे उडवून देत आहेत. तमाम मराठी जनतेचा उर आणि डोळे यांना घाऊक भरतीचा आनंद त्याद्वारे मिळत आहे.

तर वैश्विक अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्यामुळे या आठवडय़ात असे मराठी मनांना हुरळून जाण्याचे, हरखून जाण्याचे निमित्त झाले आहे. तिची निर्मिती असलेल्या ‘व्हेण्टिलेटर’ या ताज्या चित्रपटातील ‘बाबा’ या गीताचे समाजमाध्यमांद्वारे ‘प्रसरण’ झाले अन् त्याच्या वृत्तांची चर्चा  माध्यमांमधून मोठय़ा वेगाने फोफावली. यूटय़ूब, व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक आदींद्वारे हे गाणे पोहोचून घाऊकरीत्या ऐकले जात आहे. दोन-चार दिवसांत गाण्याला यूटय़ूबवर नऊ लाखांहून अधिक दर्शक-श्रोते लाभले आहेत. गाण्याचा चित्रपटाच्या यशावर परिणाम होतो. त्यात प्रसिद्धी तंत्राचा भाग म्हणून प्रियांकाचे ‘बाबा’ गीत या चित्रपटात असणे मराठी माणसांच्या तिकीटबारीच्या वारीवर किती परिणाम करते हे पाहणे या निमित्ताने कुतूहलाचे ठरेल.

हिंदीमध्ये असे प्रसिद्धीफंडे दहा-पंधरा वर्षांपूर्वीच लोकप्रिय झाले होते. हिंदूी पॉपची चळवळ लकी अली, दलेर मेहंदी यांच्याद्वारे जोमात असताना, त्यांची चित्रपटातील फक्त गाण्यात सहभागासह वर्णी लागू लागली. जसपिंदर नरुला आणि रेमो फर्नाडिस यांचे ‘प्यार तो होना ही था’ नामक गाणे लक्षात असल्यास त्या गाण्याची लोकप्रियताही आठवू शकेल. पण गेल्या पंधरा-वीस वर्षांत प्रसिद्धी तंत्राबाबत डोक्यावरून बरेच पाणी गेले आहे.

यूटय़ूबवर प्रियांका चोप्राच्या या मराठी गीताला प्रतिक्रिया देणारा जगभरातील वर्ग   आहे. या भाषेचा गंध नसलेल्यांच्या गाण्यावरील प्रतिक्रिया वाचणे उद्बोधक आहे. सेकंदाला आणि मिनिटाला वाढत जाणारी हिट्सची आकडेवारी ‘उसेन बोल्टी’ वेगाने सरकतेय. मराठी प्रतिक्रियांचे सुलट आणि उलट नमुनेही बक्कळ आहेत. पण मराठीत पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटीचे गाणे असणे मऱ्हाटी मनांना चित्रगृहात ओढण्यात किती फायदेशीर ठरते, त्यावरून पुढील आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटींचा मराठी चित्रपटांमध्ये गीतवावर ठरणार आहे. या आठवडय़ातच ते लक्षात येणार आहे.

थोडे गाण्याविषयी.

आधीच इंग्रजी गाण्यांचा अल्बम लोकप्रिय वगैरे करून प्रियांकाने संगीत क्षेत्रातही उडी मारली आहे. यापूर्वी तिने तमीळ गाणे गायल्याचेही अल्पसंशोधनात कळते. आता प्रियांकाचे मराठी गीत  ‘कळले’, ‘अर्थ खरेच’, ‘समजेना’, ‘खर्च’, ‘पांग’ या तिच्या हिंदीसदृश उच्चारांनी किंचितसे वेगळे वाटते. तरीही कानांना सुखावणारे नक्कीच आहे. मुळात गेल्या काही वर्षांमध्ये मराठी टीव्ही मालिकांपासून ते चित्रपटांमध्ये बॉलीवूडमधून आयात गायकांची गाणीच लोकप्रिय झाल्याची अनेक उदाहरणे सध्या आहेत. (पूर्वी हेमंतकुमार, किशोर, रफी, अमितकुमार, महेंद्र कपूर यांनी मऱ्हाटी गाणी गायल्याचेही चित्रसंगीत कानसेनांच्या मुखकोषात असेल.) त्यामुळे त्यांच्याकडून मऱ्हाटी सु-उच्चारांची अपेक्षाच नाही. मराठी घरांमध्येही आपण शब्दांचे किती अचूक उच्चार करतो, हा प्रश्न आहे. या गाण्यात प्रियांकाचा सुरुवातीपासून जाड पोत असणारा आवाज सुश्राव्य बनला आहे. रोहन-रोहन यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे मनोज यादव यांच्या शब्दांतला मूड अचूकरीत्या टिपते. गीतभर मध्यसप्तक आणि अंताला तार सप्तकात वापरली जाणारी बासरी, गिटार आणि व्हायोलिनचा वापर यांच्या जोडीला प्रियांकाने ओतलेला जीव यांनी गाणे परिपूर्ण झाले आहे. प्रियांका चोप्रा हिची अष्टपैलू ख्याती भारतीय चित्रसृष्टीत आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या अमेरिकी टीव्ही मालिका ‘क्वाण्टिको’मुळे ती पुरती वैश्विक झाली आहे. तिची  भारतीय उच्चारशैली तिकडे टीकेचा विषय असली, तरी आपल्याला गर्वसंपृक्त करणारी वाटते. आपल्याकडच्या गुळगु़ळीत पुरवण्यांमध्ये प्रियांकाचे तिच्या वडिलांशी असलेले नाते बऱ्यापैकी चर्चिले गेले आहे. त्यामुळे केवळ प्रसिद्धीतंत्राचा भाग म्हणूनच फक्त याकडे पाहता येणे कठीण आहे.

