गणपतीला बुद्दीचा देवता असं म्हटलं जातं. त्यामुळे अनेकवेळा स्पर्धा, परीक्षा किंवा कोणत्याही महत्वाच्या कामांना जातांना आपले हात आपोआप त्याच्या चरणी जोडले जातात. अनेक जणांची तर बाप्पावर अपार श्रद्धा असते. खासकरुन चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार या देवतेचे भक्त असल्याचं पाहायला मिळतं. त्यातल्याच एका अभिनेत्याने बाप्पाविषयी त्याचं मत व्यक्त केलं आहे.
मराठी चित्रपटसृष्टीमध्ये मालिका, चित्रपट, नाटक अशा विविध ठिकाणी आपल्या अभिनयाची चुणूक दाखविणाऱ्या अभिनेता शेखर फडकेकडे आज एक नावाजलेला अभिनेता म्हणून पाहिलं जातं. विशेष म्हणजे शेअरने त्याच्या या यशाचं श्रेय गणपती बाप्पाला दिलं आहे.
‘मी वयाने किती मोठा झालो,तरी गणपतीला कधीही गणपती असं न संबोधता लाडाने बाप्पा असंच म्हणतो. बाप्पा म्हटलं की एक आपुलकी, माया त्यातून झळकत असते. मी त्याला केवळ देव मानत नाही तर माझे आई-वडील सारं त्यालाच मानतो. हा कदाचित मी बाप्पा म्हटल्यावर अनेकांना हसू येईल ते मला लहान समजतील. पण असू देत मी माझ्या बाप्पासाठी कायम लहानच असेन, असं शेखर म्हणाला.
पुढे तो असंही म्हणाला, गणेशोत्सवानिमित्त मी आज एक गुपित साऱ्यांना सांगणार आहे. जेवढी माझी बाप्पावर भक्ती तेवढीच माझ्या कुटुंबीयांचीही. त्यामुळेच त्यांनी माझं पाळण्यातलं नावदेखील त्या बाप्पावरुन मोरेश्वर असं ठेवलं. इतकंच नाही माझ्या अभिनयाची सुरुवातही गणेशामुळेच झाली. आमच्या सोसायटीमध्ये गणपती बसतो. यावेळी पाच दिवस काही ना काही कार्यक्रम चालायचे. यावेळी मी भाग घ्यायचो. त्यातूनच मला स्टेजडेरिंग आलं आणि त्यातूनच माझ्यातला अभिनेता उदयाला आला.