युवा पिढीला आकर्षित करण्याच्या उद्देशातून भारतीय डिजिटल पार्टी या संस्थेची निर्मिती असलेली ‘कास्टिंग काऊच’ ही पहिली मराठी वेब मालिका मंगळवारी (५ एप्रिल) यू-टय़ूब आणि फेसबुक या माध्यमातून प्रसारित होत आहे. हिंदूी आणि इंग्रजीमध्ये लोकप्रिय असलेल्या वेब मालिकांचे दालन मराठीसाठी प्रथमच खुले होत आहे.
अभिनेता संदीप कुलकर्णी, रंगकर्मी सारंग साठे, पॉला मग्लेन, अनुषा नंदकुमार यांनी एकत्र येऊन भारतीय डिजिटल पार्टी या संस्थेची स्थापना केली आहे. वेब मालिका, वेब शो, वेब स्केच कॉमेडी शो आणि फिक्शन मालिका अशा नावीन्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करून हे आधुनिक माध्यम मराठी भाषेतील कार्यक्रमांसाठी खुले करण्याचे काम भारतीय डिजिटल पार्टी ही संस्था करणार आहे. आगामी वर्षभराच्या कार्यक्रमांचे नियोजन केले असून बहुतांश कार्यक्रमांचे रूपरेषेसह संहितालेखनाचे काम पूर्ण केले आहे. त्यातील ‘कास्टिंग काऊच’ या मराठी वेब मालिकेच्या पहिल्या भागाचे मंगळवारी दुपारी चार वाजता प्रसारण केले जाणार आहे. परदेशामध्ये यू-टय़ूब आणि भारतामध्ये फेसबुक या सोशल माध्यमावर त्याचे प्रसारण होणार आहे. अभिनेता अमेय वाघ आणि दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी हे या मालिकेचे सूत्रधार असून अभिनेत्री राधिका आपटे हिची वेगळ्या शैलीत घेतलेली मुलाखत असे या भागाचे स्वरूप आहे. दर पंधरवडय़ाने या मालिकेचा नवा भाग प्रसारित केला जाणार असून प्रत्येक भागामध्ये हे दोघेजण नव्या कलाकाराला बोलते करणार आहेत, असे सारंग साठे यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांपासून ‘वेब कॉन्टेन्ट’ हा प्रकार लोकप्रिय झाला असून १६ ते ३० वर्षे वयोगटातील युवा हा त्याचा ‘टारगेट ऑडियन्स’ आहे. यामध्ये ‘द व्हायरल फिव्हर’ (टीव्हीएफ) आणि वादग्रस्त ठरलेली ‘ऑल इंडिया बकचोद’ हे दोन ग्रुप यशस्वी झाले आहेत.
याखेरीज यशराज फिल्म्स, बालाजी टेलिफिल्म, एरॉथ यासारख्या चित्रपट व्यवसायातील संस्थाही या क्षेत्रात उतरल्या आहेत. वेब मालिका लोकप्रिय असल्याने या मालिकांसह कलाकारांना पैसा आणि प्रसिद्धी मिळते. त्यामुळे या मालिकांना जाहिरातीही मिळतात. आता थ्रीजी आणि फोरजी मुळे स्पीड आला असून मोबाईल, टॅब, संगणक आणि स्मार्ट टेलिव्हिजनवर वेब मालिका पाहता येतात.