मनोरंजन क्षेत्रातील टीव्ही हे प्रभावी माध्यम दरवर्षी काही नवं देऊ पाहतं आणि गतवर्षांपेक्षा वेगळं काय देऊ शकतो याचा प्रयत्न करत असतं. २०१७ या वर्षी टीव्ही माध्यम कशा प्रकारे प्रेक्षकांसमोर आलं यावर नजर टाकायला हवी. छोटय़ा पडद्याचा हा फ्लॅशबॅक या वर्षीच्या शेवटच्या दिवशी..

‘फिल्मे सिर्फ  तीन वजहसे चलती है.. एंटरटेन्मेंट, एंटरटन्मेंट और एंटरटेन्मेंट! ‘डर्टी पिक्चर’ चित्रपटातला हा संवाद अगदी योग्य वाटतो. सिनेमात मनोरंजक काही नसेल तर तो सिनेमा कधी येतो, कधी जातो कळतही नाही. पण आता हे सूत्र टीव्ही या माध्यमालाही लागू होताना दिसतंय. आता टीव्ही हे माध्यमही मनोरंजन करण्याच्या रांगेत पुढे जातंय. त्यात मनोरंजक काही असेल तरच ते चालतं नाहीतर नाही, हे या वर्षी टीव्ही माध्यमात बघायला मिळालं. २०१७ हे वर्ष टीव्ही माध्यमाला संमिश्र गेलं असं म्हणता येईल. काही मालिका, कार्यक्रमांवरून वाद झाले, काही मालिका सुरू होऊन लगेच संपल्या, काही शोजना अपेक्षित यश मिळालं नाही तर काही नवीन प्रयोग फसले.

नव्या स्वरूपाचे काही रिअ‍ॅलिटी शोज आले. ‘रायझिंग स्टार्स’ हा कलर्स चॅनलचा शो पूर्णपणे लाइव्ह केला होता. ऑडिशनपासून ते अंतिम फेरीपर्यंत सगळं लाइव्ह दाखवण्यात आलं होतं. गाण्यांचा हिंदी रिअ‍ॅलिटी शो अशा प्रकारे पहिल्यांदा लाइव्ह बघायला मिळाला. हा नवा प्रयोग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. तर आणखी एका रिअ‍ॅलिटी शोने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. ‘दिल है हिंदुस्तानी’ हा ‘स्टार प्लस’वरचा शो लोकप्रिय ठरला. या शोमध्ये जगभरातून स्पर्धक आले होते. तसंच यात वयाची कोणतीच अट नव्हती. ग्रूप, सोलो, डय़ुएट असं कोणत्याही प्रकारे स्पर्धक यात सहभागी होऊ  शकले. गाणं, नृत्य, अभिनय याशिवाय आणखी एक रिअ‍ॅलिटी शो तरुणांच्या नजरेस पडला. ‘एम टीव्ही ड्रॉप आउट’ हा तो शो. स्टार्ट अपचा ट्रेण्ड सध्या जोरात आहे. याच मुद्दय़ाला धरून ‘ड्रॉप आउट’ हा शो सुरू होता. देशभरातून स्टार्ट अप करू इच्छिणाऱ्या विविध तरुणांसाठी हा शो म्हणजे पर्वणी ठरली. या शोमध्ये निवडलेल्या स्पर्धकांना स्टार्ट अप सुरू करण्यासाठी आवश्यक असलेलं प्रशिक्षण शोमध्ये देण्यात आलं. अर्थात, या शोमध्ये ‘एंटरटेन्मेंट’ असल्यामुळेच प्रेक्षकांनी त्याची दखल घेतली. एंटरटेन्मेंटसाठी आवश्यक असणारा ड्रामा त्यातही आणला गेला.

