सध्या आपल्या चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक चित्रपट आणि बायोपिकची चांगलीच हवा आहे. वेगवेगळे बायोपिक येणाऱ्या काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अशातच आता दिग्गज फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनच्या बायोपिकची भर पडली आहे. मुरलीधरनच्या वाढदिवसानिमित्त ‘८००’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी याचं पहिलं पोस्टर प्रदर्शित केलं. ‘स्लमडॉग मिलियनेर’फेम मधुर मित्तल यात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
याआधी मुरलीधरनच्या भूमिकेत सुपरस्टार विजय सेतुपती झळकणार होता, पण आता त्याच्या ऐवजी मधुर मित्तलची वर्णी लागली आहे. एमएस श्रीपती दिग्दर्शित ‘८००’ हा श्रीलंकेचा दिग्गज फिरकी गोलंदाज मुरलीधरनचा बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून हे पोस्टर शेअर करत माहिती दिली.
आणखी वाचा : DDLJ मध्ये शाहरुखबरोबर दिसले असते मिलिंद गुणाजी; ‘या’ कारणामुळे निसटली हातातून भूमिका
हा चित्रपट तमिळ, तेलुगू आणि हिंदी या ३ भाषांमध्ये प्रामुख्याने दाखवला जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. २०२० मध्ये निर्मात्यांनी विजय सेतुपतीला घेऊन या चित्रपटाची घोषणा केली होती, पण बऱ्याच लोकांचा विरोध आणि काही राजकीय कारणांमुळे अभिनेत्याला या चित्रपटातून बाहेर व्हावं लागलं. मुरलीधरनने श्रीलंकेच्या सिव्हिल वॉरदरम्यान श्रीलंकेच्या सरकारला सहाय्य केलं असल्याने बरीच लोक या चित्रपटाच्या विरोधात होते अन् त्यामुळेच तो वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.
आता मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या चित्रपटातून मुरलीधरनच्या आयुष्यावर प्रकाश टाकला जाणार आहे. मधुर मित्तल यानेसुद्धा या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत लिहिलं, “मुथय्या मुरलीधरनच्या बायोपिकमध्ये काम करायची संधी मिळाली यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. माझ्या आईचा आणि त्यांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो त्यानिमित्ताने या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करत आहोत. लवकरच चित्रपटगृहात भेटू.” हा चित्रपट याचवर्षी प्रदर्शित होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.