हम दोस्त थे, हैं रहेंगे… हमेशा! दिल चाहता है मधला आकाश (आमिर खान) हा डायलॉग म्हणतो तेव्हाच जाणवते की आकाश, सिद्धार्थ (अक्षय खन्ना) आणि समीर (सैफ अली खान) या तिघांमधली मैत्री किती घट्ट आहे. हा सिनेमा म्हणजे सिनेजगतातील मोठ्या बदलांचा ट्रेंड सेटर ठरला. या सिनेमात दाखवण्यात आलेली मैत्री किती निखळ आणि निरागस होती हे आपल्याला ठाऊक आहे कारण या सिनेमाचं गारूड अजूनही आपल्या मनावर आहे. या तिघांमध्ये घडणाऱ्या छोट्या-छोट्या गोष्टींशी आपण आपल्याला जोडू पाहतो. आपलेही असे बेस्ट फ्रेंड्स असतात ज्यांना आपण कधीही विसरत नाही. आज फ्रेंडशिप डे अर्थात मैत्री साजरा करण्याचा दिवस. याच दिवशी या लेखातून आढावा घेतो आहे तो सिनेमात दाखवण्यात आलेल्या किंवा मांडलेल्या मैत्री या विषयाचा. मैत्रीचा हा धागा अनेक सिनेमांमध्ये वापरण्यात आला आहे. अगदी ६० च्या दशकातील दोस्ती या सिनेमापासून ते अगदी परवा पर्यंत आलेल्या वीरे दी वेडिंग पर्यंत अनेक सिनेमांमध्ये मैत्री हा विषय हाताळण्यात आला.
दोस्ती
हा सिनेमा आला साठच्या दशकात. एक आंधळा माणूस आणि एक लंगडा माणूस या दोघांमधल्या मैत्रीचे अनोखे बंध या सिनेमात आपल्याला बघायला मिळाले. या सिनेमात सुशील कुमार आणि सुधीर कुमार आणि संजय खान यांच्या प्रमुख भूमिका होत्या. राही मनवा दुख की चिंता क्यूँ सताती है, मेरी दोस्ती मेरा प्यार, जानेवालो जरा मुडके देखो मुझे.. ही आणि एकापेक्षा एक अजरामर गाणी या सिनेमाने दिली. आजही ही गाणी लागली की लोक ती आपोआप गुणगुणू लागतात. या सिनेमाची ही सर्वात जमेची बाजू होती. सिनेमाचा मूळ धागा होता तो एका आंधळ्या आणि लंगड्या माणसामधली मैत्री आणि त्यांच्यात निर्माण झालेले भाव बंधन. हा सिनेमा पाहताना आजही डोळ्यात पाणी येते. याचे यश यातच आहे असे म्हटले तर मुळीच वावगे ठरणार नाही.
आनंद
त्यानंतर ७० च्या दशकात आला तो आनंद हा सिनेमा. सुपरस्टार राजेश खन्ना आणि अमिताभ या दोघांच्या सिनेमात प्रमुख भूमिका होत्या. कॅन्सर झालेला आनंद (राजेश खन्ना) आणि त्याचा आजार माहित असलेला डॉक्टर भास्कर (अमिताभ बच्चन) या दोघांमध्ये झालेली सहा महिन्यातली मैत्री. प्रत्येक क्षणाचा महोत्सव करत हरहुन्नरी आयुष्य जगणारा आनंद आणि त्याच्या आजाराचे टेन्शन आलेला भास्कर हे या दोघांनी ज्या खुबीने रंगवले आहेत त्याला जवाब नाही. या सिनेमाची आणखी एक खासियत होती ती म्हणजे यातले संवाद. जिंदगी बडी होनी चाहिये लंबी नहीं, आनंद मरा नहीं, आनंद मरते नहीं. मौत तू एक कविता है.. पासून ते अगदी आनंदने भास्करला बाबूमोशाय अशी हाक मारत आपलंसं करून घेणं हे या सिनेमात अगदी चपखल बसलं आहे. आनंदची व्यक्तीरेखा राजेश खन्ना अक्षरशः जगला आहे.
