बॉलिवूडसाठी यंदाचे वर्ष फूल ऑफ सप्रायझेस प्रकारातले ठरले. म्हणजे सलमान खान, आमिर खान आणि शाहरुख खान सारख्या बड्या स्टार्सचे सिनेमा आपटले तर त्याच वेळी आयुषमान खुराना, राजकुमार राव, विकी कौशल या नव्या दमाच्या अभिनेत्यांच्या चित्रपटांना सिनेचाहत्यांनी डोक्यावर घेतले. या वर्षी अनेक सिनेमे प्रदर्शित झाले. यामध्ये अगदी ठग्स ऑफ हिंदोस्तान सारख्या बीग बजेट सिनेमांपासून ते बधाई हो सारखा वेगळा विषय हाताळणाऱ्या सिनेमांचा समावेश आहे.
यंदाचे वर्ष हे सिनेसृष्टीसाठी दिशादर्शक आहे असं म्हणता येईल. कारण सिनेमामध्ये अभिनेता कोण आहे यापेक्षा सिनेमाचा विषय काय आहे हे पासून यंदा प्रेक्षकांनी सिनेमागृहाकडे पावले वळवली. म्हणूनच आशयघन सिनेमांची यंदा चलती होती तर केवळ अभिनेत्यांच्या नावावर सिनेमा विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या निर्मात्यांकडे पाठ फिरवून प्रेक्षकांनी कथा हा सिनेमाचा जीव असतो हे दाखवून दिले. याच ट्रेण्डमुळे यंदा अनेक अनेपेक्षित सिनेमा तिकीटबारीवर ‘लंबी रेस के घोडे’ ठरले. या सिनेमांने केवळ मनोरंजनच केले असं नाही तर तिकीटबारीवरही जोरदार आणि तितकीच अनपेक्षित कमाईही केली. पाहुयात असेच अनपेक्षितरित्या यशस्वी झालेले 2018 मधील पाच सिनेमे
राजी:
चौकटीबाहेरच्या चित्रपटांचं दिग्दर्शन करत एका वेगळ्याच कथानकाला हात घालणाऱ्या मेघना गुलजारने पुन्हा एकदा ‘राजी’च्या निमित्ताने एक थरारक पण, तितकीच प्रेरणादायी कथा प्रेक्षकांच्या भेटीला आणली.
१९७१ मध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये ज्यावेळी युद्धजन्य परिस्थिती उदभवली होती, त्या काळचा आधार घेत एक अंडरकव्हर एजंट शेजारी राष्ट्रात जाऊन आपल्या देशासाठी नेमकी कशी हेरगिरी करते याचं परिणामकारक आणि थरारक चित्रण म्हणजे राजी. निवृत्त नौदल अधिकारी हरिंदर सिक्का लिखीत ‘कॉलिंग सहमत’ या कादंबरीवर ‘राजी’ आधारित आहे. पाकिस्तानचे भारताविषयी असलेले मनसुबे ठीक नाहीत याची जेव्हा हिदायत खान (रजित कपूर) या भारतीय व्यावसायिकाला कुणकूण लागते तेव्हा पाकिस्तानमधील ब्रिगेडियर परवेज सैय्यद (शिशिर शर्मा)सोबत असलेल्या आपल्या मैत्रीपूर्ण संबंधांना नजरेत ठेवत हिदायत एक महत्त्वाचा निर्णय घेतात. आपल्या मुलीला म्हणजेच सहमतला (आलिया भट्ट) ते सैय्यदच्या मुलाच्या म्हणजेच इकबालच्या (विकी कौशल) पत्नीच्या रुपात पाकिस्तानमध्ये पाठवण्याचा विचार करतात. देशाप्रती वडिलांच्या मनात असणाऱ्या भावनांना ओळखत सहमतही लग्नासाठी तयार होते आणि मग तिचा हेरगिरीचा प्रवास सुरु होतो. लग्नापूर्वीच सहमतला परिस्थितीची पूर्ण जाणिव करुन दिली जाते. त्यावेळी न डगमगता कोणत्याही परिस्थिती घट्ट पाय रोवून उभी राहणारी सहमत साकारणाऱ्या आलियाचा अभिनय पाहण्याजोगा आहे. शेजारी राष्ट्रातील एका प्रतिष्ठीत कुटुंबाची सून म्हणून जाणं आणि त्यातही सैन्यदलाशी संलग्न कुटुंबातूनच हेरगिरीची कामं करण्याचा संभाव्य धोका पत्करत सहमत तिचं काम सुरु ठेवते. या साऱ्यामध्ये तिला नेमक्या कोणत्या अडचणी येतात आणि त्या अडचणींमध्येही काही धाडसी निर्णय सहमत नेमकी कशी घेते याचं सुरेख चित्रण ‘राजी’मध्ये करण्यात आलं आहे.
