अनेकजण रीतसर अभिनयाचे प्रशिक्षण घेऊन, थिएटर वगैरे करून मग बॉलिवूडमध्ये एखादा चित्रपट करायला मिळतो आहे का?, याची चाचपणी करत फिरत राहतात. त्यातून एखादा चित्रपट मिळाला, तुमच्या कामाचे कौतूक झाले तरी आपण बॉलिवूडमध्ये स्थिरस्थावर होऊ शकू की नाही, याबाबत कायम टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर असते. पण, साकीब सलीम कुरेशी नावाच्या नटाच्या बाबतीत तसं काहीच घडलं नाही. प्रेमासाठी मुंबईत आलेला हा दिल्लीवाला मुलगा, प्रेमभंग झाल्यावर आता काय करायचं?, याचा विचार करत असतानाच त्याला थेट यशराज फिल्म्सच्या तीन चित्रपटांची ऑफर मिळाली. नशीब इतकं कोणावर खूष होऊ शकतं?.. माझा सगळा प्रवासच सध्या स्वप्नवत सुरू आहे, सांगतोय अभिनेता साकीब सालेम.
साकीबचा पहिला चित्रपट होता यशराज फिल्म्सचा ‘मुझसे फ्रेंडशिप करोगे’. पण, त्याला वाट सापडली ती त्याच्या दुसऱ्या चित्रपटात ‘मेरे डॅड की मारुती’. आता त्याचाही सिक्वल येतो आहे जेणेकरून त्याला नशीबाने मिळालेल्या पहिल्या यशराजच्या तीन चित्रपटांचे वर्तुळ पूर्ण होईल. पण, अभिनेता म्हणून सुरू झालेला हा सारा प्रवास केवळ प्रेमापोटी घडला आहे, असे साकीब सांगतो.
दिल्लीतून मुंबईत आलो ते प्रेमापोटी. दिल्लीत असतानाही माझ्यापुढे काही खास ध्येय होतं असं काही नाही. शिकायचो, क्रिकेट खेळायचो. त्यात कारकिर्द घडवावी असं वाटत होतं. तसे प्रयत्न केले. दिल्ली, मुंबईत खेळलोही पण, लवकरच त्यातून मन उडालं आणि भानावर आलो. जिथे शिकत होतो तिथेच माझ्यापेक्षा एका वर्षांने मोठय़ा असलेल्या मुलीच्या प्रेमात पडलो होतो. दिल्लीच्या फॅशन वर्तुळात तिचं येणंजाणं होतं, ती मॉडेलिंग करायची. अशाच एका निमित्ताने मी मॉडेल म्हणून उभा राहिलो आणि मला १५ हजार रूपये मिळाले. मग मॉडेल म्हणून छोटी-मोठी कामं केली. एकेदिवशी तिने म्हटलं की इथे दिल्लीत काही नाही. तुझं माझ्यावर प्रेम असेल तर मुंबईत यावं लागेल. मागचा पुढचा काहीही विचार न करता मी आईबाबांना निर्णय सांगितला आणि मुंबईत आलो. पण, दोनच महिन्यात आमच्या नात्यात दुरावा आला तो कायमचा. आणि मग मात्र मी मुंबईत निरुद्देश असल्याची जाणीव मला पहिल्यांदा झाली, ही सगळी कहाणी साकीब एका ओघात सांगून मोकळा होतो. मग थेट यशराजच्या तीन चित्रपटांची ऑफर मिळावी, यासाठी नेमकं काय केलंस? काही नाही.. नशिबाचाच भाग आहे तो, असे तो म्हणतो. साकीबच्या दृष्टीने एकच गोष्ट चांगली होती ती म्हणजे त्याची बहीण अभिनेत्री हुमा कुरेशीही मुंबईत होती आणि तिचीही धडपड सुरू होती. पण, बहिणीची मदत घ्यायची नाही हे पक्कं डोक्यात होतं. म्हणून मित्रांच्या सांगण्यावरून त्याने जाहिरातींसाठी ऑडिशन्स दिल्या. जाहिरातींसाठी निवड झाली आणि पहिल्याच जाहिरातीसाठी ५० हजार रूपये मिळाले. एक जाहिरात रणबीरबरोबर केली होती. तेव्हा एका मित्राच्या ओळखीवरून यशराजच्या कार्यालयात