नमकहराम
त्यानंतर आला नमकहराम हा सिनेमा. या सिनेमातही पुन्हा राजेश खन्ना आणि अमिताभ हे दोघे होते. मात्र आनंद सिनेमाच्या उलट गणित या सिनेमात बघायला मिळाले. आनंद सिनेमात राजेश खन्नाचा अभिनय जसा लक्षात राहिला तेवढा अमिताभचा राहिला नव्हता. नमकहराम सिनेमात मात्र अमिताभ बच्चनने राजेश खन्नाला झाकून टाकले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अमिताभने आपल्या अभिनयाचा कस या सिनेमात लावला आहे. पडद्यावर दोन मित्रांची भूमिका साकारणारे हे दोन कलाकार या सिनेमानंतर कधीही एकत्र आले नाही. फॅक्टरीत झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी अमिताभ आपल्या खास मित्राला म्हणजेच राजेश खन्नाला युनियनमध्ये पाठवतो. युनियनचा सूड घ्यायचा असाच अमिताभचा उद्देश असतो. मात्र राजेश खन्ना कामगारांमध्ये राहून त्यांच्या बाजूने होतो अशी कथा या सिनेमात आहे. दिये जलतें है फुल खिलते है. बडी मुश्कीलसे मगर दुनियामें दोस्त मिलते है हे या सिनेमातले गाणे आजही आपल्या लक्षात आहे.
जंजीर
अमिताभला अँग्री यंग मॅनची इमेज मिळवून देणारा सिनेमा होता तो म्हणजे जंजीर. या सिनेमातला अमिताभने साकारलेला इन्सपेक्टर विजय आणि त्यातला शेर खान अर्थात प्राण या दोघांची मैत्रीही तितकीच अजरामर ठरली आहे. यारी हैं इमान मेरा यार मेरी जिंदगी म्हणत जेव्हा शेर खान नाचतो तेव्हा आपणही त्याच्यासोबत ताल धरतो. जितका ताकदीचा अभिनय अमिताभने केला आहे तेवढ्याच तोडीस तोड अभिनय केला तो प्राणने.
शोले
७५ मध्ये आलेला शोले सिनेमा तर हिंदी सिनेसृष्टीतला मैलाचा दगड होता. जी. पी. सिप्पी यांचे दिग्दर्शन, सलीम जावेद यांचे लिखाण आणि धर्मेंद्र अमिताभ ही जोडी. अर्थात जय आणि विरूची जोडी. शोले ही सूडकथा होती. मात्र या सिनेमातली दोन चोरांची म्हणजेच जय आणि विरूची जोडी आजही तितकीच अजरामर आणि स्मरणात राहिलेली आहे. विरू (धर्मेंद्र) पाण्याच्या टाकीवर चढतो तो प्रसंग असेल, जय आणि विरू रामगढला पहिल्यांदा येतात, एकमेकांमध्ये टॉस करून प्रत्येक गोष्ट ठरवत असतात हे सगळे प्रसंग या दोघांनी जिवंत केले आहेत. या दोघांची खास दोस्ती आणि त्यांचे ये दोस्ती हम नहीं तोडेंगे हे पुढच्या पाच पिढ्यांसाठीचे हक्काचे गाणे ठरले.
याराना
याराना या सिनेमात जोडी दाखवण्यात आली ती अमजद खान आणि अमिताभ बच्चन या दोघांची. किशन आणि बिशन हे दोन खास मित्र किशनचा (अमिताभ) आवाज छान असतो. तर बिशन शहरात येऊन एक चांगला व्यावसायिक झालेला असतो. तो किशनला आपल्यासोबत शहरात घेऊन येतो. मात्र तेव्हा बिशनला कळते की आपल्या कुटुंबाला आणि आपल्याला आपल्या काकांकडूनच लुटले जाते आहे. जी संकटे येतात त्यावर हे दोन मित्र कशी मात करतात याची कथा या सिनेमात सांगण्यात आली होती.
अंदाज अपना अपना
या सिनेमात आमिर खान आणि सलमान खान या दोघांच्या प्रमुख भूमिका होत्या. असे म्हणतात की सिनेमात ड्रामा, कॉमेडी, अॅक्शन आणि संगीत या सगळ्याचा मिलाफ असला पाहिजे. तर सिनेमा तुमचे चांगले मनोरंजन करतो. हा सिनेमाही तसाच होता. या दोघांनी या सिनेमात उडवून दिलेली धमाल आजही लोकांच्या लक्षात आहे.