नक्की वाचा >> Raazi movie review: ती ‘राजी’ होती म्हणून…
नक्की वाचा >> ‘राजी’ने केली ‘या’ विक्रमांची नोंद
एका सत्यघटनेला चित्रपटरुपात प्रेक्षकांसमोर मांडताना मेघना गुलजारने यात मनोरंजनाचा भागही तितक्याच अलगदपणे हाताळला आहे. चित्रपटात थरारक कथानकासोबतच एक प्रेमकहाणीही हळुवरा उमलताना दिसते. अर्थात यात कुठेही अतिरंजकता नाही ही बाबही तितकीच खरी.
स्त्री:
भयपट आणि विनोदी चित्रपट ही तशी दोन टोके. या दोन्ही टोकांना एकत्र आणण्याचा फारसा प्रयत्न हिंदी चित्रपटांमधून झालेला नाही. अनेकदा विनोदी चित्रपटांतून भूतपिशाच्च संकल्पनेचा वापर वातावरणनिर्मितीसाठी केला गेला आहे. अन्यथा हे दोन स्वतंत्र जॉनर म्हणूनच आले आहेत. अशा वेळी भूतपिशाच्च ही संकल्पनाच मध्यवर्ती ठेवून भयपटाची साचेबद्ध मांडणी न करता त्यात परिस्थितीनुसार विनोदाची फोडणी देत दिग्दर्शक अमर कौशिक याने ‘स्त्री’रंजक पद्धतीने समोर आणला आहे.
मध्यप्रदेशातील चंदेरी गावात चित्रपटाची कथा घडते. विकी (राजकुमार राव), बिट्टू (अपारशक्ती खुराणा) आणि दाना (अभिषेक बॅनर्जी) हे तिघे या गावातले ‘अट्टल’ मित्र. विकीच्या वडिलांचे टेलरिंगचे दुकान आहे. विकीचा नवनव्या फॅ शनचे कपडे शिवण्यात हातखंडा आहे, मात्र खास राजेशाही शैलीत जगण्याची सवय असलेल्या विकीला हे काम मान्य नाही. बिट्टूचाही तयार कपडय़ांचा व्यवसाय आहे. आपापली कामे झाली की गावात भटकायचे, आपल्यायोग्य मुलगी शोधत फिरायचे अशी उडाणटप्पूगिरी करणाऱ्या या तिघांचीही स्त्रीशी गाठ पडते. चंदेरी गावात पूजेच्या चार दिवसांत स्त्री नावाचे हे भूत येते आणि घरातील पुरुषांना गायब करते. फक्त त्यांचे कपडे तेवढे घरच्यांसाठी मागे सोडते. याच दरम्यान विकीची गाठ एका मुलीशी पडते. विकी तिच्या प्रेमात पडला आहे, मात्र ती त्याच्याव्यतिरिक्त कोणाला भेटलेली नाही. विकीचे तिच्या प्रेमात पडणे आणि त्याच वेळी स्त्रीचा गावात झालेला प्रवेश या दोन समांतर पातळीवर सुरू असणाऱ्या गोष्टी एकत्र येतात तेव्हा विकी आणि बिट्टूचा मित्र दानाचाही यात बळी गेलेला असतो. तेव्हा मात्र विकी पेटून उठतो. स्त्रीच्या संदर्भातील सगळे ‘ग्यान’असणारे रुद्र चाचा (पंकज त्रिपाठी) यांच्या मदतीने विकी आणि बिट्टूची दानाला शोधण्याची मोहीम सुरू होते. स्त्री कोण असते, तिच्यामुळे गावात काय गोंधळ होतो, दाना परत मिळतो का, गाव स्त्रीच्या कचाटय़ातून बाहेर येते का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी चित्रपट पाहायलाच हवा.