प्रसिद्धी आणि अर्थकारण

मराठी सृष्टीत बॉलीवूड तारांगण लोटण्याचा काळ अर्थकारणाशी संबंधित आहे. सौंदर्यप्रसाधनाची बाजारपेठ गब्बर कंपन्यांच्या लक्षात आली, तेव्हा जसे ‘मिस वर्ल्ड’, ‘मिस युनिव्हर्स’ किताब पटकविण्यात भारतीय ललना पुढे आल्या. तसाच प्रकार मराठीतील अल्प गुंतवणुकीतून दीर्घ लाभाचा विचार बॉलीवूड कंपन्यांकडून होत आहे. सुभाष घई यांच्या मुक्ता आर्ट्सने ‘वळू’ चित्रपटात किंवा अमिताभ बच्चन यांच्या कंपनीने ‘विहीर’मध्ये गुंतवणूक करणे यांपासून सुरू झालेली परंपरा आता पसरत चालली आहे. सध्या हिंदी चित्रपटाचे बजेट १०० कोटींच्या आसपास जाते. याउलट मराठी चित्रपट जास्तीत जास्त तीन ते चार कोटींच्या बजेटमध्ये आटोपते घेतो. या चित्रपटांमध्ये हिंदी चित्रकर्त्यांची गुंतवणूक म्हणूनच कुटीरोद्योगासारखी भासते. मराठी चित्रपटात गुंतवणुकीची आधी पोटतिडकीने येथील माध्यमांत बातमी होते. त्यानंतर तडस लागेस्तोवर स्तुती केली जाते. मग भावनोत्कट झालेल्या मराठी मनांमध्ये प्रतिमा निर्मिती होते. चित्रपट चालला तर उत्तमच नाही, चालला तरी तोटय़ाची मात्रा कमी असते. हिंदी चित्रपटासाठी  तिकीटबारीवरचे यशगणित हा आतबट्टय़ाचा असतो. पायरसीने आधीच तिकीटबारी संकुचित केलेली असताना प्रेक्षकांना चित्रगृहाकडे आकर्षित करण्यासाठी म्हणूनच छोटय़ा पडद्यांच्या जनप्रिय कार्यक्रमांना प्रसिद्धीसाठी वापरण्याची टूम अलीकडे वाढली आहे. याबाबत आपली भारतीय सिनेसृष्टी पूर्णपणे अमेरिकी झाली आहे. मराठी प्रेमाचा पुळका भासवत कुणी आपल्या कार्यक्रमात ‘मऱ्हाटी बोलू-नाचू-गाऊ’ लागला की त्यातला हेतू स्पष्ट होतो.

रेकॉर्डिगचा बडेजाव

काही महिन्यांपूर्वी आपल्याकडे लोकप्रिय चित्रपटातील एक गीत अमेरिकी स्टुडिओमध्ये रेकॉर्ड केल्याचा बराच गवगवा करण्यात आला. गीत इतके सुंदर होते की ते भारतात किंवा आफ्रिकेतल्या कुठल्याही स्टुडिओत तसेच ध्वनिमुद्रित झाले असते. अमेरिकेतील रेकॉर्डिग यंत्रणेइतकीच सुसज्ज यंत्रणा भारतातील मुंबई-पुणे आणि ठाण्यातल्या कित्येक स्टुडिओजमध्ये निर्माण झाली आहे. वैयक्तिक खासगी स्टुडिओमध्ये ध्वनिमुद्रित झालेली गाणी टय़ूबवर पाहिली-ऐकली असल्यास लक्षात येईल. तेव्हा बाबा हे गाणे अमेरिकेत रेकॉर्डिग केले असल्याची प्रसिद्धीसाठी वापरली गेलेली माहिती फुकाची आहे. जगातील सर्वोत्तम संगीत रेकॉर्डिग (यात हॉलीवूडचे जेम्स कॅमेरॉनपासून सर्वच दिग्गज दिग्दर्शक) न्यूझीलंडच्या वेटा स्टुडिओत होते. आपल्याकडचे न्यूझीलंडमध्ये ध्वनिमुद्रण ऐकायचे असल्यास लकी अलीचे सुरुवातीचे अल्बम आवर्जून ऐकावेत. त्यातील ध्वनीगुणाची कल्पना येईल.

हा लेख लिहायला घेतला तेव्हा (४ मिनिटे १२ सेकंदांचे व्हर्शन) दीड तासांपूर्वी या गाण्यावरील हीट्सची संख्या ९ लाख ६१ हजार ४२६ होती. लेख संपवताना ती ९ लाख ७४ हजार ३२४ आहे. लेख छापून वाचून होईस्तोवर गंमत म्हणून पडताळल्यास गीताच्या हीट्सची आकडेवारी अचंबित करणारी असेल. तिकीटबारीवरील आकडेवारी वाढविण्यात त्यातील मराठी उरफुगवी मने कधी आणि किती सक्रिय होतील हा संशोधनाचा विषय असेल.