रवींद्र पाथरे
नाटक ही कला असली तरी त्यात आशय मांडणीच्या तंत्रावरही हुकूमत असावी लागते. प्रारंभ, मध्य आणि अंत असा नाटकाचा ढोबळमानाने प्रवास होत असला तरी चर्चानाटय़ किंवा असंगत नाटकांमध्ये तो गरजेचा असतोच असं नाही. परंतु मनोरंजनपर नाटकातही मांडणीचं एक तंत्र असतं. अन्यथा नाटकाचा तोल ढळू शकतो. समीर पेणकर लिखित आणि शेखर फडके दिग्दर्शित ‘गजरा मोहब्बतवाला’ या रोमॅंटिक शीर्षकाच्या नाटकात पहिला अख्खा अंक प्रस्तावनेतच खर्ची पडला आहे. आणि प्रत्यक्ष नाटकाला दुसऱ्या अंकात प्रारंभ झाला आहे. नाटकाची मध्यवर्ती कल्पना चमकदार आहे. परंतु ती (बहुधा) एकांकिका फॉरमॅटमधली असावी.. जी दुसऱ्या अंकात सादर केली गेली आहे. पहिला अंक कदाचित ‘नाटक’ करण्याच्या हेतूने वाढवला गेला असावा का, अशी रास्त शंका नाटक पाहताना येते.
फडके कुटुंबात सगळं छान छान, गोड गोड चाललेलं असतं. भरपूर पैसा, संस्कारित मुलं, सून वगैरे. सारेच परस्परांना जपणारे, जोडून असलेले. इतकं आदर्श कुटुंब हल्ली सहसा आढळत नाही. त्यामुळे घरातल्या शेखर (वडील) व मनोज (मुलगा) फडक्यांना आपलं आदर्श, पचपचीत घर कंटाळवाणं वाटत असतं. सासू-सुनेत भांडण नाही की नणंद-भावजयींत रुसवेफुगवे नाहीत. चहाडय़ा नाहीत की गॉसिपिंग नाही. सगळं कसं रसगुल्ल्यासारखं गुळमट. त्यामुळे घरात कसली मजाच नाही असं त्या दोघांना वाटत असतं. ते आपल्या परीनं सासू-सुनेत भांडणं व्हावीत म्हणून काही उचापतीही करतात; परंतु त्यात त्यांना यश येत नाही.
अशात एके दिवशी शेखरचा कित्येक वर्षांपूर्वी हिमालयात गेलेला मित्र फद्या अचानक त्यांच्या घरी उपटतो. तो त्यांच्या या कंटाळलेपणावर एक उपाय सुचवतो. तो मोगऱ्याचा आणि अबोलीचा असे दोन गजरे त्यांना देतो आणि सांगतो की, ‘हे गजरे ज्यांच्या डोक्यात तुम्ही माळाल, त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय हे तुम्हाला ऐकू येईल. त्यासाठी फक्त गजरा माळल्यावर ‘एक- दोन’ असं म्हणायचं. शेखर रजनीच्या (बायको)आणि मनोज आपली बायको पल्लवीच्या डोक्यात ते गजरे माळतात. आणि खरंच.. त्यांच्या मनात काय चाललंय हे दोघांना ऐकू येऊ लागतं. त्या बोलण्यातून सासू-सुनेचं परस्परांबद्दल खरंखुरं काय मत आहे हे दोघांना कळतं. आणि सासू-सुनेत भांडणाची ठिणगी पडते. फडके पिता-पुत्र भलतेच खूश होतात. त्यांचा हेतू सफल झालेला असतो. मिळमिळीत घरात भांडणांचे फुलबाजे फुटू लागतात.
नाटकात पुढे काय होतं, हे सांगण्यात अर्थ नाही.लेखक समीर पेणकर यांनी दिग्दर्शक शेखर फडके यांच्या मूळ कथाबीजावर बेतलेलं हे नाटक. पण झालंय काय, की या कल्पनेचा जो विस्तार होणं आवश्यक होतं, त्यातील अनेकानेक शक्यता ज्या तऱ्हेनं फुलवल्या जायला हव्या होत्या, त्या फुलवल्या गेलेल्याच नाहीत. प्रस्तावनेतच पहिला अंक खर्ची पडला आहे. थोडय़ाशी प्रस्तावनेनंतर मूळ कल्पनेचा विस्तार सुरू केला गेला असता तर नाटक अधिक मनोरंजक झालं असतं. दुसऱ्याच्या मनातलं तिसऱ्याला ऐकू येणं ही कल्पना खरं तर भन्नाटच. परंतु त्यातून काय काय घोटाळे, गडबडी होऊ शकतात याचा खोलात विचार ना लेखकाने केला आहे, ना दिग्दर्शकाने! गजऱ्याची करामत प्रॉडक्शन मॅनेजर जोशी आणि फडक्यांची लेक माधुरी यांच्यावर केल्यावर त्यांच्या व्यक्तिमत्त्वांत अनपेक्षित बदल होतो. खरं तर मूळ कल्पनेत हे अपेक्षित नाहीए. त्या व्यक्तीच्या अंतर्मनात वेगळंच काहीतरी चाललंय, हे समोर आणणं ही मूळची कल्पना. तिचं भलतंच रूप या दोघांच्या बदललेल्या व्यक्तिमत्त्वांमुळे आविष्कारित होतं. म्हणजे गजऱ्यांनी त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वात बदल होतो आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीचं अंतर्मनही उघड होतं? पण रजनी आणि पल्लवीच्या बाबतीत फक्त त्यांच्या मनातल्या भावनाच तेवढय़ा ऐकू येतात; त्यांच्या व्यक्तिमत्त्वात संपूर्णतया बदल होत नाही. (याबद्दलचा खुलासा नाटकाअखेरीस होतो.) तर माधुरी (लेक) थेट तमासगिरीणच बनते आणि आपल्या वडलांनाच आपला यार समजते. हे काय गौडबंगाल आहे, ते लेखक व कथाबीजकारच जाणोत! गजरे माळल्यावर या दोन्हीपैकी एक काहीतरी होतं? देव जाणे! असो.
तर.. मूळ कल्पना उत्तम असली तरी तिच्या आत दडलेल्या अनेक शक्यता मात्र नीट तपासल्या गेलेल्या नाहीत. सासू-सुनेच्या मनातील गरळ बाहेर आल्यावर ते फक्त नवरा आणि मुलालाच ऐकू येत असल्याने खरं तर त्यांची आपापसात भांडणं होण्याचा प्रश्नच येत नाही. (कारण त्या दोघींना परस्परांच्या मनातलं ऐकू येत नाही.) त्या दोघींत खरं तर पिता-पुत्रानेच त्यावरून भांडणं लावायचे प्रयत्न करायला हवेत. पण तसं इथं घडत नाही. त्या दोघींनाही परस्परांच्या मनातलं जणू ऐकू येतं आणि त्यांच्यात खरं भांडण होतं. हे या कल्पनेचं सुलभीकरण झालं. खरं तर त्यांच्यात कशी का होईनात, भांडणं पेटल्यावर पिता-पुत्र हैराण झाले असते तर आणखीन गंमत आली असती. दुसरं म्हणजे माधुरीच्या (लेक) अंगात तमासगिरणीचा संचार होतोच कसा? याचा कार्यकारणभाव सापडत नाही. किंवा जोश्याच्या मनातली मालकांबद्दलची तिडीक! ती असू शकते. परंतु त्याच्या व्यक्तिमत्त्वात बदल झाल्यावर ती बाहेर येते. त्याचं आणि माधुरीचं ‘प्रकरण’ घरात फारशी खळबळ माजवत नाही, हेही खटकतं. एकुणात चांगल्या कल्पनेतील या विविध शक्यता पडताळून पाहिल्या न गेल्याने नाटक एकदाचं उरकल्यासारखं संपतं. याचा दोष लेखक व दिग्दर्शक दोघांकडेही जातो.
सर्व कलाकारांनी आपल्या परीने चोख कामं केली आहेत. शेखर फडके (पिता : ऋतुराज फडके), मनोज (मुलगा : आनंद काळे), रजनी (सासू : प्रज्ञा जावळे-एडके), पल्लवी (सून : किरण राजपूत), माधुरी (मुलगी : ऋतुजा चिपडे), जोशी (प्रॉडक्शन मॅनेजर : प्रांजल दामले) यांनी संहितेबरहुकूम आपापल्या भूमिका नेमकेपणाने सादर केल्या आहेत.
नेपथ्यकार अजय पुजारे यांनी उभारलेलं घर श्रीमंती व अभिरुची दर्शवणारं आहे. मंदार चोळकर यांच्या गीतांना वरुण लिखते व आशीष गाडे यांनी श्रवणीय संगीत दिलं आहे. अजय भावे व निशांत अजनकर यांची प्रकाशयोजना प्रसंगानुकूल. चैत्राली डोंगरे (वेशभूषा) आणि सचिन जाधव (रंगभूषा) यांनी आपली कामगिरी चोख बजावली आहे. थोडक्यात, एक चांगली कल्पना नीट फुलवली न गेल्याने मनोरंजनात उणावली आहे.