‘द केरला स्टोरी’वरून वाद निर्माण झालेला असतानाच ‘महाराष्ट्र शाहीर’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी वेगळाच मुद्दा उचलून धरला होता. ‘द केरला स्टोरी’ चित्रपट भाजपाशासित राज्यात स्पॉन्सर आणि टॅक्स फ्री होत असल्याने केदार शिंदे यांनी संताप व्यक्त केला होता. याचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणातही उमटले आहेत. राष्ट्रवादी पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही सरकारला आव्हान करत महाराष्ट्र शाहीर चित्रपट मोफत दाखवणार असल्याचे जाहीर केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“दुर्दैव… महाराष्ट्रात “केरला स्टोरी” या सिनेमाचे खास शो आपले महाराष्ट्रातले नेते प्रायोजित करून लोकांना मोफत दाखवतायत. या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने “महाराष्ट्र शाहीर” प्रदर्शित झालाय. हे या नेत्यांना ठाऊक असेल का? शाहीर साबळे कोण? हे तरी माहिती असेल का?”, असं ट्वीट दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ७ मे रोजी केले होते. ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट आधीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटावरून वाद निर्माण झालेला असतानाच काही नेत्यांनी हा चित्रपट मोफत दाखवला. त्यामुळे ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. परंतु, जितेंद्र आव्हाड यांनी पुढाकार घेऊन तीन दिवस हा चित्रपट विनामुल्य दाखवणार असल्याचे घोषित केले आहे. त्यांनी याबाबत ट्वीट केले आहे.

“खास मराठी जनांसाठी खास मराठी चित्रपट “महाराष्ट्र शाहीर”चे विशेष आयोजन ठाणे प्रभात टॉकीज जिथे निळू फुले, डॉ.श्रीराम लागू यांच्यापासून थेट नाना पाटेकर यांच्यासारख्या दिग्गज मराठी अभिनेत्यांचे चित्रपट प्रदर्शित होत त्याच ठिकाणी शुक्रवार शनिवार रविवार संध्याकाळी ठीक ७ वाजता विनामुल्य, असं ट्वीट करत त्यांनी एक व्हिडीओही पोस्ट केला आहे.

“महाराष्ट्र शाहीर’ हा प्रत्येक मराठी माणसाने बघावा असा चित्रपट आहे. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गाणं प्रत्येकाच्या मुखी आहे. आणि महाराष्ट्र गीत म्हणून तुमच्या सरकारने जाहीर केलं आहे. हे गाणं राजा बढेंनी लिहिलेलं. पण घराघरांत नेलं ते शाहीर साबळेंनी. शाहीर साबळेंचं आयुष्य, एका शाहीराचा संघर्ष हे सर्व या चित्रपटात आहे. मी राज्य सरकारला आव्हान करतो की आपण महाराष्ट्र प्रेमाचं प्रतिक, मराठी भाषेचा प्रेमचा प्रतिक म्हणून महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट टॅक्स फ्री करावा, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Free show of maharashtra shahi marathi movie in thane prabhat talkies by jitendra awhad and appealed to maharashtra government to make it tax free sgk