450-aishwaryaगेली चार वर्षे चित्रपटसृष्टीपासून दूर असलेली ऐश्वर्या राय बच्चन लवकरच पुनरागम करणार असल्याची चर्चा सतत होत होती. तो क्षण प्रत्यक्षात आला असून, मुंबईत चित्रपटाचे शुटिंग करताना ती नजरेस पडली. दिग्दर्शक संजय गुप्ता यांच्या ‘जझबा’ चित्रपटाद्वारे ती पुनरागमन करीत आहे. अभिनेता इरफान खानबरोबर तिने ‘जझबा’साठीच्या चित्रीकरणास सुरुवात केली असून, जुहू परिसरातील एका खाण्याच्या ठिकाणी सुरु असलेल्या शुटिंगमध्ये ही जोडी सहभागी झाली होती. चित्रपटात वकिलाची भूमिका साकारत असलेलल्या ऐश्वर्या राय बच्चन भोवती १० अंगरक्षकांचा गराडा होता. ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमीदेखील या चित्रपटात भूमिका साकारत असून, पुढील आठवड्यात त्या चित्रीकरणात सहभाग होतील. ‘जझबा’ एका विदेशी चित्रपटाचा रिमेक असून, संजय गुप्तांनी याबाबत अधिक काही खुलासा केलेला नसला, तरी सोशल मीडियाद्वारे ऐश्वर्याच्या चाहात्यांपर्यंत चित्रपटाच्या सेटवरील माहिती पोहोचविण्याचे काम ते चांगल्याप्रकारे करत आहेत. अलीकडेच त्यांनी ऐश्वर्याचे छायाचित्र टि्वटरवर पोस्ट केले आहे. सामान्य माणसे असामान्य परिस्थितीचा कशाप्रकारे सामना करतात ते या चित्रपटात दर्शविण्यात आल्याची माहिती संजय गुप्तांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत दिली होती. चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन वकिलाच्या भूमिकेत, तर इरफान खान एका निलंबित पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. इरफानच्या आईच्या भूमिकेतील शबाना आझमी एक प्रसिद्ध शिक्षिका दर्शविण्यात आली आहे. ‘कान’ चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचा प्रिमियर करण्याचा दिग्दर्शक संजय गुप्ता यांचा मानस आहे.

Story img Loader