नाना पाटेकरने दिग्दर्शनाची हौस भागवून घेतली आणि ‘प्रहार’ घडवला असे त्याच्याच शैलीत म्हणायचे, तर त्याने त्या चित्रपटासाठी घेतलेल्या मेहनतीचे काय, ‘प्रहार’मधून त्याने सामाजिक संदेश घडवला त्याचे काय बरे, असे प्रश्न पडतात. युवकानो सैन्यात चला, देशाचे संरक्षण करण्याची जबाबदारी तुमची, त्यासाठीचे प्रशिक्षण कसे असते, त्यात सहभागी होणाऱ्यांच्या कुटुंबियांच्या कथा, व्यथा आणि मानसिकता अशा अनेक गोष्टींचे प्रामाणिक आणि माहितीपूर्ण दर्शन म्हणजे ‘प्रहार’. नानाने आपल्या बुध्दिला, मनाला आणि दृष्टिकोनाला पटेल आणि रुचेल असा ‘प्रहार’ केला. चित्रपटाला पंचवीस वर्षे होत आली तरी नानाला दिग्दर्शनाची पुन्हा संधी ती का नाही? फक्त बातम्याच तेवढ्या का येतात? असे नाना शैलीचे रोखठोक प्रश्न येवू शकतात. ‘प्रहार’च्या दिग्दर्शनाची संधी त्याला निर्माता सुधाकर बोकाडेने दिली. तो त्यास संपूर्ण स्वातंत्र्यही देई, म्हणूनच तर नाना आपल्याला हव्या असलेल्या डिंपल, माधुरी दीक्षित, गौतम जोगळेकर अशा कलाकारांना घेऊन कामाला जुंपला (आवडत्या कामात झोकून देणे ही नानाची मनस्वी वृत्ती) फिल्मालय स्टुडिओत दीर्घकाळासाठी लावलेल्या सेटवर एक-दोनदा जाण्याचा आलेला योग रोमांचक होता… ‘प्रहार’चा प्रिमियरही चित्रपटाच्या स्वरुपानुसार आणि नानाच्या मनानुसार (की मतानुसार?) व्हायला नको का? तात्कालिन संरक्षणमंत्री शरद पवार यांच्या खास उपस्थितीत व्हावा अशी ‘नाना इच्छा’ आणि त्याच्या पूर्णतेचा क्षण म्हणजे नानाकडून स्वागत. त्याचेच हे छायाचित्र.
दिलीप ठाकूर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा