हॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट ‘वंडर वुमन’मधील लोकप्रिय अभिनेत्री गॅल गॅडोट ही इस्रायलची रहिवासी आहे. पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना हमासने ऑक्टोबरमध्ये इस्रायलवर हल्ला केला तेव्हा गॅल गॅडोटही प्रचंड अस्वस्थ झाली. तिने सोशल मीडियावर याबद्दल उघडपणे भाष्य केले, यामुळे ती बऱ्याचदा ट्रोलसुद्धा झाली अन् टिकाकारांच्या निशाण्यावर आली होती.
आता नुकतंच तिने अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे ‘हमास अटॅक’ या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित केले होते, त्यानंतर चित्रपटगृहाबाहेर हाणामारीला सुरुवात झाली आणि हा गोंधळ पाहून त्या चित्रपटाचे स्क्रीनिंग तातडीने थांबवण्यात आले. एबीसी न्यूजच्या रिपोर्टनुसार, ‘बेअरिंग विटनेस’ नावाचा हा चित्रपट ४३ मिनिटांचा असून यात हमासने केलेले अत्याचार दाखवण्यात आले आहेत. मीडिया रीपोर्टनुसार त्यात काही हमास सदस्यांनी शूट केलेले फुटेज देखील समाविष्ट करण्यात आले होते.
आणखी वाचा : ‘आदिपुरुष’चे लेखक मनोज मुंतशीर यांनी आपली चूक मान्य करत केलं मोठं वक्तव्य; म्हणाले, “दुसरी संधी…”
या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला २०० हून अधिक लोकांनी हजेरी लावली आणि स्क्रिनिंगदरम्यान सिनेमागृहाबाहेर गोंधळ सुरू झाला. सोशल मिडीयावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये लोक चांगलेच संतापलेले दिसत असून दोन गटांत हाणामारीदेखील होताना दिसत आहे. असं सांगितलं जात आहे की गॅल गॅडोटही या स्क्रीनिंगदरम्यान उपस्थित होती, परंतु अद्याप याची पुष्टी झालेली नाही. तरी सोशल मीडियावर तिच्या विरोधात लोक व्यक्त होताना दिसत आहेत.
या स्क्रीनिंगसाठी उच्च सुरक्षा तैनात करण्यात आली होती, शिवाय बरेच बडेबडे सैन्यातील अधिकारीही या स्क्रीनिंगदरम्यान उपस्थित होते. तरी एवढा मोठा गोंधळ निर्माण झाल्याने एकूणच वातावरण गढूळ झाल्याचं पाहायला मिळत आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत गॅल गडॉटकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही. अभिनयाच्या दुनियेत येण्यापूर्वी गॅल गॅडोटने इस्रायली संरक्षण दलात काम केले होते.