नव्या रिअ‍ॅलिटी शोबद्दल बोलताना मालिकांमधल्या प्रयोगांना विसरून चालणार नाही. खरंतर ‘आमची मालिका वेगळ्या धाटणीची आहे’ असं सांगून एका विशिष्ट टप्प्यापासून ती तद्दन सास-बहू ड्रामाच होते. असं असताना काही मराठी मालिकांनी विशेष लक्ष वेधलं. ‘झी युवा’च्या ‘रुद्रम’ या मालिकेचं नाव त्यामध्ये सर्वात पहिलं असेल. मुक्ता बर्वेसह अनेक मातब्बर कलाकार असलेली ठरावीक भागांची ही मालिका लोकप्रिय ठरली. या मालिकेमुळे ‘झी युवा’ हे चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचले. नवऱ्याच्या खुनाचा सूड हे इतकं साधं कथानक असलं तरी या मालिकेने घेतलेली वळणं, टिकवून ठेवलेलं रहस्य, कलाकारांचे अभिनय, दिग्दर्शन या साऱ्यामुळेच ती मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. अशीच रहस्यं टिकवून ठेवलेली दुसरी मालिका म्हणजे ‘स्टार प्रवाह’ची ‘दुहेरी’ ही मालिका. दोन बहिणींच्या आयुष्याची ही कहाणी प्रेक्षकांना आवडली. ‘कलर्स मराठी’ची ‘चाहूल’ ही मालिकाही रहस्यमय धाटणीची होती. या मालिकांमुळे तद्दन ड्रामेबाजी करणाऱ्या मालिकांपासून थोडा ब्रेक मिळाला.

हे वर्ष गाजलं ते काही वादांमुळेही. सगळ्यांच्या लक्षात राहिलेला वाद म्हणजे कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांचा. सिडनीला एक कार्यक्रम करून भारतात परतत असताना कपिल शर्माचा सुनील ग्रोव्हरसोबत विमानात झालेला वाद या वर्षी गाजला. याचा परिणाम म्हणून सुनील ग्रोव्हर ‘कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमातून बाहेर पडला. त्यानंतर कपिलचा शोसुद्धा बंद झाला. ‘खिलाडीओं का खिलाडी’ अक्षय कुमारसुद्धा या वर्षी छोटय़ा पडद्यावर येऊ न वादात सापडला. ‘ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कार्यक्रमात त्याने मेंटॉर मलायका दुवा हिच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे त्या दोघांमध्ये सोशल मीडियावर वाद सुरू होता. त्यातच त्या कार्यक्रमात असलेले झाकीर खान, मलायका दुवा आणि हुसेन दलाल या मेंटॉरना बदललं गेलं. कार्यक्रमाला अपेक्षित रेटिंग्ज मिळत नाही असं सांगून त्यांच्या जागी साजिद खान आणि श्रेयस तळपदे यांची वर्णी लागली. या वर्षीच्या लोकप्रिय आणि चर्चेत राहिलेल्या आणखी दोन मालिका म्हणजे ‘झी मराठी’ची ‘तुझ्यात जीव रंगला’ आणि सोनी चॅनलची ‘पहरेदार पिया की’. ‘तुझ्यात..’ या मालिकेची लोकप्रियता तुफान आहे. राणादा आणि पाठक बाई यांचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढतोय. या वाढत्या लोकप्रियतेमुळेच कोल्हापूरमधील त्यांचं शूटिंगचं ठिकाण पर्यटन स्थळासारखं झालं आहे. त्यांना भेटायला येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या वाढून तिथे गाडय़ा येण्याचं प्रमाणही तितकंच आहे. त्यामुळे शूटिंग होत असलेल्या वसगडे गावात पार्किंगची मोठी समस्या भेडसावत असल्यामुळे तेथील लोकांनी शूटिंग बंद करण्याची नोटीस दिली होती. पण ‘अखिल भारतीय मराठी चित्रपट मंडळा’च्या मध्यस्थीनंतर मालिकेचं शूटिंग पुन्हा सुरू झालं. तर ‘पहरेदार पिया की’ या मालिकेचा वाद तर खूपच चिघळला. नऊ  वर्षांचा मुलगा अठरा वर्षांच्या तरुणीशी लग्न करतो अशी या मालिकेची एका ओळीतली कथा आहे. ही मालिका रात्री साडेआठ वाजता टीव्हीवर दाखवली जात होती. या मालिकेत दाखवत असलेल्या अतिरंजित चित्रणामुळे काही प्रेक्षकांनी त्यावर आक्षेप घेतला. मालिका बंद करा, असं सांगणारी एक याचिकाही दाखल केली होती. त्यावर बरीच चर्चा झाल्यानंतर ती मालिका बंद करण्यात आली. मालिका किंवा रिअ‍ॅलिटी शो बंद करा अशी मागणी याआधीही केली गेली आहे. त्यात सर्वाधिक वेळा मागणी करण्यात आलेला शो म्हणजे ‘बिग बॉस’, मात्र तो कधीच असा अध्र्यावर बंद झाला नाही.

