वास्तव आणि काल्पनिकता यांचे अभूतपूर्व मिश्रण असलेल्या ‘गेम ऑफ थ्रोन्स’चा अखेरचा भाग गेल्या रविवारी प्रदर्शित झाला. २०११ साली सुरू झालेल्या या महामालिकेने गेल्या नऊ वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासात तुफान लोकप्रियता व तितक्याच जबरदस्त टीकेचा सामनाही केला. अनपेक्षित कथानक व उत्कृष्ट अभिनयामुळे ‘गेम ऑफ थ्रोन्स’ नेहमीच चर्चेत राहिले. परंतु त्याचबरोबर हिंसाचार, नग्न दृश्ये व आक्षेपार्ह संबंध यामुळे त्यांच्यावर मोठय़ा प्रमाणावर टीकादेखील करण्यात आली. या बहुचर्चित मालिकेचा शेवट गेल्या आठवडय़ात झाला खरा, परंतु तरीही ‘गेम ऑफ थ्रोन्स’ प्रसारमाध्यमांच्या चर्चेतून काही बाहेर जाण्यास तयार नाही. या वेळी ही मालिका त्यातील कथानक किंवा कुठल्याही प्रकारच्या आक्षेपार्ह दृश्यांमुळे चर्चेत नाही तर त्यातील राजसिंहासनामुळे चर्चेत आहे. ‘गेम ऑफ थ्रोन्स’चे संपूर्ण कथानक राजसिंहासन म्हणजेच आर्यन थ्रोनभोवती फिरत होते. आणि आता या सिंहासनामुळे ही मालिका पुन्हा एकदा चर्चेत आहे.
या मालिकेतील सिंहासन रशियन सरकारने जप्त केले आहे. कुठल्याही देशात एखादी महागडी वस्तू नेल्यास त्यावर त्या देशाच्या नियमाप्रमाणे काही कर आकारला जातो. आणि हा कर न भरल्यास ती वस्तू तेथील प्रशासन जप्त करते. असाच काहीसा प्रकार ‘गेम ऑफ थ्रोन्स’मध्ये वापरल्या गेलेल्या सिंहासनाच्या बाबतीत घडला आहे. या सिंहासनाला आयर्न थ्रोन असे म्हटले जाते. लोखंडापासून तयार केलेल्या आयर्न थ्रोनची किंमत तब्बल ५ कोटी २० लाख रुपये आहे. इतके महागडे सिंहासन कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता रशियात आणले गेले. शिवाय त्यावर आकारला जाणारा कर भरण्यासही निर्मात्यांनी टाळाटाळ केली. परिणामी रशियन प्रशासनाने आयर्न थ्रोन जप्त केले आहे. रशियन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे सिंहासन अवैधरीत्या रशियात आणले गेले आहे. सध्या या सिंहासनाला एका गुप्त जागी ठेवण्यात आले आहे. जोपर्यंत मालिकेचे निर्माते आकारण्यात आलेला कर भरत नाही तोपर्यंत हे सिंहासन रशियन सरकारच्या ताब्यात राहील. आणि जर निर्मात्यांनी कर भरण्यास नकार दिला तर सिंहासनाचा लिलाव करून कराची रक्कम भरून काढली जाईल, असे या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. यावर प्रतिक्रिया देताना ‘गेम ऑफ थ्रोन्स’चे निर्माते डेव्हिड बेनिऑफ यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या मते सर्व प्रकारच्या परवानग्या घेऊ नच सिंहासन रशियात आणले गेले होते. मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित झाल्यानंतर सिंहासन जप्त केले आहे. त्यामुळे झाल्या प्रकाराचा मालिकेवर कुठल्याच प्रकारे फरक पडलेला नाही. तसेच हे सिंहासन रशियन चाहत्यांच्या मागणीखातर सेंट पीटर्सबर्ग येथे आणले गेले होते. तेथील चाहत्यांना सिंहासनाबरोबर फोटो काढायचे होते. फोटो काढण्याचा कार्यक्रम संपल्यानंतर त्या सिंहासनाला परत अमेरिकेत पाठवले जाणार होते, परंतु रशियन प्रशासनाने कुठल्याही प्रकारची आगाऊ सूचना न देता सिंहासन जप्त केल्यामुळे ते नाराज आहेत.
सिंहासन जप्त केल्यानंतर शेवटचा भाग कसा प्रसारित होणार, असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला होता. परंतु चित्रीकरण पूर्ण झाल्यामुळे याचा मालिकेवर अजिबात परिणाम झालेला नाही. ही मालिकेच्या चाहत्यांसाठी दिलासा देणारी गोष्ट आहे. मात्र इतक्या लोकप्रिय मालिकेचा तितकाच महत्त्वाचा भाग असलेल्या आयर्न
थ्रोनचे पुढे काय होणार?, हा प्रश्न चाहत्यांनाही सतावतो आहे. ‘गेम ऑफ थ्रोन्स’चे निर्माते रशियन प्रशासनाला अपेक्षित प्रतिसाद देत नसल्यामुळे या वादाला आता आणखीन कुठले वळण लागणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.