रेश्मा राईकवार
सतत काहीतरी गूढ, गंभीर, मनात खोल उमटेल असंच मांडायला हवं म्हणजे चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो हे खरं नाही. तसंच काही नाती अशी असतात ज्याबद्दल फार गमतीने बोलणं आपल्याकडून सहसा होत नाही, किंबहुना ते आपल्या मुळांमध्येच नाही. वडील आणि मुलाचं नातं हे या प्रकारात मोडतं. म्हणजे अगदीच डॅडा म्हणून खांद्यावर हात टाकून मित्रांसारखं वागणारे बापलेकच हवेत असाही काही नियम नाही. मुळात हे नातं म्हटलं तर सोपं आणि म्हटलं तर आपणच अवघड करून ठेवलेलं आहे. कुठल्याशा प्रसंगाच्या निमित्ताने वडिलांबरोबर एकत्र प्रवास करत असताना मुलाला गवसलेला त्याचा ‘बाप’ इतकी साधी आणि तितकीच रंजक गोष्ट ‘बापल्योक’ चित्रपटातून पाहायला मिळते.
मकरंद माने दिग्दर्शित ‘बापल्योक’ हा चित्रपट पाहताना मुळात दिग्दर्शक म्हणून त्याची काहीशी गंभीर प्रवृत्ती किंवा त्या शैलीतील चित्रपट आपल्या डोक्यात असतात. चित्रपट केवळ रंजक न करता त्यातून प्रेक्षकांच्या मनात काहीएक सांगून जायचं ही स्वत:ची खासियत मकरंद माने यांनी ‘बापल्योक’ चित्रपटातही जपली आहे. मात्र कुठेही गंभीर मांडणी न करता वा कुठलाही अभिनिवेश न ठेवता त्यांनी या चित्रपटातून बाप लेकाच्या नात्यातील गंमत उलगडून दाखवली आहे. पुण्यातील नोकरी सोडून गावाकडे परतलेल्या सागरचं लग्न ठरलं आहे. सागर आणि त्याचे वडील तात्या यांच्यात काहीतरी बिनसलेलं आहे. नुकतंच लग्न ठरलं असल्याने काहीसा स्वप्नात हरवलेला आणि होणाऱ्या बायकोला सतत भेटू पाहणारा, तिच्याशी संवाद साधण्यासाठी उतावीळ असलेल्या आपल्या मुलाला पाहून तात्यांचं डोकं भिरभिरतं आहे. चांगली नोकरी सोडून शेतात राबण्यासाठी आला आहे हा रागही त्यांच्या डोक्यात आहे. तात्यांची चिडचिड सागरला माहिती आहे, पण मुळात तो गावाला का परतला हे त्यालाही सांगता येत नाही आणि त्यांच्या सततच्या चिडचिडीने तोही कंटाळला आहे. या दोघांमधला दुवा आहे तो सागरची आई. सुरुवातीच्या काही फ्रेममधून घराघरात दिसणारा हा वडील आणि मुलाच्या नात्यातला गुताडा प्रेक्षकांना लक्षात आणून दिल्यानंतर दिग्दर्शकाने या दोघांना एका गमतीदार प्रसंगात एकत्र आणलं आहे. सागरच्या लग्नाच्या पत्रिका गावाबाहेरच्या नातेवाईकांना देण्यासाठी हे दोघेही एकत्र प्रवासाला निघतात. या दोन दिवसांच्या प्रवासातल्या गमतीजमती, तात्या आणि सागर दोघांचेही हट्टी स्वभाव, त्यातून उद्भवणारे प्रसंग आणि मग आपल्याला वडील म्हणून दिसणारे तात्या मूळ माणूस म्हणून कसे आहेत? काय काय घडून गेलं आहे त्यांच्या आयुष्यात.. हे पहिल्यांदाच सागरला जाणवतं. आपल्या बापाचा शोध ते स्वत: बाप होईपर्यंत आयुष्याचं एक वर्तुळ पूर्ण करणारं हे नातं वास्तव शैलीत आणि तेही अलवारपणे दिग्दर्शकाने या चित्रपटातून उलगडून दाखवलं आहे.
चित्रपटाच्या कथेचा जीव थोडा आहे, पण त्यातला आशय खूप महत्त्वाचा आहे हे लक्षात घेत सिनेमाच्या चित्रभाषेतून तो अधिक उलगडत नेण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न इथे प्रभावी ठरला आहे. योगेश कोळी यांचं छायांकन, विजय गवंडे यांचं संगीत, गुरू ठाकूर आणि वैभव देशमुख या गीतकारांनी नेमक्या शब्दांतून उलगडलेला भाव आणि कलाकारांचा सहज अभिनय या सगळय़ा बाबी उत्तमपणे या चित्रपटात जमून आल्या आहेत. आपल्याच घरात घडणारा प्रसंग असावा इतक्या सहज पद्धतीने दिग्दर्शक प्रेक्षकांना सागर आणि तात्या या दोघांच्या गोष्टीत सामील करून घेतो. आपला बाप असा का वागतो? या प्रश्नाचं उत्तर सहजी मिळणं तसं अवघडच. आणि कुटुंब नामक रोजच्या व्यवस्थेत त्याचा शोध घेण्याइतका वावही मिळत नाही की तशी गरजही भासत नाही. मात्र बाहेर पडल्यानंतर वडिलांना माणूस म्हणून व्यक्ती, प्रसंगांचा सामना करताना मुलगा पाहतो. एरव्ही घरात घडणारा प्रसंग वेगळा आणि वडिलांनीच निर्माण केलेल्या घराच्या चार भिंतींच्या सुरक्षित जगाबाहेर पडल्यानंतर बाप नावाच्या माणसाची होणारी ओळख वेगळी याची खूप सुंदर जाणीव दिग्दर्शकाने करून दिली आहे. अर्थात हा चित्रपट मुलाच्या दृष्टिकोनातून वडिलांची गोष्ट दाखवतो. किंबहुना एकदा का बाप होणं म्हणजे काय हे उमगलं की मुलालाही त्याच्यातलं वडीलपण सापडतं असा काहीसा आशय चित्रपटात आहे. अभिनेता शशांक शेंडे आणि विठ्ठल काळे या दोघांनीही बापलेकाचं हे नातं कमालीचं छान रंगवलं आहे. या चित्रपटाचा बव्हंशी भार या दोघांवर आहे, मात्र या दोघांशिवाय प्रत्येक कलाकार नवीन आणि उत्तम काम करणारा आहे. कलाकारांच्या निवडीपासून ते मांडणीपर्यंतचं नावीन्य, प्रभावी दिग्दर्शन अशा सगळय़ाच जमेच्या गोष्टी असलेला ‘बापल्योक’ निखळ मनोरंजन करतो आणि आपला उद्देशही साध्य करतो.
बापल्योक
दिग्दर्शक – मकरंद माने
कलाकार – शशांक शेंडे, विठ्ठल काळे, नीता शेंडे, मयूरी.