जाणून घ्या >> कसा आहे स्त्री हा चित्रपट
नक्की वाचा >> स्त्रीने तिकीटबारीवर केली इतक्या कोटींची कमाई
भय आणि विनोदाचे अफलातून मिश्रण करतानाच नावाप्रमाणेच स्त्रीभोवती असलेल्या अनेक जुनाट कल्पना, बुरसटलेला दृष्टिकोन याचाही समाचार दिग्दर्शकाने घेतला आहे. याचे श्रेय जेवढे दिग्दर्शकाला जाते तेवढेच या चित्रपटाची कथा लिहिणाऱ्या राज निदिमोरू आणि कृष्णा डी. के. या दिग्दर्शकद्वयीलाही जाते.
हा सिनेमा आवडला असेल तर ही बातमीही आवडेल >> ’स्त्री’ परत येणार!
बधाई हो:
आपल्याकडे आई-वडील, आजी-आजोबा, भाऊ-बहीण अशी सगळी नाती अगदी चपखल समीकरणांत बसवलेली असतात. यात प्रत्येकाची भूमिका ठरलेली असते, त्या-त्या भूमिकेनुसार त्यांनी त्यांच्या जबाबदाऱ्यांच्या चौकटीत वागायचे. जरा या चौकटीबाहेरचे त्यांच्याकडून काही घडले तर समाजातच हाहाकार उडतो. या तमाशाची खरेतर काही गरज नसते. यापलीकडे जात माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे हे खूप साधेपणाने प्रेक्षकांसमोर ठेवल्याबद्दल दिग्दर्शकाला ‘बधाई’ द्यायला हवी.
व्यक्तिरेखांची अचूक बांधणी करून, उगाच शब्दबंबाळ न करता कित्येकदा त्यांच्या चेहऱ्यांवरच्या हावभावातून दिग्दर्शक आपली गोष्ट सहजतेने मांडतो. अर्थात, नीना गुप्ता, गजराज राव, आयुषमान खुराणा यांच्यासारखे तगडे कलाकार असल्याने त्यांनी वरवर साध्या वाटणाऱ्या या विषयाला एक उंची प्राप्त करून दिली आहे. चित्रपटाचे पाश्र्वसंगीतही तितकेच उत्तम आणि कथेला पुढे नेणारे असल्याने अगदी सहज आपल्या आजूबाजूला घडणारी एखादी गोष्ट अनुभवावी अशी भावना हा चित्रपट आपल्याला देतो.
Review: चांगल्या विषयासाठी ‘बधाई हो’..
नक्की वाचा >> आयुषमानच्या ‘बधाई हो’ने मोडला ‘बाहुबली २’चा हा विक्रम
पाहा PHOTO: ‘बधाई हो’ च्या सक्सेस पार्टीतले काही क्षण
एकूणच आपल्या दैनंदिन जगण्यात अशा अनेक विसंगती आहेत, ज्या लक्षात घेऊन आपण आपलेच नाही तर आपल्याबरोबरच्यांचेही जगणे सुंदर करू शकतो. पण लक्षात कोण घेतो? अशा परिस्थितीत ‘बधाई हो’सारखा अतिशय चांगला बदलत्या काळानुसार कौटुंबिक मूल्ये मांडणारा निखळ चित्रपट पर्वणी ठरतो.
अंधाधून:
शहाण्यांना दिसणारे जग खरे की वेडय़ाला जाणवणारे जग खरे, हा जसा प्रश्न. तसेच डोळस व्यक्तीला जे नजरेसमोर दिसते ते खरे की स्पर्शातून-संवेदनांमधून शोधणाऱ्या दृष्टिहीन व्यक्तीची चौकस नजर खरी? आणि त्यातही एखादी डोळस व्यक्ती अंधाच्या नजरेने जग शोधत असेल तर.. एकमेकांत अडकलेल्या अशा चिवित्र प्रश्नांची मालिकाच उभी करण्याचे कारणही तसेच आहे. एकापाठोपाठ एक शब्दश: अंदाधुंद कारभार वाटावा अशा घटना आपल्यासमोर घडत जातात. त्यातून बाहेर पडायचा एक चांगला मार्ग आणि एक वाईट मार्गही आपल्याला माहीत असतो. आपण तो प्रयत्न करायला जावे तर आणखी भलतेच काही घडते. इतक्या वेगाने आणि विचित्र घडणाऱ्या घटना जिथे ना त्या प्रसंगांचा थांग लागतोय ना त्यात सामील असणाऱ्या व्यक्तीच्या मनाचा तळ गाठता येतोय.. अशा घटनांच्या चित्रविचित्र ससेमिऱ्यात अडकवून आपलीच गंमत आपल्याला अनुभवायला लावणारा असा अप्रतिम वेगळा चित्रपट दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी दिला आहे.
