dilip thakurसिनेमाच्या जगात प्रत्याक्षात ते दोघे अखंड प्रेमात असतील तर त्यांना प्रणयाचा अभिनय करावा लागत नाही. कॅमेऱ्याचे भान न ठेवता ते छान प्रेमप्रसंग रंगवतात आणि असे प्रणयप्रसंग पाहायला प्रेक्षक आतूर असतो. ऋषि अर्थात चिंटू कपूर आणि नीतू सिंग ही जोडी यात सर्वोत्तम. खरं तर ‘बॉबी गर्ल’ म्हणून नीतूची निवड व्हावी म्हणून तिच्या आईने बरेच प्रयत्न केल्याची कुजबूज गाजली, पण ‘वारीस’ इत्यादी चित्रपटांमधून बालकलाकार म्हणून नीतूचा चेहरा परिचित असल्यामुळे राज कपूरने नकार दिला. म्हणून नितूने हार कुठे हो मानली. ‘जहरिला इन्सान’मध्ये मौशमी चटर्जीच्या बरोबरीने तिनेही चिंटूची नायिका साकारली. यश आणि लोकप्रियता यासाठी ‘खेल खेल में’पर्यन्त दोघाना थांबावे लागले. यातले ‘एक मैं और एक तू’ असो वा ‘खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो’, हे दोघे त्या गाण्यात खरेखुरे प्रेमात पडलेत हे जाणवते. अशा लोकप्रिय जोडीला निर्माता दिग्दर्शकानी साईन करण्यात धमाल उडवली ‘यह तो होना ही था’! रसिकांनी या जोडीवर प्रेम केले. ‘जिंदा दिल’, ‘रफू चक्कर’, ‘कभी कभी’, ‘धन दौलत’, ‘झूठा कही का’, ‘दुनिया मेरी जेब में’, ‘अमर अकबर अॅन्थनी’… जोडीचे चित्रपट कधी यशस्वी ठरले, कधी नाकारलेही गेले, पण त्या दोघांनी मात्र प्रत्यक्ष जीवनातही एक होण्याचा निर्णय केव्हाच घेतला होता. बरं, त्यांच्या प्रेमाच्या भानगडीत फारसे वाद नाहीत. कोणी दुसरीकडे झुकतोय असा सुगावा नाही. त्यामुळे कुचाळक्या शिजवण्याऱ्यांचे ‘लय भारी’ वांदे झाले. दोघांचा सुखाचा संसार सुरू असताना एकदा कधी तरी त्यांच्या भांडणाचा आवाज पाली हिलवरील बंगल्याबाहेर आला तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. तर ‘बोल राधा बोल’ इत्यादीत जुही चावलाच्या सहवासात चिंटू तजेलदार राहतो हे लक्षात आल्याने नीतूच त्याला त्यासाठी प्रोत्साहन देतेय अशीही खमंग बातमी रंगली.

Story img Loader