‘राझ ३’, ‘जन्नत २’ आणि ‘मर्डर ३’ असे भट्ट कॅम्पच्या ‘विशेष फिल्म्स’बरोबर लागोपाठ हिट चित्रपट देणाऱ्या फॉक्स स्टार स्टुडिओने ही भागीदारी पुढे नेत आणखी तीन चित्रपटांचा करार केला आहे. मुकेश भट्ट यांच्या विशेष फिल्म्सने केलेल्या करारात एका थ्रीडीपटाचा समावेश आहे.
विशेष फिल्म्सचे हे रजत महोत्सवी वर्ष असल्याने या वर्षांसाठी म्हणून फ ॉक्स स्टार स्टुडिओबरोबर केलेला हा तीन चित्रपटांचा करार त्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. ‘सिटी लाईट्स’, ‘हमारी अधुरी कहानी’ आणि ‘मिस्टर एक्स’ अशी या चित्रपटांची नावे असून अजय बेहल, मोहित सुरी आणि विक्रम भट्ट या चित्रपटांचे दिग्दर्शन करणार आहेत, अशी माहिती महेश भट्ट यांनी दिली आहे. ‘बी. ए. पास’ या पहिल्याच चित्रपटातून लक्ष वेधून घेणारा दिग्दर्शक अजय बेहल सिटी लाईट हा चित्रपट दिग्दर्शित करणार असून राजकुमार यादव या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.
 मोहित सुरी दिग्दर्शित करणार असलेल्या ‘हमारी अधुरी कहानी’ या चित्रपटातही राजकुमारची भूमिका आहे पण, यात इम्रान हाश्मी आणि विद्या बालन ही जोडी मुख्य भूमिकेत आहे. तर थ्रीडी चित्रपटाची जबाबदारी दिग्दर्शक विक्रम भट्ट याच्यावर सोपवण्यात आली असून ‘मिस्टर एक्स’ नावाने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात अमायरा दस्तूर या नवोदित अभिनेत्रीबरोबर इम्नान हाश्मी मुख्य भूमिका साकारणार आहे.
 हे तिन्ही चित्रपट २०१४ च्या मे, नोव्हेंबर आणि फेब्रुवारी २०१५ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचेही भट्ट यांनी सांगितले.

Story img Loader