पुण्यात राहणारा आकाश (आयुषमान) हा पियानो वाजवून घरगाडा चालवणारा असतो. पियानोची प्रचंड आवड असलेल्या आकाशचं लंडनला जाऊन पियानो शिकण्याचं स्वप्न असतं. पण अचानक एके दिवशी तो गुन्ह्याच्या जाळात अडकला जातो. हत्येप्रकरणी तो घटनास्थळी असल्याने पोलिसांना जबाब देण्यासाठी त्याला भाग पडतं. हा गुंता सोडवण्याच्या प्रयत्नात त्याला पुढे बऱ्याच अडचणी येतात. यातूनच साकार होतो उत्कंठावर्धक, शेवटपर्यंत कथेशी जोडून ठेवणारा ‘अंधाधून’.
AndhaDhun Movie Review: उत्कंठावर्धक ‘अंधाधून’
नक्की वाचा >> चित्र रंजन : डोळस चित्रानुभव
जाणून घ्या>> ऑक्टोबर महिन्यात चित्रपट ठरला नंबर एक
‘अंधाधून’बद्दल एका ओळीत सांगायचे झाल्यास, सिनेमा मस्ट वॉच यादीमध्ये हवाच.
तुंबाड
भावभावना, विचार हे स्पष्टपणे व्यक्त करायचे असतील तर त्याचं प्रभावी माध्यम म्हणजे लेखणी. या लेखणीला धार मिळते ती शब्दांची. त्यामुळे एखादा लेखक आपले विचार लिखाणातून व्यक्त करत असतो. या लिखाणामध्ये लेखकाचे विचार, त्याने जीवनात घेतलेला अनुभव आणि त्याची कल्पनाशक्ती यांची सांगड घातलेली असते. अशाच या तीन गोष्टींचा संगम ‘तुंबाड’ या चित्रपटामध्ये झाल्याचं पाहायला मिळतं. राही बर्वे यांची लेखणी त्यांना स्वस्थ बसू देईना त्यामुळे त्यांनी दहा वर्षापूर्वीच ‘तुंबाड’चं कथानक लिहीलं होतं. जे आज प्रत्यक्षात उतरलं आहे.
विशेष म्हणजे दहा वर्षांचा संघर्षाचा काळ ओलांडल्यानंतर ‘तुंबाड’ साकरण्यात आला आहे. त्यामुळे या चित्रपटाची कथा, मांडणी, ‘व्हीएफएक्स’चा वापर आदी सगळ्याच बाबतीत एक वेगळा प्रयोग असल्याचं दिसून येतं. या कारणास्तव चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक राही बर्वे, निर्माते आनंद एल. राय यांना हा चित्रपट यशस्वी करण्यात यश आल्याचं दिसून येत आहे.
नक्की वाचा >> असा साकारला चित्तथरारक ‘तुंबाड’
Tumbbad Movie Review: थरकाप उडविणारा ‘तुंबाड’
‘तुंबाड’मधील प्रत्येक गोष्ट सत्य वाटावी यासाठी चित्रपटाच्या टीमने प्रचंड मेहनत घेतली असून पावसामध्ये एका दृष्य चित्रीत करण्यासाठी दिग्दर्शक-निर्मात्यांनी खऱ्या पावसाची वाट पाहिल्याचं दिसून आलं.
नक्की वाचा >> स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकाने ‘तुंबाड’च्या दिग्दर्शकाची ही पोस्ट वाचाच
अनेक हिंदी चित्रपटांची निर्मिती करणारे आनंद एल. राय यांनी ‘तुंबाड’च्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं असून त्यांचा हा पहिला प्रयोग यशस्वी ठरला आहे.