बीअर बायसेप्स या युट्यूब चॅनेलवर विविध विषयांवर आधारित पॉडकास्टच्या माध्यमातून रणवीर अलाहाबादिया लोकप्रिय ठरला. मात्र, इंडिया गॉट लेटेंटमध्ये त्याने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. इतकेच नाही तर त्याविरूद्ध विविध राज्यात पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. अनेक नामांकित व्यक्तींनी त्याच्याकडून अशा वक्तव्याची अपेक्षा नसल्याचे म्हणत त्याच्यावर टीका केली आहे. आता या सगळ्यात प्रसिद्ध युट्यूबर गौरव तनेजाने रणवीरची बाजू घेतली आहे. सुरूवातीला त्याने रणवीरवर टीका करणारा व्हिडीओ शेअर केला होता. आता मात्र रणवीरला लक्ष्य केले जात आहे, असे म्हणत त्याने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे.
त्या शोमध्ये खूप गोष्टी चूकीच्या बोलल्या गेल्या…
गौरव तनेजाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले, “जेव्हा सुरूवातीला हा वाद सुरू झाला होता. तेव्हा मी विचार केला देशातील काही युवा पीढी अजूनही संवेदनशील आहे. सगळेच मूर्ख नाहीत. मला असे वाटते की जेव्हा गोष्ट संस्कृतीची असते, परंपरेची असते तेव्हा लोक अशा गोष्टींविरूद्ध आपला आवाज उठवतात आणि ते अगदी योग्यही आहे. त्या शोमध्ये खूप गोष्टी चूकीच्या बोलल्या गेल्या आणि ते व्हायला नको होते. हे सगळे पाहिल्यानंतर मीसुद्धा त्यावर टीका केली होती. पण आता काय घडत आहे? आता त्या शोमधील या आधी येऊन गेलेल्या व्यक्तींनादेखील समन्स बजावले आहेत. विविध राज्यातील पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. रणवीरला सर्वोच्च न्यायालयात जावे लागले. जर प्रशासनाला आक्षेपार्ह भाषेची इतकीच काळजी असेल तर त्यांनी सुंदर पिचाईलासुद्धा समन्स बजावले पाहिजेत. सुंदर पिचाई हे गुगलचे सीईओ आहेत. जे युट्यूबचे मालक आहे.
आता सुंदर पिचाईला शोधा. जेव्हा तुम्ही यूट्यूबवर घाणेरड्या भाषेतील व्हिडिओ टाकत असता, तेव्हा अल्गोरिदमला कळत नाही का? तुम्ही सुंदर पिचाईला का पकडत नाही? ते फक्त कमकुवत माणसालाच पकडू शकतात. ते त्याला त्रास देऊ शकतात. प्रत्येकाला काय घडत आहे, हे स्पष्टपणे दिसत आहे. एखाद्याची शिक्षा त्यांच्या गुन्ह्याच्या प्रमाणात ठरवली पाहिजे. कायदा हा बरोबर विरुद्ध चूक यासाठी नाही, तर कोण कोणाला त्रास देऊ शकतो याबद्दल आहे आणि आता या प्रकरणातही तेच घडत आहे.
दरम्यान, रणवीर अलाहाबादियाने त्याच्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल एक व्हिडीओ शेअर करीत माफी मागितली आहे. आता या प्रकरणात पुढे काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.