भारतीय चित्रपट जगतात मानाचे स्थान मिळवलेल्या ५० व्या ‘इफ्फी’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरूवात २० नोव्हेंबरला होणार आहे. यासाठी ‘इंडियन पॅनोरमा फीचर फिल्म’ विभागात निवड झालेल्या चित्रपटांची यादी जाहीर झाली असून यंदा या यादीमध्ये पाच मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.
भारताच्या ५० व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील भारतीय पॅनोरमा विभागात (२०१९) एकूण पाच मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. देशातील एकूण २६ हिंदी चित्रपटासह विविध प्रादेशिक चित्रपटातून ही निवड झाली आहे.
यामध्ये सुजय डहाके दिग्दर्शित ‘तुझ्या आयला ‘, समीर विद्वांस दिग्दर्शित ‘आनंदी गोपाळ ‘, शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित ‘भोंगा’, अनंत महादेवन दिग्दर्शित ‘माई घाट : क्राईम नंबर १०३|२००५ , आदित्य राही आणि गायश्री पाटील दिग्दर्शित ‘फोटो प्रेम ‘ या मराठी चित्रपटांचा समावेश आहे. तर या पॅनोरमा विभागात बंगाली आणि मल्याळम भाषेतील प्रत्येकी तीन चित्रपट आहेत. पॅनोरमा विभागात गतवर्षी फक्त दोन मराठी चित्रपट होते. पणजी ( गोवा) येथे २० ते २८ नोव्हेंबर या कालावधीत हा चित्रपट महोत्सव पार पडणार आहे. या महोत्सवाच्या विविध विभागात ७६ देशातील वेगवेगळ्या भाषांमधील २०० चित्रपटांचा समावेश आहे.