कुठलाही सण नाही किंवा कुठलीही सुट्टी नाही आणि तरीही २६ जुलैच्या शुक्रवारचा मुहूर्त साधून हिंदी, मराठी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषेतील मिळून तब्बल १३ चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यात हॉलिवूडचा बिग बजेट ‘द वुल्वरिन’वगळता बाकी सगळे चित्रपट ‘लो बजेट’ चित्रपट आहेत.
एरव्ही बिग बजेट चित्रपटांची एकमेकांशी टक्कर होऊ नये म्हणून काळजी घेणाऱ्या बॉलिवूडनेही एकाचवेळी सात हिंदी चित्रपट प्रदर्शित होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष केलेले आहे.
बॉलिवूडचे तब्बल सात चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यात शशांत शहा दिग्दर्शित तुषार कपूर, विनय पाठक, रणवीर शौरी आणि डॉली अहलुवालिया यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘बजाते रहो’ हा चित्रपट आहे. त्यापाठोपाठ बनारसमधल्या रोमियो-ज्युलिएटची कथा सांगणारा मनीष तिवारी दिग्दर्शित ‘इसक’, रती अग्निहोत्रीचा मुलगा तनुज वीरानी आणि मराठमोळी ‘मिस इंडिया’ नेहा हिंगे या दोघांचाही बॉलिवूड पदार्पण असणारा ‘लव्ह यू सोनियो’ या तीन चित्रपटांबरोबरच ‘एक बुरा आदमी’, ‘उप्स अ देसी’ आणि पूनम पांडेचा ‘नशा’ हे चित्रपटही प्रदर्शित होणार आहेत. भगवान बुध्दांवरचा प्रवीण दामले दिग्दर्शित ‘बुध्दा’ हा चित्रपटही या गर्दीत वेगळा ठरेल.
मराठीत दोन महत्त्वाचे चित्रपट प्रदर्शित होत आहेत आणि योगायोगाने हे दोन्ही चित्रपट यशस्वी नाटकांवर आधारित आहेत. उमेश कामत-प्रिया बापट यांच्या ‘नवा गडी नवे राज्य’ या नाटकावरचा ‘टाइमप्लीज, गोष्ट लग्नानंतरची’ हा चित्रपट आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘श्रीमंत दामोदरपंत’ या तुफोन विनोदी नाटकाचा त्याच नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या सगळ्यांना स्पर्धा असेल ती ह्यू जॅकमनच्या ‘द वुल्वरिन’ या हॉलिवूडपटाची. शिवाय, यूटीव्हीचा अ‍ॅनिमेशनपट ‘प्लेन’ हाही शुक्रवारीच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील प्रमुख पात्रांपेकी एकाला अभिनेत्री प्रियांका चोप्राने आवाज दिला आहे.
एवढे सगळे चित्रपट २६ जुलैलाच प्रदर्शित करण्यामागे काहीएक ठोस कारण नसले तरी या चित्रपटांना या आठवडय़ाबरोबरच ऑगस्टचा पहिला आठवडाही मोकळा मिळणार आहे.
२ ऑगस्टच्या शुक्रवारी ‘रब्बा मैं क्या करूं’ नावाचा एक चित्रपट आणि जॉय मुखर्जी यांची मुख्य भूमिका असलेला लव्ह इन बॉम्बे हा अप्रदर्शित चित्रपट वगळता कुठलाही अन्य हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याने या १३ पैकी ज्या चित्रपटांना या आठवडय़ात बॉक्स ऑफिसवर संजीवनी मिळेल त्यांना आपोआप दुसरा आठवडाही मिळणार आहे.

Story img Loader