वातावरणामध्ये धुळीचे लोट उडत आहेत.. समोरून येणाऱ्या खलनायकाला नायक जोरात लाथ मारतो आणि तो हवेत उडतो.. त्यानंतर ‘कॅमेरा’ नायकाभोवती दोन-तीन चकरा मारून, पायापासून चेहऱ्यापर्यंतचा एक ‘क्लोजअप’ घेतो.. असा ‘सीन’ वठला तर सिनेमागृहातून शिटय़ा, टाळ्या, चित्कार वसूल झालेच म्हणून समजा.. हिंदी चित्रपटाला नायकाचा असा ‘दबंग’, ‘सिंघम’, ‘राठोडी’आवेश नवीन नाही. परंतु आता मालिकांमध्येही नायकाचा असा ‘लार्जर दॅन लाईफ’ प्रवेश दाखविण्यात येणार आहे. अर्थात या दहा मिनिटांच्या प्रवेशाच्या दृश्यासाठी मालिकांना दुप्पट खर्च मोजावा लागणार आहे. कारण या दृश्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘हॅलीकॅम’चा खर्चच दहा मिनिटांसाठी तब्बल लाखभर रुपये इतका आहे.
चित्रपटातील नायक आणि मालिकांमधील नायकांच्या छबीमध्ये बराच फरक असतो. एकीकडे मोठय़ा पडद्यावर ‘अ‍ॅक्शन हिरो’चा प्रवेश होताच टाळ्या, शिट्टय़ांचा गजर होतो. मालिकांमध्ये मात्र कुटुंबवत्सल, गुणी, आदर्श असा ‘नवराछाप’ नायकच पसंत केला जातो. त्यामुळे मालिकांमध्ये शक्यतो कॉलेजमध्ये बास्केटबॉल खेळताना किंवा कार्यालयामध्ये एखादी बैठक उत्तमरीत्या सादर करणाऱ्या नायकाचा प्रवेश पाहण्याची सवय प्रेक्षकांना झालेली आहे. चित्रपटाप्रमाणे गुंडाशी चार हात करणारा नायक मालिकांमध्ये क्वचितच रंगविला गेला आहे.
या परंपरेला छेद देत ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील आगामी ‘येक नंबर’ मालिकेमध्ये नायकाच्या प्रवेशासाठी एका ‘अ‍ॅक्शन’ दृश्याची जुळवाजुळव करण्यात येत आहे. त्यासाठी खास हॅलीकॅमचा वापर चित्रीकरणासाठी करण्यात येणार आहे. मालिकेची कथा देव आणि वेदाच्या प्रेमकथेभोवती फिरते आहे. शिक्षणाचे महत्त्व जाणणारी वेदा आणि झटपट पैसे कमविण्यासाठी धडपडणारा देव हे दोघेही भिन्न प्रवृत्तीचे असतात. कॉलेजमध्ये परस्परविरोधी स्वभावामधून सतत उडणाऱ्या खटक्यांमधून त्यांच्यात प्रेमाचे सूत जुळते. देव कॉलेजमधील एक मवाली आहे. त्यामुळे हाणामारीची दृश्ये मालिकेतील एक महत्त्वाचा भाग असणार आहे. या दृश्यांमध्ये चित्रपटाप्रमाणे भव्यता साधायची होती. त्यामुळे यासाठी हॅलीकॅमचा वापर करण्यात आल्याचे वाहिनीचे प्रोग्रामिंग हेड जयेश पाटील यांनी सांगितले.
नायकाचा प्रवेश ‘लाखमोला’चा
या कॅमेऱ्यामुळे ‘अ‍ॅक्शन’ दृश्यांमध्ये उत्तम परिणाम साधला जातो. त्यामुळे रोहीत शेट्टीच्या चित्रपटांमध्ये अशा प्रकारचा कॅमेरा वापरला जातो. नेहमीच्या कॅमेऱ्याने १८० अंशातील दृश्य चित्रित करता येते. या कॅमेऱ्याच्या मदतीने संपूर्ण ३६० अंश कोनातील दृश्य चित्रित करता येते. त्यामुळे चित्रपटाला साजेसे अ‍ॅक्शन दृश्य प्रेक्षकांना मालिकेत अनुभवता येईल. चित्रीकरण करताना नेहमी दोन्ही बाजूंना प्रकाशयोजना करावी लागते. हॅलीकॅम वापरून चित्रीकरण करण्यासाठी चारही बाजूने पुरेसा प्रकाश वापरण्याची गरज असते. त्यामुळे एकूणच निर्मितीचा खर्च दुप्पट होतो. या कॅमेऱ्याच्या दिवसांचे भाडेच ३०हजार रुपये इतके आहे. तसेच इतर तयारीचा खर्च लाखाच्या घरामध्ये जातो.

संदीप पाटील यांचा मुलगा चिरागचे पदार्पण
मालिकेत प्रमुख नायक असलेल्या देवची भूमिका प्रसिद्ध क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा मुलगा चिराग पाटील साकारणार आहे. तर वेदाच्या भूमिकेत नवोदित नायिका माधुरी देसाई आहे.

दोन मिनिटांचा प्रोमो
या मालिकेनिमित्त पहिल्यांदाच एखाद्या मालिकेसाठी दोन मिनिटांचा प्रोमो दाखविण्यात येणार आहे. एरवी चित्रपटाचे चित्रीकरण झाल्यावर त्याचा प्रोमो तयार करण्यात येतो. तोच प्रयोग या मालिकेच्या निमित्ताने टीव्हीवर करण्यात येणार असल्याचे जयेश पाटील यांनी सांगितले. मालिकेच्या काही भागांचे चित्रीकरण पूर्ण झाल्यावर प्रोमोचे काम करण्यात येत आहे.

Story img Loader