छायाचित्रातील अभिनेत्रीला तुम्ही पटकन ओळखले का?… बरं, ओळखले तरी तुम्हाला या चित्रपटाचे नाव सांगता येईल का?… ही माधुरी दिक्षित आहे, अगदी सुरुवातीच्या दिवसातील. म्हणजे, ‘अबोध’, ‘उत्तर दक्षिण’, ‘मोहरे’, ‘हिफाजत’ अशा तिच्या चित्रपटाना रसिक नाकारत होते. त्या दिवसातला हा तिचा ‘बॉम्बे मेरी है’ हा बेंजामीन गिलानीसोबतचा चित्रपट त्याचे नेमके काय झाले हे कधीच कळले नाही. निर्मितीच्या विविध टप्प्यांवर चित्रपट बंद पडणे हे स्वाभाविक आणि नेहमीचेही! माधुरीचाच शेखर सुमनसोबत ‘मानवहत्या’ नावाचा चित्रपट होता. ‘ब्रॉडवे मिनी थिएटर’मध्ये त्याची ट्रायल पाहाताना कससंच वाटले हो. कारण त्यातील माधुरीची काही दृश्यातील वेषभूषा आणि प्रणयप्रसंग जरा धाडसीच होते. पडत्या काळामुळे तिला अशा अभिनयाचा मार्ग स्वीकारावा लागला असावा. अशी स्वत:चीच समजूत करून घेण्याशिवाय पर्याय नव्हता. चित्रपटदेखिल सुदैवाने प्रदर्शित न झाल्याने हायसे वाटले. तेवढीच माधुरीची ही दृश्ये चर्चेचा विषय व्हायची राहिली. चित्रपटाच्या जगात न घडणाऱ्या गोष्टीतून बरेच साध्य होते. ते हे असे. पण टीनू आनंद दिग्दर्शित ‘शनाख्त’ हा माधुरीचा चित्रपट पूर्ण वाहयला हवा होता. अमिताभसोबतची माधुरीची ही ‘पहिली संधी’ होती. ‘तेजाब’च्या यशाने माधुरी नावारुपास येत असतानाचे ते ‘मोहिनी’मय दिवस होते. चेंबूरच्या ‘आर. के. स्टुडिओ’त मालडब्याच्या सेटवर हा मुहूर्त झाला. साखळदंडाने बांधलेल्या अमिताभला माधुरी बिलगते आणि दोघे अन्यायाविरुध्द लढण्याची शपथ घेतात, असे मुहूर्ताचे दृश्य पाहाताना माधुरीला होत असलेला आनंद आताही स्पष्ट आठवतोय. याचे कारण तिच्या भावना खऱ्या होत्या. माधुरीच्या डब्यात गेलेल्या चित्रपटाच्या गोष्टीही साध्या नाहीत, हे महत्वाचे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा