‘एण्टरटेन्मेंट फॉम्र्यूला’बाज चित्रपट हा गल्लाभरू चित्रपटांचा परवलीचा शब्द मान्य करूनही प्रेक्षकांना अ‍ॅक्शनपट आवडू शकतात हे सिद्ध झाले आहे. खासकरून जेव्हा तामिळ-तेलुगूमध्ये गाजलेल्या चित्रपटांचे रिमेक केले जातात तेव्हा हा हमखास फॉम्र्यूला प्रेक्षकही अनेकदा गृहीत धरत असतात. तीन तास बिनडोक करमणूक हवी एवढीच माफक अपेक्षा प्रेक्षक करीत असतात. परंतु अक्षय कुमारसारखा ‘ब्रॅण्ड’ असूनही हा तामिळचा हिंदी रिमेक असलेला ‘गब्बर इज बॅक’ हा चित्रपट किमान करमणूक करण्यातही अयशस्वी ठरतो. रिमेक म्हणजे तोचतोचपणाची पुनरावृत्ती असे जणू समीकरण सिनेमावाल्यांनी जुळवले असून त्यामुळे या रिमेकचे प्रेक्षकांना अजीर्ण झाल्यावाचून राहणार नाही.
विशेषत: छोटय़ा पडद्यावर हिंदी चित्रपटांची असंख्य चॅनेल्स असताना आणि त्यातही दिवसभरातील एका विशिष्ट वेळेला सर्व हिंदी मूव्ही चॅनल्सवर तामिळ-तेलुगू गल्लाभरू चित्रपटांचे हिंदी रिमेक वारंवार दाखवून भडिमार केला जात असताना याच पद्धतीचा रिमेक पुन्हा चित्रपटगृहात जाऊन पाहणे ही प्रेक्षकांची डोकेदुखी वाढविणेच आहे.
ऐंशीच्या दशकातील हिंदी सिनेमांचे कथानक या सिनेमात पुन्हा आणले आहे. सरकार पातळीवरचा भ्रष्टाचार खूप बोकाळला आहे. आदित्य नावाच्या नायकाचे अख्खे कुटुंब आणि खासकरून त्याची बायको एका इमारत दुर्घटनेत मरण पावते. म्हणून उद्विग्न झालेला नायक खलनायकाविरोधात सत्य पुरावे गोळा करून उभा ठाकतो. नंतर पुरावे नष्ट करण्यासह खलनायक या नायकाला ठार करतो. आणि त्यातून सुदैवाने बचावलेला आदित्य हा मग गब्बर नावाने पुन्हा जगातील भ्रष्टाचार आणि भ्रष्ट अधिकारी यांचा नि:पात करण्यासाठी कारवाया करतो. दहा भ्रष्ट तहसीलदारांचे अपहरण करून एका अतिभ्रष्ट लाचखोर तहसीलदाराला फाशी देऊन भरदिवसा सार्वजनिक ठिकाणी लटकवितो. तहसीलदार झाल्यावर जिल्हाधिकारी, नंतर सरतेशेवटी बलाढय़ बिल्डर अशा एकेकांच्या तो मागे लागतो आणि गब्बर लोकप्रिय ठरतो. गब्बर ही गाजलेली व्यक्तिरेखा खलनायकी प्रवृत्तीचे उदाहरण म्हणून कायमस्वरूपी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरली. म्हणून या सिनेमाची टॅगलाइन ‘नाम से व्हिलन काम से हिरो’ अशी देण्यात आली आहे. सत् विरुद्ध असत्चा लढा देताना हिंदी सिनेमाचा नायक नेहमीच गुन्हे करतो हे जणू प्रेक्षकांच्या मनी ठसलेले सत्य चित्रपटकर्त्यांनी खुबीने वापरले आहे. परंतु हे करताना सिनेमाच्या शीर्षकाशिवाय कसलेही नावीन्य अजिबात राहू नये याची पुरेपूर काळजी लेखक-दिग्दर्शक-संगीतकार-कलावंत या सगळ्यांनी घेतली आहे. अक्षय कुमारही सिनेमात एके ठिकाणी खलनायकाला ऐकवतो की ‘गब्बर हा एक मोठा ब्रॅण्ड’ आहे. ब्रॅण्ड अक्षय कुमारच्या या सिनेमात फक्त त्याची केशरचना नवीन आहे. ब्रॅण्ड अक्षय कुमारच्या नायिकेला फारसे महत्त्व देण्याची गरजच नसते. त्याप्रमाणेच श्रुती हसनचा पडद्यावर वावर आहे. तरीसुद्धा कॉन्स्टेबलच्या भूमिकेतील सुनील ग्रोव्हरला अक्षयकुमारच्या खालोखाल पटकथेत महत्त्व आणि पडद्यावरचा वावर देण्यात आला आहे. हेही नसे थोडके. करिना कपूर, चित्रांगदा सिंग यांच्यासारख्या अभिनेत्रींनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारून काय मिळविले हे त्यांचे त्याच जाणोत.
सतत हाणामारी, कर्णकर्कश संगीत, डोक्यावर घण घातले जातायत अशा स्वरूपाचे भयंकर त्रासदायक पाश्र्वसंगीत आणि बटबटीतपणाचा कळस यामुळे टीव्हीवर रोजच दाखविल्या जाणाऱ्या रिमेकचे प्रेक्षकांना अजीर्ण झाल्यावाचून राहणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गब्बर इज बॅक
निर्माते – संजय लीला भन्साळी, वायकॉम १८ मोशन पिक्चर्स
दिग्दर्शक – क्रिश
लेखक – रजत अरोरा
कथा – ए. आर. मुरूगाडॉस
संगीत – चिरंतन भट्ट, यो यो हनी सिंग, मंज म्युझिक,
छायालेखक – नीरव शहा
संकलक – राजेश जी. पांडे
कलावंत – अक्षय कुमार, श्रुती हसन, सुमन तलवार, जयदीप अहलावट, सुनील ग्रोव्हर, इशिता व्यास, करिना कपूर, चित्रांगदा सिंग

गब्बर इज बॅक
निर्माते – संजय लीला भन्साळी, वायकॉम १८ मोशन पिक्चर्स
दिग्दर्शक – क्रिश
लेखक – रजत अरोरा
कथा – ए. आर. मुरूगाडॉस
संगीत – चिरंतन भट्ट, यो यो हनी सिंग, मंज म्युझिक,
छायालेखक – नीरव शहा
संकलक – राजेश जी. पांडे
कलावंत – अक्षय कुमार, श्रुती हसन, सुमन तलवार, जयदीप अहलावट, सुनील ग्रोव्हर, इशिता व्यास, करिना कपूर, चित्रांगदा सिंग