आजच्या सोशल साईटसच्या काळात नवीन चित्रपटाची प्रसिध्दी क्षणात दूरवर पोहचते, पण जेव्हा रस्त्यावर साईकलरिक्षावरून भोंगा घेवून ती केली जाई तेव्हा… मुंबई-पुण्यासारख्या शहरातूनही ती होई. तर मग ग्रामीण भागाचे काय? शहरात पूर्वी रस्त्यावरच्या खांबावरची पोस्टर्स, मोक्याच्या ठिकाणी होर्डिंग्ज, रेल्वे स्टेशनवरची पोस्टर्स अशी सार्वजनिक स्थळे चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी प्रामुख्याने असत. जोडीला बसच्या स्टॉपवर आणि मागे तसेच साईकलरिक्षावरचा भोंगा याबरोबरच नुसते हातगाडीवर दोन्ही बाजूला भले मोठे पोस्टर असे. विशेषत: गर्दीच्या ठिकाणी अशी गाडी फिरे. भोंगावाला तर उन्हाचा त्रास सहन करीतच एका हाताने सायकल सांभाळत ओरडत जाई. मध्येच मार्केट परिसर लागताच उतरून प्रचाराला लागे. कधी चित्रपटाच्या नावाची पत्रकेही वाटे. गावागावात घोडागाडी आणि बैलगाडीत ताशा वाजवत हा ‘खेळ’ चाले. गाडी चालता चालता उडवलेली हिरवी-पिवळी-लाल पत्रके गोळा करण्यातही वेगळा आनंद मिळे. बरं, खेड्यापाड्यात कोणत्याही वारी चित्रपट झळके आणि गर्दीच्या हिशोबात चार-सहा दिवसाचा मुक्काम करे. त्यामुळे अशी ‘सिनेमावाली गाडी’ कधीही येवू शकते याची जणू सवय झालेली. शहरात मात्र शुक्रवार हाच इंग्रजांच्या काळापासून नवीन चित्रपट प्रदर्शनाचा वार. आपल्या देशात हिंदी आणि भाषिक चित्रपटाची लोकप्रियता खोलवर आणि अगदी दूरवर. हे पोहचणे पूर्वी खूप कष्टकारक होते तरी त्यात ती फिल्मी सायकलस्वारी जणू हा ‘आपलाच चित्रपट आहे’ या भावनेने होई. असे प्रेम आणि आपुलकी हेच आपल्या चित्रपट प्रसार संस्कृतीचे एकेकाळचे वैशिष्ट्य. ही गोष्ट खूप साधी आणि सोपी वाटते. प्रत्यक्षात तोदेखील चित्रपटाच्या इतिहासाचा भाग आहे.
दिलीप ठाकूर
फ्लॅशबॅक : भाई और बहनों जरा इधर देखो…
पूर्वी चित्रपटाची प्रसिध्दी रस्त्यावर साईकलरिक्षावरून भोंगा घेवून केली जाई.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 22-04-2016 at 01:05 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flashback film promotion