मराठी चित्रपटांचे पुन्हा ‘हमपॉँच’
एकाचवेळी दोनपेक्षा जास्त मराठी चित्रपट प्रदर्शित झाले तर प्रेक्षक विभागला जातो. परिणामी दोन्ही चित्रपटांच्या व्यवसायावर परिणाम होतो हे लक्षात येऊनही एकूणच चित्रपट निर्मितीची वाढलेली संख्या आणि अपुरे नियोजन यामुळे एकाचवेळी पाच-पाच मराठी चित्रपट प्रदर्शित होण्याचा सिलसिला अजूनही सुरू आहे. याही शुक्रवारी वेगवेगळ्या जॉनरचे पाच मराठी चित्रपट तिकीटबारीवर आमनेसामने उभे आहेत.
मराठी चित्रपटनिर्मितीचा आकडा गेल्या दोन वर्षांत सातत्याने वाढत चालला आहे. मराठी चित्रपट व्यवसायाच्या दृष्टीने ही गोष्ट चांगली असली तरी अजूनही या चित्रपटांच्या प्रदर्शनाचे नियोजन हे निर्माते-वितरकांसमोरचे अवघड गणित बनले आहे. प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलूनही १९ फेब्रुवारीला पाच चित्रपट एकत्र प्रदर्शित होणार आहेत. साकार राऊत दिग्दर्शित ‘संघर्षयात्रा’, रहस्यमय थरारपट असलेला ‘७ रोशन व्हिला’, वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बेहरे यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘मि. अँड मिसेस सदाचारी’, ‘एक होती राणी’ आणि ‘विघ्नहर्ता महागणपती’ हे पाच वेगवेगळ्या विषयांवरचे आणि जॉनरचे चित्रपट एकमेकांशी स्पर्धा करणार आहेत. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आयुष्याची संघर्षगाथा मांडणारा ‘संघर्षयात्रा’ हा चित्रपट खरेतर गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. ‘मि. अँड मिसेस सदाचारी’ हा चित्रपटही डिसेंबरमध्येच प्रदर्शित होणार होता तोही पुढे ढकलण्यात आला. तर ‘७ रोशन व्हिला’ आणि ‘एक होती राणी’ हे चित्रपटही कधीच तयार असून या शुक्रवारी एकत्र प्रदर्शित होत आहेत.
‘७ रोशन व्हिला’ हा रहस्यमय चित्रपट आहे. चित्रपटाचे प्रसिध्दीकार्यक्रमही आधीच झाले असल्याने चित्रपटाची चर्चा झाली असली तरी प्रेक्षक विभागला जातो आणि त्याचे नुकसान निर्मात्यांना सहन करावे लागते हे वास्तव आहे, असे दिग्दर्शक अक्षय दत्त यांनी सांगितले. मात्र चित्रपट प्रदर्शनाचा निर्णय हा पूर्णत: निर्मात्यांचा असल्याने त्यात दिग्दर्शक म्हणून आपल्याला हस्तक्षेप करता येत नाही. प्रेक्षकांची विभागणी टाळण्यासाठी वितरकांनी निर्मात्यांना योग्य मार्गदर्शन करायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले. या चित्रपटाचा जॉनर वेगळा असल्याने पाच चित्रपटांच्या गर्दीतही तो प्रदर्शित झाला तरी आपली हरकत नाही, असे चित्रपटाचे निर्माते अभिजीत भोसले यांनी स्पष्ट केले. ‘संघर्षयात्रा’ आम्ही आधीच प्रदर्शित करणार होतो. काही बदल करून पुन्हा प्रदर्शित करावा लागल्याने मध्ये बराच वेळ गेला. पण, आम्ही १९ फेब्रुवारीला चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर इतर चित्रपटांची माहिती मिळाली, असे दिग्दर्शक साकार राऊत यांनी सांगितले.
या शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या या मराठी चित्रपटांना एकमेकांची स्पर्धा तर आहेच शिवाय त्याचदिवशी हिंदीतही चार चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने तब्बल नऊ चित्रपट तिकीटबारीवर नशीब आजमावणार आहेत. सोनम कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘नीरजा’ हा चरित्रपट हे या मराठी चित्रपटांसमोरचे मोठे आव्हान असणार आहे. नऊ चित्रपटांच्या गर्दीत कोणकोणत्या चित्रपटांना व्यवसायाची संधी मिळणार?, हा खरा प्रश्न आहे.
शोधू किती शुक्रवार..
शुक्रवारी वेगवेगळ्या जॉनरचे पाच मराठी चित्रपट तिकीटबारीवर आमनेसामने उभे आहेत.
Written by लोकसत्ता टीम
आणखी वाचा
First published on: 17-02-2016 at 01:57 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five marathi film released on same day