कुछ कुछ होता है
करण जोहरच्या या सिनेमाने प्यार दोस्ती है असा संदेश दिला. हा सिनेमाही लोकांच्या चांगलाच स्मरणात आहे, काजोल आणि शाहरूखची जोडी. साथीला राणी मुखर्जी. राहुल आणि अंजली यांच्यातली मैत्री त्यानंतर बहरत गेलेले प्रेम या सगळ्याचे बंध याही सिनेमात आहेत.
दिल चाहता है
दिल चाहता है हा सिनेमा आला आणि ९० च्या दशकापर्यंत किंवा अगदी २००० साल लागेपर्यंत जी सिनेमाची व्याख्या होती तिच बदलून गेली. अत्यंत वेगळ्या धाटणीचा आणि फ्रेश सिनेमा होता तो म्हणजे दिल चाहता है. यामध्ये गोवा ज्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे ते तर अप्रतिम. आकाश, समीर आणि सिद्धार्थ म्हणजेच आमिर, सैफ आणि अक्षय खन्ना या तिघांची ही गोष्ट मैत्रीचा नवा अर्थ सांगणारी होती. त्यानंतर हिंदी सिनेसृष्टीत अशा सिनेमांची लाटच आली.
काय पो छे, इंग्लिश विंग्लिश, रॉक ऑन, असे कितीतरी सिनेमा त्यानंतर आले ज्यामध्ये मैत्री हा एक समान धागा होता. रॉक ऑन सिनेमा पाहून अनेकांना त्यांच्या हरवलेल्या रॉक बँडची आठवण झाली होती. फरहान अख्तर, अर्जुन रामपाल, पुरब कोहली आणि ल्युक केनी या चौघांचा रॉकबँड विस्मरणात गेलेला असतो. काही गोष्टी घडलेल्या असतात. त्या सगळ्या सिनेमातून उलगडत जातात. रंग दे बसंती या सिनेमाताही आमिर खान, शर्मन जोशी आर माधवन या तिघांच्या अफलातून मैत्रीचे मिश्रण होते. यातला आमिरने साकारलेला फुसुंक वांगडू सही होता. काबील बनो काबील कामियाबी तो तुम्हारे पिछे झक मारके आएगी. हा संदेश सिनेमाने दिला. इंग्लिश विंग्लिश या सिनेमात श्रीदेवीची मध्यवर्ती भूमिका होती. शशी गोडबोले हे पात्र श्रीदेवीने साकारले. ती जेव्हा इंग्रजी शिकण्यासाठी जाते तेव्हा तिला कसे मित्र भेटतात हे या सिनेमात दाखवण्यात आले होते. निखळ मैत्रीची गोष्ट सांगणारा हा सिनेमा होता.हे सगळे सिनेमा कायमच लोकांच्या पसंतीला पडले आणि त्यातल्या मैत्रीच्या धाग्यामुळे लक्षातही राहिले.
वीरे दी वेडिंग या सिनेमात चार मैत्रिणींची गोष्ट सांगण्यात आली होती. करीना कपूर, स्वरा भास्कर, सोनम कपूर आणि शिखा तलसानिया या चौघींची भूमिका असलेला हा सिनेमाही लोकांना आवडला. काही बोल्ड दृश्ये सिनेमात होती त्याची बरीच चर्चाही झाली. पण संपूर्ण सिनेमात आजची मुलगी काय आणि कशाप्रकारे विचार करते हे दाखवण्यात आले आहे. या चार मुली आजच्या पिढीचे प्रतिनिधीत्त्व करतात. तर मैत्री दिवसाच्या निमित्ताने घेतलेला हा छोटासा प्रयत्न. तुम्हालाही हे सिनेमा लक्षात असतीलच. मग आजच्या दिवशी ते सिनेमा आठवा आणि एंजॉय करा तुमचा फ्रेंडशिप डे! हॅपी फ्रेंडशिप डे.
समीर चंद्रकांत जावळे