बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची विजेती अभिनेत्री मेघा धाडे ठरली आहे. या शोच्या सुरुवातीपासूनच ती विविध कारणांमुळे चर्चेत राहिली आणि तिचं चर्चेत राहणंच विजेतेपदासाठी कारणीभूत ठरलं असं म्हणायला हरकत नाही. तर जाणून घेऊयात मेघाविषयीच्या काही गोष्टी..
१. मेघा तिच्या रोखठोक बोलण्यामुळे ‘बिग बॉस’च्या घरात चर्चेत राहिली. प्रत्यक्ष आयुष्यातही मेघा याच स्पष्टवक्तेपणामुळे ओळखली जाते. मेघाने कमी वयामध्ये आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली.
२. ‘कसौटी जिंदगी की’ या गाजलेल्या हिंदी मालिकेमध्ये ती झळकली होती. या मालिकेनंतर ती घराघरात पोहोचली. या मालिकेप्रमाणेच ती अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये झळकली. त्यानंतर तिने काही चित्रपटांची निर्मितीही केली. मात्र यात तिला म्हणावे तसे यश मिळाले नाही.
३. मेघाला अभिनयाबरोबरच स्वयंपाक करणे आणि गाणी म्हणण्याची विशेष आवड असल्याचे ‘बिग बॉस’च्या घरात दिसून आले. अनेक वेळा ती ‘बिग बॉस’च्या घरात स्वयंपाक घरात काम करताना गाणी गुणगुणताना दिसून आली.
४. ‘बिग बॉस’मधून ‘कम बॅक’ करणारी मेघा गेल्या काही काळापासून मराठी चित्रपटसृष्टीपासून लांब होती. काही वैयक्तिक करणामुळे मेघाला चित्रपटसृष्टीपासून फारकत घ्यावी लागल्याचे तिने ‘बिग बॉस’च्या घरात सांगितले.
५. मेघा लग्नाअगोदरच गरोदर राहिल्यामुळे याबाबत विशेष चर्चा रंगली होती. मात्र लहान वयात आई झाल्यामुळे मेघाला अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. परंतु या परिस्थितीतही न खचता तिने स्वत: चे करिअर घडविले. दरम्यान, मेघाने पुन्हा लग्न केले असून तिचे पती नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये उपाध्यक्ष आहेत.
ख-या आयुष्यात मेघाने जरी अनेक समस्यांना तोंड दिले असले. तरी ती कणखर असल्याचे ‘बिग बॉस’च्या घरात दिसून आले. या घरात प्रत्येक स्पर्धकाने खेळ जिंकण्याचा प्रयत्न केला असला तरी मेघाने खेळामध्ये मैत्री कधीच आणली नाही. त्यामुळेच ‘बिग बॉस’चा किताब जिंकण्यात मेघा यशस्वी ठरली असं म्हणायला हरकत नाही.