आज मराठी चित्रपटातून अनेक प्रकारचे विषय हाताळले जात असल्याचे विशेष कौतुक होत असले तरी फार पूर्वी मराठी चित्रपट काही विशिष्ट चौकटीतच अडकला होता, असे असले तरी तेच त्याचे खास वैशिष्ट्य होते. असेच एक वैशिष्ट्य म्हणजेच मराठी चित्रपटाची नायिका म्हणजे ‘लेक चालली सासरला’ ही संस्कृती! अर्थात सासूबाईंकडून सतत होणारे अन्याय हे अशाच चित्रपटाचे कथेचे सार आणि तात्कालिक रसिकांना ( खास करुन ग्रामीण भागातील) असेच चित्रपट खूप आवडत. ‘रसिकराज प्रॉडक्शन्स’चा ‘लेक चालली सासरला’ (१९८४) अगदी तसाच. अॅड. सुप्रिया सरवटे यांची ही कथा होय. निर्माते अण्णासाहेब देउळगावकर यानीच ना. ग. करमरकर यांच्या जोडीने पटकथा व संवाद लिहिले. तर संकलक एन. एस. वैद्य हे याच चित्रपटापासून दिग्दर्शक झाले.

या चित्रपटाची केवढी तरी वैशिष्ट्ये आहेत. विशेष म्हणजे ती या चित्रपटाच्या कथेच्या ओघात आहेत. आज हे कथासूत्र कदाचित फारसे दमदार वाटणार नाही. पण त्या काळात ते सामाजिकदृष्ट्या खूपच चर्चेचे ठरले. एका गरीब माता-पित्याच्या ( शरद तळवळकर व अलका इनामदार) कन्येचा ( अलका कुबल) विवाह एका श्रीमंत युवकाशी ( महेश कोठारे) होतो. या युवतीचा भाऊ ( लक्ष्मीकांत बेर्डे) वगैरे कुटुंबिय खूप चांगला आशिर्वाद देतात. पण… सासरी पाऊल टाकल्यापासूनच कजाग, कपटी सासू ( शशिकला) या सूनेचा फारच छळ करु लागते. दुर्दैवाने या सोशिक नायिकेचा नवरा देखील हुंड्यासाठी प्रचंड प्रमाणात छळ सुरु करतो. नायिकेचा गरीब पिता पैसे आणणार कोठून? हा छळ वाढत वाढत जातो व नवरा आणि सासू ( ती विधवा असते) या नायिकेला चक्क जाळतात.

समाजात अशा घटना कुठेना कुठे होतच असतात त्यातीलच ही एक. त्यामुळेच या चित्रपटाला पुणे शहरातील प्रभात चित्रपटगृहात रौप्य महोत्सवी यश लाभले यात आश्चर्य ते काय? या चित्रपटाच्या प्रीमियरची पार्टी लग्नाच्या हॉलमध्ये ठेवल्याचे आठवतयं. ( येथे निर्माता दिसतो म्हणूयात). या चित्रपटाची वैशिष्ट्ये म्हणजे, शशिकलाने खूपच दिवसांनी मराठी चित्रपटात भूमिका साकारली. महेश कोठारेने जणू खलनायक साकारला. अलका कुबलला या चित्रपटाने पहिले यश मिळवून दिले व पारंपरिक नायिका अशी ओळख दिली. लक्ष्मीकांत बेर्डे, सविता प्रभुणे यांनाही या चित्रपटाने प्रकाशात आणले. सर्वच कलाकारांसाठी हा चित्रपट महत्त्वाचा ठरला. चित्रपटाच्या जगात यशच महत्त्वाचे असते, ते हे असे.

त्या काळात मराठीत प्रामुख्याने अशाच सामाजिक कौटुंबिक चित्रपटांची चलती होती. जोडीला ग्रामीण व विनोदी चित्रपट बनत. पण याच चित्रपटांनी मराठी चित्रपट जगवला-रुजवला त्याचीच गोड फळे आज मिळताहेत. ‘लेक चालली सासरला’ हे केवळ चित्रपटाचे नावच नव्हे तर त्या काळातील मराठी चित्रपटाची ती एक महत्त्वपूर्ण ओळख होती. चित्रपटातील गाणी अण्णासाहेब देउळगावकर यांची होती, तर संगीत राम-लक्ष्मण यांचे होते.
दिलीप ठाकूर

opposite nature partner
विरुद्ध स्वभावाचा जोडिदार मिळाला तर?

Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…

Avimukteshwaranand Saraswati Criticized mohan bhagwat
Avimukteshwaranand Saraswati : मोहन भागवतांच्या वक्तव्यावर भडकले शंकराचार्य, “सत्ता हवी होती तेव्हा मंदिराचा जप सुरु होता, आता…”

Sridevi
श्रीदेवीला पाहताच विनोद खन्ना, ऋषी कपूर व इतर दिग्गज अभिनेत्यांनी केलेली ‘ही’ गोष्ट; प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणाले, “अचानक ते…”

Pankaj Tripathi
पंकज त्रिपाठी दशावतार लोककला कोकणातल्या ‘या’ गावी शिकले; अनुभव सांगत म्हणाले, “मुंबईत येण्याआधी नशिबाने…”

Outhouse marathi Movies Acting Movies
सहज अभिनयाची पर्वणी

Marathi Book Ek hoti Maya Anant Sonawane Renuka Publications entertainment news
माया वाघिणीची रसभरित कहाणी

art market Best Visual Arts Art exhibitions
कलाकारण : आपल्या काळाकडे प्रयत्नपूर्वक पाहणं…

Story img Loader