‘ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला.. ‘ या काव्या सारखा देशहिताचा व्यापक दृष्टीकोन, राष्ट्रबांधणीसाठीचे सशक्त प्रयत्न, मातृभूमीप्रती अपार प्रेम असलेले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिभाशाली विचारांचा अवलंब आज जगभरात होताना दिसत आहे. परंतु ‘जे सावरकर जगाला उमगले, ते भारतामध्ये नाही समजले’, असे काहीसे चित्र आपल्याकडे पहायला मिळते. हेच लक्षात घेऊन स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांचे तेजस्वी विचार सर्वदूर पोहोचावे या निखळ हेतूने गेली ३ वर्ष देश-विदेशात स्वा. सावरकर विश्व संमेलनाचे आयोजन करण्यात येते. स्वा. सावरकर सेवा संस्थेने प्रथम भरारी घेत पहिले संमेलन मॉरिशस येथे घेतले होते. त्यानंतर दुबई व मागच्या वर्षी लंडन येथे यशस्वी स्वा. सावरकर संमेलनाचे आयोजन करण्यात आले. यंदाचे हे चौथे वर्ष असून यावर्षी  ४थे स्वा. सावरकर विश्व संमेलन ६ जुलै २०१४ ला थायलंड मधील बँकॉक येथे होणार आहे.
गेल्या वर्षी तिसऱ्या संमेलनाच्या समारोपाला लंडन येथे पुढील संमेलन थायलंड मध्ये होणार असल्याची घोषणा करण्यात आली. त्यानुसार या वर्षी थायलंड मधील आर्य समाज, हिंदू सभा आदी संस्थाच्या वतीने बँकॉक येथे हे विश्व संमेलन ६ जुलैला संपन्न होणार आहे. बँकॉक येथील हिंदू संघटना आणि स्वा. सावरकर यांच्या विचारांची बैठक असणारी मंडळी प्रभावितपणे या संमेलनासाठी कार्यरत आहेत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षीच्या उपक्रमाला सावरकर प्रेमी मंडळींचा उदंड प्रतिसाद अपेक्षित आहे. ६ जुलै २०१४ ला होणाऱ्या या संमेलनाला अभिनेते शरद पोंक्षे व व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे हे प्रमुख वक्ते आहेत. त्याचप्रमाणे सावरकर चित्रपटात काम करणारे मधुकर ताम्हाणे यांच्यासह अनेक मान्यवर या संमेलनासाठी उपस्थित राहणार आहेत. चौथ्या स्वा. सावरकर विश्वसंमेलनात महाराष्ट्रातील तसेच देशातील तमाम सावरकरप्रेमी मंडळींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक मा. रविंद्र कराडकर व स्वागताध्यक्ष दीपक महिपत दळवी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा