पुणे येथील ‘फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’ अर्थात ‘एफटीआयआय’ ही संस्था माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत नसावी तर तिचा कारभार कलेशी संबंधित विभागाकडे असावा, असे स्पष्ट मत अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी व्यक्त केले.
‘हाय वे’ याआगामी मराठी चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने रेणुका शहाणे यांनी मंगळवारी ‘लोकसत्ता’ कार्यालयास भेट दिली. त्या वेळी ‘एफटीआयआय’संबंधी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्या बोलत होत्या. संस्थेत होणारे काम हे सर्जनशील स्वरूपाचे आहे. त्यामुळे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाऐवजी कलेशी संबंधित मंत्रालयाकडे/विभागाकडे ही संस्था असावी, असेही शहाणे यांनी सांगितले.
अभिनेत्री आणि ‘एफटीआयआय’च्या सदस्या पल्लवी जोशी यांनी जी ठोस व ठाम भूमिका घेतली आहे, त्याच्याशी आपण सहमत असल्याचे सांगून शहाणे म्हणाल्या, ‘एफटीआयआय’सारख्या संस्थेचे महत्त्व जपले गेले पाहिजे. संस्थेच्या अध्यक्षपदी एखाद्या व्यक्तीची नेमणूक करताना गहन विचार झाला पाहिजे. कोणालाही अध्यक्ष करून चालणार नाही, संस्थेसाठी ते घातक ठरेल. ‘एफटीआयआय’मधील विद्यार्थी जवळपास गेले महिनाभर विद्यमान अध्यक्षांच्या नियुक्तीविरोधात आंदोलन करत आहेत. संस्थेच्या अध्यक्षपदी ‘राजकीय नेमणूक’ केली जाऊ नये. राजकारणापलीकडे जाऊन विचार केला जावा. अध्यक्षपदासाठी ज्याची नेमणूक केली जाईल ती व्यक्ती सगळ्यांशी विशेषत: विद्यार्थ्यांशी संवाद साधू शकेल, अशी असणे आवश्यक आहे.

Story img Loader