‘पांडू हवालदार’ (१९७५) म्हटलं रे म्हटलं की दादा कोंडके आठवतातच पण त्यांच्याबरोबरच अशोक सराफने साकारलेला ‘सखाराम हवालदार’देखिल तितकाच आठवतो. खरं तर त्या वेळेस दादा कोंडकेंची आपली एक भाबडेपणातून साध्य होणारी विनोद शैली पाह्यला हमखास गर्दी होई. या चित्रपटापासून तर दादा दिग्दर्शक देखील झाले. त्याची हुकमी नायिका उषा चव्हाणसोबत त्यांची यात छान जोडी देखील जमली. अशा वेळेस अशोक सराफ भाव खाऊन गेला हे विशेषच. मराठी-हिंदी चित्रपटातून असे सहनायक प्रचंड लोकप्रिय ठरणे होतच असते. पण अशोक सराफला ‘बहुरुपी ‘ इत्यादी भूमिकांप्रमाणेच आजही या चित्रपटामुळेही ओळखले जातेय.

हा सखाराम अगदी बेरक्या. नाना उचापती करून पैसे खाणारा. जमेल त्या वस्तू गोळा करून घरी आणणारा. चित्रपटातील त्याची हातात कोंबडी हलवत होणारी एन्ट्रीच थियेटर्समध्ये धुमशान घाली. तो देखील पांडू हवालदारप्रमाणेच पोलीस कॉलनीत राहणारा. दोघांच्या वृत्ती, दृष्टी, कृती यात प्रचंड फरक. येथेच पटकथाकार राजेश मुजुमदार याना विनोद निर्मितीस भरपूर वाव मिळाला. पांडूची आये गावाला गेलेली तर सखारामची घरवाली माहेरी गेलेली. पांडूने आपल्या घरात एका मुक्या मुलीला आश्रय दिलेला. सखारामला वाटते दिवसभर खास खाणाखुणा केल्याने ती आपल्याला पटलीय. त्या विश्वासावरच तो रात्री अंगभर अत्तर लावून चोरपावलानी तिच्या अंथरुणात तर शिरतो. पण… प्रत्यक्षात तेथे पांडू झोपलेला असतो. हे लक्षात येताच संपूर्ण थियेटरमध्ये प्रचंड प्रमाणात हास्यकल्लोळ उठायचा. अशोक सराफचा हा अत्यंत आवडता असा विनोदी प्रसंग आहे. हे सगळेच नकळत घडते व नेमके टायमिंग साधले जातेय. म्हणूनच छान विनोद निर्मितीस वाव मिळालाय.

पण सखाराम हवालदारने लोकप्रियता मिळवून देऊनही एकदा महालक्ष्मी एक्स्प्रेसने जनता क्लासने कोल्हापूरला जात असताना खऱ्या पोलिसांनी अशोक सराफला ओळखून काही गमतीदार कॉमेंटस् करताच अशोक सराफने तोंड पलिकडे केले व डोक्यावरून चादर घेऊन पुढचा प्रवास केला. हे आजही सांगताना अशोक सराफ मनसोक्त हसतो.
दिलीप ठाकूर

Story img Loader