माजी ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धक शेरिका डी. अरमासचे वयाच्या २६ व्या वर्षी निधन झाले. २०१५ मध्ये ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेत तिने उरुग्वे देशाचे प्रतिनिधित्व केले होते. शेरिका अनेक वर्षांपासून गर्भाशयाच्या कर्करोगाशी लढा देत होती. शेरिकाने केमोथेरपी आणि रेडिओथेरपी उपचारही घेतले होते.

हेही वाचा- ‘सॅम बहादुर’ कोण होते?

शेरिका डी. अरमासच्या निधनाच्या बातमीने तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. शेरिकाच्या निधनानंतर अनेक स्तरांतून शोक व्यक्त करण्यात येत आहे. शेरिकाच्या निधनानंतर तिचा भाऊ मायाक डी. अरमासने सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करीत त्याने लिहिलेय, “नेहमीच उंच उड माझी छोटी बहीण…” तसेच ‘मिस युनिव्हर्स’ उरुग्वे २०२२ कार्ला रोमेरोने पोस्ट शेअर करीत शेरिकाला श्रद्धांजली वाहिली आहे.

२०१५ मध्ये चीनमध्ये झालेल्या ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेत शेरिकाने भाग घेतला होता. मात्र, तिला ‘टॉप ३०’मध्ये आपले स्थान टिकवता आले नाही. शेरिकाला नेहमीच मॉडल बनायचे होते. एका मुलाखतीत तिने याबाबत खुलासाही केला होता. शेरिका म्हणालेली, “मला नेहमीच मॉडेल व्हायचं होतं; मग ती सौंदर्य मॉडेल असो, जाहिरात करणारी मॉडेल असो किंवा कॅटवॉक मॉडेल. मला फॅशनशी संबंधित प्रत्येक गोष्ट आवडते.”