बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांचा विवाह सोहळा मंगळवारी अत्यंत साध्या पद्धतीने संपन्न झाला. दिल्लीच्या छत्तरपूर येथील फार्महाऊसवर गुरूद्वारातील पारंपरिक पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला. यावेळी शाहिद आणि मीराने अत्यंत साधे पोशाख परिधान केले होते. विवाहसोहळ्याला उपस्थित असलेल्या लोकांकडून शाहिद आणि मीराच्या लग्नाची छायाचित्रे ट्विटरवर शेअर करण्यात आली आहेत. सकाळी ११ वाजताच्या मुहूर्तावर हा विवाहसोहळा संपन्न झाला असून यावेळी कपूर कुटुंबियांसह मोजके जण उपस्थित होते. शाहिद कपूर सुरूवातीपासूनच त्याच्या विवाहसोहळा चारचौघांसारखा साधा असेल, असे सांगत आला होता. त्यामुळे या विवाहाच्या तयारीपासूनच सर्व गोष्टींबाबत गुप्तता बाळगण्यात आली होती. मीरा आणि मी आम्ही दोघेजण सामान्य व्यक्ती आहोत. त्यामुळे आमचा विवाह सामान्यपणे आणि नेहमीच्या पद्धतीने व्हावा, अशी शाहिदची इच्छा होती. विवाह ही माझी खासगी बाब असून मला त्याचा गाजावाजा करायचा नसल्याचेही शाहिदने सांगितले होते. दरम्यान, लग्नाच्या सर्व विधींनंतर दिल्लीतील ओबेरॉय हॉटेलच्या भव्य बॉलरूममध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. काल संध्याकाळी पार पडलेल्या संगीत कार्य़क्रमात शाहिद आणि मीरा एकत्र नृत्य करताना दिसले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा