रवींद्र पाथरे

नवरा-बायकोच्या नात्यात आलेली दरी मुलांच्या मनावर काय काय परिणाम करून जाते, हे अनेकदा नाटक-चित्रपटांतून दाखवलं गेलेलं आहे. साहित्यातूनही अनेक वेळा याबद्दलचा ऊहापोह झालेला आहे. तरीही हा विषय चिरंतन आहे.. जोवर मनुष्य, त्याच्यातल्या नाना वृत्ती-प्रवृत्ती, ईष्या, अहम् हयात आहेत, तोवर हा विषय शिळा होण्याची शक्यता नाही. याचंच प्रतिबिंब प्रसाद दाणी लिखित आणि कुमार सोहोनी दिग्दर्शित ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ या नाटकातही पडलेलं आपल्याला अनुभवायला मिळतं.

Woman dies by suicide, family alleges harassment by husband over English skills
“इंग्रजी बोलता येत नाही, नवऱ्याला शोभत नाहीस”, सासरच्या छळाला कंटाळली; विवाहितेचा घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
loksatta chatura A mother taking custody of her child is not kidnapping telangana high court decision
आईने अपत्याचा ताबा घेणे अपहरण नव्हे
Suicide girlfriend Nagpur, crime case against boyfriend,
नागपूर : प्रेयसीची आत्महत्या, प्रियकराविरुद्ध गुन्हा
amruta khanvilkar slams netizen who is asking about her husband
“तुझा नवरा कुठे आहे?” गृहप्रवेशाच्या व्हिडीओवर कमेंट करणाऱ्यांना अमृता खानविलकरने सुनावलं; म्हणाली, “Go Watch…”
actor Imran Khan ex wife Avantika Malik comments on divorce
बालपणीचं प्रेम पण अवघ्या ८ वर्षांत मोडला संसार; बॉलीवूड अभिनेत्याची पत्नी घटस्फोटाबाबत म्हणाली, “जर मी…”
Youth Addiction, Young Generation, Nagpur Police ,
तरुणांनो प्रेम करा, पण…
Nouran Aly on Vivian Dsena Vahbiz Dorabzee divorce
विवियन डिसेनाची दुसऱ्या बायकोशी भेट कशी झाली? नूरनने स्वतःच सांगितलं; त्याच्या पहिल्या बायकोबाबत म्हणाली…

माधव सहस्रबुद्धे हा उद्योजक एकटाच मुंबईत राहत असतो. त्याची बायको कित्येक वर्षांमागे त्याला सोडून गेलेली असते. अत्यंत श्रीमंत गुजराती कुटुंबातील ही मुलगी माधवच्या प्रेमात पडून त्याच्याशी विवाहबद्ध झालेली असते. प्रेमाचा ज्वर उतरल्यावर तिला वस्तुस्थितीची जाणीव होते. त्याचं मध्यमवर्गीय जगणं तिला स्वीकारता येत नाही. तिची हायफाय जीवनशैली, मागण्या, अपेक्षा त्याला झेपणाऱ्या नसतात. त्यातून त्यांची सततची भांडणं होत असतात. त्यांना मृण्मयी नावाची मुलगी असते. माधवचा जगण्याचा स्तर आणि बायकोच्या त्याच्याकडूनच्या अपेक्षा यांत महदंतर असतं. शेवटी या सततच्या भांडणतंटयांना कंटाळून ते घटस्फोट घेतात. तीही मग आपल्या लेकीला घेऊन नव्या पुरुषाशी संसार थाटून नव्याने आयुष्यात रममाण होते. पण माधव मात्र या धक्क्यानं कोलमडून जातो. दारूत आपली व्यथावेदना विसरण्याचा प्रयत्न करतो. पुढे परिस्थिती पालटते. आता तो उद्योजक झालेला असतो. परंतु तरीही जुन्या आठवणी कुरवाळत तो एकटाच जगत राहतो. आपली लेक भेटावी यासाठी तो अनेकदा प्रयत्न करतो. पण त्याची पूर्वाश्रमीची पत्नी त्याला तिला भेटू देत नाही. नंतर तर ती त्याला न सांगतासवरताच परदेशात निघून जाते. तो तिला शोधण्याचा खूप प्रयत्न करतो. पण व्यर्थ! त्याला त्यांचा थांगपत्ता लागत नाही.

हेही वाचा >>> ‘अपयशाने खचत नाही’

..आणि एके दिवशी एक तरुण मुलगी त्याला न विचारताच त्याच्या घरात घुसते आणि तिथंच राहायचा मनसुबा व्यक्त करते. माधवला कळत नाही, की ही कोण आहे. तो नाइलाजानं तिला घरात राहू देतो. ती त्याच्यावर नाना आरोप करते. त्याचं जिणं हराम करते. हा कुणाचा तरी डाव आहे, एवढंच त्याला कळतं. पण तो कोण खेळतंय हे त्याला कळत नाही. ती मुलगीही त्याला ते कळू देत नाही.

माधवकडे त्याचा एक रिक्षावाला मित्र त्याला कंपनी देण्यासाठी येत असतो. (त्याचं नाव जिग्या!) तो त्याला हवं-नको ते पाहत असतो. जणू तो त्याच्या घरातलाच एक झालेला असतो. तोही त्या मुलीकडून तिच्याबद्दलची माहिती काढायचा प्रयत्न करतो. पण ती त्यालाही दाद लागू देत नाही. तेव्हा तो तिच्या परोक्ष तिची पर्स तपासतो, तेव्हा तिचं नाव मृण्मयी माधव सहस्रबुद्धे असल्याचं त्याला तिच्याकडच्या एका कार्डावरून कळतं. मग तो तिला माधवबद्दल समजावण्याचा खूप प्रयत्न करतो. पण तिचा माधववरचा राग जात नाही. त्याने मुलगी म्हणून इतक्या वर्षांत आपली विचारपूस केली नाही, कधी आपल्याला बापाचं प्रेम दिलं नाही याने ती फार दुखावली गेलेली असते. म्हणूनच ती त्याचा या प्रकारे सूड घ्यायचा प्रयत्न करत असते. ती त्याला लागेल असं बरंच टाकून बोलते. माधवला कळत नाही, की आपण या मुलीचं काय घोडं मारलंय? तो तिला समजावण्याचा खूप प्रयत्न करतो. त्याच्या आयुष्यात घडलेल्या घटना सांगतो. आपली बाजू मांडतो. पण त्यावर तिचा विश्वास बसत नाही. शेवटी एकदाचं तिला त्याचं म्हणणं पटतं. त्याची बाजू वेगळी आहे, त्याने आपल्या परीनं खूप प्रयत्न केले, पण आईपुढे त्याचा नाइलाज झाला, हे तिला समजतं. ती त्याला माफ करते. आणि परत जायला निघते..

लेखक प्रसाद दाणी यांनी अवघ्या चार पात्रांचं हे नाटक रचलं आहे. त्यातली दोन पात्रं पूरकच आहेत. खरं तर दोन पात्रांतही हे नाटक होऊ शकलं असतं. पण मग त्याचा विस्तार करता आला नसता. त्यासाठी त्यांनी जिग्या आणि माधवच्या ऑफिसमधील दामले ही पात्रं निर्माण केली आहेत. तसं न करता तर लेखकाला माधवचा बोलबच्चन मित्र जिग्या आणि मृण्मयीचा फेसबुक फ्रेंड जिग्या यांच्यातला भास-आभासाचा खेळही त्यातून करता आला नसता. शेवटी हा जिग्या तिसराच कुणीतरी निघतो, ही गोष्ट अलाहिदा. दामले हे पात्र मात्र नाटकात कोणतीही ‘भूमिका’ नसलेलं अनावश्यक पात्र वाटतं. असो. माधव आणि मृण्मयीची ताटातूट, त्यांच्यातला असंवाद, समज-गैरसमज यावरच बहुतांशी हे नाटक आधारलेलं आहे. त्यांच्यातला प्रारंभीचा समज (वा गैरसमज) या नाटकाला वेगळंच परिमाण देतो आणि हळूहळू त्यांच्यातील ताणतणाव वाढवत नेतो. हा कात्रजचा घाट लेखकानं छान रचला आहे. विशेषत: मृण्मयीचं वागणं-बोलणं त्यात आणखीनच भर घालतं. एक वेगळीच भाषा आणि मिती मृण्मयी या पात्राला त्यामुळे प्राप्त होते आणि नाटकही रंगतदार होतं. जिग्या हे आगाऊ पात्र निर्माण करून लेखकानं नाटकात विरंगुळ्याची सोय केली आहे. मृण्मयीचं तडकभडक वागणं-बोलणं आणि त्याच्या अत्यंत विरोधी माधवचं शांत, समजूतदार वागणं-बोलणं यांतील परस्पर विरोधाभासातून नाटक उत्तरोत्तर रंगत जातं. जिग्याचा अतिशयोक्त आगाऊपणा, त्याचं ओबडधोबडपणे व्यक्त होणं नाटकात रिलॅक्स्ड् मूड आणतं. बाप-मुलीच्या नात्यातील ताण हा या नाटकाचा गाभा. तो यात केंद्रस्थानी राहील याची खबरदारी घेतली गेली आहे.

दिग्दर्शक कुमार सोहोनी यांनी फार मोठं कथाबीज नसलेलं हे नाटक त्याच्या मर्यादित आवाक्यात नीटस बसवलं आहे. पात्रांच्या ठसठशीत स्वभावरेखाटनातून नाटक पुढे सरकतं. एका क्षणी मृण्मयीची ओळख उघड झाल्यावर नाटकातली रंगत खरं तर उणावायला हवी. पण तसं होत नाही. ते प्रेक्षकाला तरीही धरून ठेवतं. दामले आणि पारिख ही पात्रं मात्र अनाठायी वाटतात. त्यांची योजना नाटकाची लांबी वाढवण्यापुरतीच वाटते. विवाहसंस्थेतला नवरा-बायकोतील बेबनाव आणि त्यापायी मुलांवर होणारे परिणाम ही आजच्या आधुनिक युगाची देण आहे. त्याला येणारी पिढी कशी सामोरी जाणार, हा खरा प्रश्न आहे. वाढता व्यक्तिवाद, त्यापायी कुटुंबसंस्थेची होणारी मोडतोड हा खरोखरच चिंतेचा विषय आहे. त्याचे पडसाद विविध कलामाध्यमांमधून पडणंही अपरिहार्य आहे. ‘फ्रेंड रिक्वेस्ट’कडे या अर्थानं पाहायला हवं.

संदेश बेंद्रे यांनी माधवचं घर नेपथ्यातून नेमकेपणानं साकारलंय. अशोक पत्की यांनी संगीतातून यातलं नाटय अधोरेखित केलं आहे. गुरू ठाकूर यांचं गीत श्रवणीय आहे. कुमार सोहोनी यांनी प्रकाशयोजनेतून यातील नाटयपूर्णता ठळक केली आहे.

नाटकात अजय पूरकर यांनी संयमी, समंजस माधव सहस्रबुद्धे आपल्या अवघ्या देहबोलीतून साकारलाय. कधीही वरची पट्टी न लावणारा त्यांचा लाघवी बाप प्रशंसनीय.  प्रियांका तेंडोलकर यांची मृण्मयी आपला वेगळाच ठसा उमटवते. तिचं वागणं-बोलणं, विभ्रम अनपेक्षित, पण विलोभनीय. वाढत्या वयात बापाचं प्रेम न मिळाल्याने भावनिक, मानसिक उपासमार झालेली ही मुलगी.. तिची वेदना त्यांनी उत्तम रीतीनं व्यक्त केलीय. आशीष पवार यांचा आगाऊ जिग्या लोभस. त्यांची बोलबच्चनगिरी, माणुसकीपूर्ण वागणूक, त्यातली आतडयाची आच प्रकर्षांनं जाणवते. अतुल महाजन यांनी दामले आणि पारिख ही दोन्ही पात्रं यथातथ्य साकारली आहेत.

Story img Loader