एखादं वर्ष एखाद्या मालिकेचं किंवा रिअ‍ॅलिटी शोचं असतं. म्हणजे त्या वर्षी ती मालिका किंवा शो जबरदस्त गाजतो. त्याला प्रेक्षकांची वाहवा मिळते. पण अचानक काही कारणास्तव त्या कार्यक्रमांची जागा दुसरा कार्यक्रम घेतो. ‘चला हवा येऊ  द्या’ या शोचं असंच झालं. तुफान लोकप्रिय असलेला हा शो दोन महिन्यांच्या ब्रेकवर गेला. एवढा चांगला कार्यक्रम अचानक ब्रेक जातोय म्हटल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण विश्व दौऱ्यावर गेलेली या कार्यक्रमाची टीम नवीन वर्षांच्या दुसऱ्या आठवडय़ात प्रेक्षकांसमोर दाखल होतेय, ही त्या कार्यक्रमाच्या चाहत्यांसाठी खूशखबर आहे. त्याच्या जागी सुरू झालेला ‘सारेगमप’ हा शो मात्र पूर्वीसारखी पकड घेऊ  शकला नाही. असाच ‘द कपिल शर्मा शो’ हा कार्यक्रमही मध्येच बंद केला. कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्या वादाचा परिणाम त्यांच्या कार्यक्रमावर निश्चितच झाला. शिवाय कपिल शर्माची तब्येत सातत्याने बिघडत असल्याने शूटिंग वारंवार रद्द करावं लागत होतं. त्यामुळे हा शो बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

‘स्टार भारत’ हे नवं चॅनल सुरू झालं. ‘स्टार नेटवर्क’च्या ‘लाइफ ओके’ या चॅनलच्या जागी ‘स्टार भारत’ या चॅनलने त्याची विशेष दखल घ्यायला भाग पाडलं. त्यावरील ‘ओम शांती ओम’ या कार्यक्रमात पहिल्यांदा बाबा रामदेव परीक्षकांच्या खुर्चीत बसले. हा कार्यक्रम फार काळ चालला नसला तरी आताच्या रिअ‍ॅलिटी शोच्या गर्दीत भक्तिगीतांचा रिअलिटी शो असावा ही बाब नोंद घेण्यासारखी आहे. या चॅनलची ‘क्या हाल है मिस्टर पांचाल’ ही मालिका पहिल्या पाच मालिकांमध्ये सातत्याने आहे. ‘झी युवा’ या मराठी चॅनलला सुरू होऊ न दीड वर्ष झालं. सुरुवातीचा काळ प्रेक्षकांची आवडनिवड चाचपडण्यात गेला असला तरी आता चांगले कलाकार, चांगले विषय घेऊन वैविध्यपूर्ण मालिका आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. ‘रुद्रम’ या मालिकेने ते सिद्धही केलं आहे. नवीन वर्षांत अशाच मालिका ‘झी युवा’ प्रेक्षकांसाठी आणेल अशी आशा करूया. नित्यनियमाने वर्षभर होत असलेले रिअ‍ॅलिटी शो ठरल्याप्रमाणे झाले. ‘इंडियन आयडॉल’, ‘डान्स इंडिया डान्स’, ‘सारेगमप’ (हिंदी), ‘व्हॉइस इंडिया किड्स’, ‘बिग बॉस’, ‘खतरों के खिलाडी’, ‘कौन बनेगा करोडपती’, ‘सुपर डान्सर चॅप्टर टू’ हे रिअ‍ॅलिटी शो चॅनलच्या गणितानुसार त्या त्या वेळी प्रेक्षकांसमोर आले.

टीव्ही हे प्रभावी माध्यम आहे. घरोघरी टीव्ही असल्यामुळे तो असंख्य लोकांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे त्यात सतत नावीन्य ठेवावं लागतं. म्हणूनच या माध्यमातील स्पर्धाही तितकीच तगडी असते. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी खासगी चॅनल्सची संख्या वाढू लागली होती. आता तर ही संख्या इतकी वाढली आहे की एकाच समूहाच्या वेगवेगळ्या दोन चॅनल्समध्येही ती स्पर्धा दिसून येते. टीव्ही हे माध्यम प्रचंड मोठं आणि ताकदीचं आहे. यात होत असणारे प्रयोग काही वेळा फसणार तर काही वेळा यशस्वी होणार. २०१७ हे वर्ष असंच संमिश्र होतं. काही मालिका, कार्यक्रम लोकप्रिय झाले तर काही नाही. काही वाद झाले, काही लोकप्रिय कार्यक्रम बंद झाले, काही मालिका खूप कमी वेळात संपवल्या, काही नवीन प्रयोग पसंतीस उतरले नाहीत. पण म्हणून ही स्पर्धा थांबली नाही. तर आणखी अटीतटीची झाली आणि पुढेही अशीच असेल, यात शंका नाही.