स्वत:ची माहिती देऊन झाली होती. तिथेही ऑडिशन्स सुरू झाल्या. पहिल्यांदा नकार, दुसऱ्यांदा नकार आणि तिसऱ्यांदा मात्र थेट तीन चित्रपटांची ऑफर त्याच्या हातात होती. हे असं का झालं?, याचं उत्तर माझ्याकडेही नाही, असे त्याचे म्हणणे आहे. तुम्ही विश्वास नाही ठेवणार पण, हुमाईजी माझ्याआधी मुंबईत आली होती. तरी तिच्याआधी मी माझा पहिल्या चित्रपटाचे चित्रिकरणही सुरू केले होते, असे साकीबने सांगितले. अभिनयाचे कुठलेही प्रशिक्षण घेतले नसताना त्याच्या कामाचे इतके कौतूक झाले की यशराजची चौकट मोडणाऱ्या अमोल गुप्ते दिग्दर्शित ‘हवा हवाई’ या चित्रपटात त्याला स्केटिंग प्रशिक्षकाची भूमिका करायला मिळाली.
अमोल गुप्ते फार वेगळ्या पध्दतीने दिग्दर्शन करतात. त्यांनी या भूमिकेसाठी माझा विचार केला आणि माझ्यावर विश्वास टाकला हे फार महत्वाचे आहे, असे त्याला वाटते. कुठल्याही खेळाचा प्रशिक्षक हा त्याच्या शिष्यांना फक्त मार्गदर्शन करणारा नसतो. तो त्याला प्रेरित करणारा असतो. मी चांगला क्रिकेट खेळलो आहे. पण, स्केटिंगचा कुठलाच अनुभव मला नव्हता. त्यामुळे या खेळाचे व्हिडिओ पहाणे, प्रशिक्षकांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे निरीक्षण अशा सगळ्या पध्दतीने प्राथमिक तयारी मी केली होती. पण, त्यातून जो प्रशिक्षक मी साकारला आहे तो माझाच आहे, असे तो विश्वासाने सांगतो. हुमा आणि त्याचे नाते कसे आहे?, याविषयी सगळ्यांनाच कमालीचे औत्सूक्य आहे. इतर कोणत्याही भावाबहिणींप्रमाणे आमचे नाते आहे. आता आम्ही दोघेही एकाच व्यवसायात असल्याने ते एक मेकांना पूरक आणि आणखी एकत्र आणणारे ठरले आहे, असे तो म्हणतो. आम्ही दोघेही एकमेकांना सल्ले देत नाही. हुमाईजी खूपच संवेदनशील अभिनेत्री आहे आणि अनुराग कश्यप, निखिल अडवाणीसारख्या मातब्बर पूर्णत: भिन्न शैलीच्या दिग्दर्शकांबरोबर काम करते आहे. तर मी यशराज बॅनरच्या व्यावसायिक चित्रपटातही आहे. ‘हवा हवाई’सारखा वेगळा चित्रपटही करतो आहे पण, तुलनेने ती माझ्यापेक्षा अभिनयात उजवी आहे. मात्र, आम्ही दोघे जेव्हा बहीण-भाऊ म्हणून एकत्र घरी येतो तेव्हा एकमेकांच्या कामाबद्दल चर्चा नक्की करतो आणि ती आम्हाला फार उपयोगी पडते, असे साकीबने सांगितले. ही ‘हुमाईजी’ काय भानगड आहे?, असे विचारल्यावर लहानपणीपासूनच्या सवयी वेळीच बदलल्या नाही तर त्या कायम तुमच्याबरोबर राहतात. हाही असाच प्रकार असल्याचे तो म्हणतो. मोठी बहीण म्हणून ‘हुमा बाजी’ अशी हाक मारायची. लहानपणी बोबडे बोलत असल्याने बाजी म्हणता येत नव्हतं. मग तोंडातून ‘हुमाईजी’ असा उच्चार व्हायचा. पुढे तोच कायम झाला. आता मात्र लोकांना मी हुमाजी हुमाजी असं बोलत असल्याचा भास होतो आणि त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभं राहतं. पण, त्याच्यामागची गंमत ही लहानपणीच्या सवयींमध्ये दडलेली असल्याचे साकीबने सांगितले.
‘हवा हवाई’ प्रदर्शित झाली की मग साकीबला उत्सूकता आहे ती त्याच्या ‘मेरे डॅड की मारुती’ या सिक्वलपटाची. यशराजबरोबर काम केलं तरी आता अभिनेता म्हणून हळूहळू आपली जाण वाढत चालली आहे. सहज अभिनय ही आपली देणगी असल्याचे त्याने मनाशी तरी कबूल केले आहे. आता त्याच जोरावर अगदी शांतपणे आणि संयमाने वेगवेगळ्या दिग्दर्शकोंबरोबर वेगवेगळ्या भूमिका करायचा आपला मानस त्याने व्यक्त केला आहे. मात्र, आत्तापर्यंत आलेल्या त्याच्या तीन चित्रपटांनी ज्यात ‘बॉम्बे टा्रकीज’चा विशेषत्वाने उल्लेख करायला हवा. साकीबकडे आत्ताच्या तरुण फळीतील एक आश्वासक अभिनेता म्हणून पाहिलं जाऊ लागलंय आणि त्याला हा स्वप्नवत सुरू झालेला प्रवास आता तितक्याच आश्वासकतेने पूर्ण करायचा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोणत्याही भावाबहिणींप्रमाणे माझे आणि हुमाचे नाते आहे. आम्ही दोघेही एकाच व्यवसायात असल्याने ते एक मेकांना पूरक आणि आणखी एकत्र आणणारे ठरले आहे, आम्ही दोघेही एकमेकांना सल्ले देत नाही. मोठी बहीण म्हणून ‘हुमा बाजी’ अशी हाक मारायची आमच्याकडे पद्धत आहे. लहानपणी बोबडे बोलत असल्याने बाजी म्हणता येत नव्हतं. मग तोंडातून ‘हुमाईजी’ असा उच्चार व्हायचा. पुढे तोच कायम झाला. आता मात्र लोकांना मी हुमाजी हुमाजी असं बोलत असल्याचा भास होतो आणि त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभं राहतं. पण, त्याच्यामागची गंमत ही लहानपणीच्या सवयींमध्ये दडलेली आहे.

कोणत्याही भावाबहिणींप्रमाणे माझे आणि हुमाचे नाते आहे. आम्ही दोघेही एकाच व्यवसायात असल्याने ते एक मेकांना पूरक आणि आणखी एकत्र आणणारे ठरले आहे, आम्ही दोघेही एकमेकांना सल्ले देत नाही. मोठी बहीण म्हणून ‘हुमा बाजी’ अशी हाक मारायची आमच्याकडे पद्धत आहे. लहानपणी बोबडे बोलत असल्याने बाजी म्हणता येत नव्हतं. मग तोंडातून ‘हुमाईजी’ असा उच्चार व्हायचा. पुढे तोच कायम झाला. आता मात्र लोकांना मी हुमाजी हुमाजी असं बोलत असल्याचा भास होतो आणि त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभं राहतं. पण, त्याच्यामागची गंमत ही लहानपणीच्या सवयींमध्ये दडलेली आहे.