छोटय़ा पडद्याकडे वळण

काही कलाकार काही मालिकांच्या निमित्ताने छोटय़ा पडद्याकडे वळले. अक्षय कुमार काही वर्षांपूर्वी ‘खतरों के खिलाडी’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत होता. या वर्षी तो ‘ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’मुळे पुन्हा एकदा टीव्हीवर दिसला. आमिर खान आजवर एकाही रिअ‍ॅलिटी शोमध्ये गेला नाही. पण या वर्षी त्याने सगळ्या हिंदी बडय़ा रिअ‍ॅलिटी शोला मागे सारत ‘चला हवा येऊ  द्या’चं व्यासपीठ गाठलं. ‘पाणी फाउंडेशन’च्या उपक्रमाच्या निमित्ताने झालेलं त्याचं छोटय़ा पडद्यावरचं पदार्पण अनेकांना भावलं. नीलकांती पाटेकर या अनुभवी अभिनेत्री स्टार प्रवाहच्या ‘गोठ’ या मालिकेतून अनेक वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीस आल्या. त्यात त्यांची भूमिका खलनायिकेची असली तरी ती प्रचंड लोकप्रिय ठरली. महेश काळे हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक पहिल्यांदा ‘सूर नवा ध्यास नवा’ या ‘कलर्स मराठी’च्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये परीक्षकांच्या खुर्चीत दिसले. पुष्कर श्रोत्री आणि प्रसाद ओक या मित्रांची जोडी मनोरंजन करण्यासाठी एकत्र ‘हम तो तेरे आशिक है’ या मालिकेमुळे प्रेक्षकांच्या समोर आली. सचित पाटील हा मराठी सिनेमांमध्ये रमलेला अभिनेता ‘कलर्स मराठी’च्या ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या कार्यक्रमातून पुन्हा एकदा टीव्हीवर झळकला. स्वप्निल जोशीने ‘स्टार प्रवाह’च्या ‘नकळत सारे घडले’ या मालिकेचा निर्माता म्हणून नव्या क्षेत्रात पदार्पण केले.

हिंदी मालिका जैसे थे..

हिंदी मालिका विशिष्ट साच्यानुसार प्रेक्षकांसमोर येत होत्या. स्वयंपाकघरातलं राजकारण, नायिकेचा संघर्ष, प्रेमकहाणी, खलनायकांची कारस्थानं या सगळ्या छटा सगळ्या मालिकांमध्ये या ना त्या माध्यमातून दिसत होत्या. ‘कुमकुम भाग्य’, ‘कुंडली भाग्य’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘ये है मोहोबत्ते’, ‘बेहद’, ‘तारक मेहता का उलटा चष्मा’, ‘उडान’, ‘शक्ती’ या काही लोकप्रिय मालिका आहेत.

पौराणिक, ऐतिहासिक ..

पौराणिक-ऐतिहासिक धाटणीत ‘महाकाली’, ‘चंद्रकांता’, ‘मेरे साई’, ‘विघ्नहर्ता’, ‘पोरस’ या हिंदी मालिका सुरू आहेत, ‘पृथ्वी वल्लभ’ ही नवीन मालिका सोनी टीव्हीवर येऊ घातली आहे; तर मराठीत ‘विठू माऊ ली’, ‘संभाजी’ या मालिका आहेत. पण हिंदीतल्या ‘देवों के देव’ या मालिकेला जितका प्रतिसाद मिळाला होता तितका प्रतिसाद मिळणारी सध्या तरी कोणती मालिका नाही. पण आता सुरू असलेल्या सगळ्यात पौराणिक, ऐतिहासिक मालिका प्रचंड खर्च करत मालिका देखणी कशी दिसेल यासाठी प्रयत्नशील आहेत, हे मात्र मान्य करावं लागेल. मराठीमध्ये ‘विठू माऊ ली’ ही मालिका हळूहळू पकड घेतेय; तर ‘संभाजी’ मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसतेय.

Story img Loader