आमच्या गावच्या घरी म्हणजे मुरुंड जंजिरात गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. दहा दिवस घरी खूप धम्माल असते. टिपीकल कोकणी पद्धतीने आमच्याकडे गणपतीचा सण साजरा केला जातो. मुंबईसारखा इथे गोंगाट नसतो. खूप शांततेत इथे सर्व पार पडतं. हे दहा दिवस कामातून वेळ काढून शक्यतो सगळे एकत्र राहण्याचा प्रयत्न करतो. पण, सध्या कामातून दहा दिवस वेळ काढणं शक्य होत नाही. त्यामुळे जे काही दिवस मिळतील ते एकत्र राहून मजामस्ती, गप्पा मारण्यात घालवतो. याच निमित्ताने सर्व नातेवाईकांचीही भेट होते. गावात प्रत्येकाच्या घरी समूह आरती करण्याचा रिवाज आहे. एकाच्या घरी आरती झाली की सगळे मग बाकीच्यांच्या घरी जाऊन आरती करतात. यावेळी वेगवेगळी भजनंसुद्धा म्हटली जातात. त्यामुळे सगळीकडे प्रसन्न वातावरण पाहायला मिळतं.
लहानपणापासूनचं मला गणपतीचा नैवेद्य करण्याची आवड. वालाचं भीरड, ऋषिची भाजी, मोदक यांचा नैवेद्यात विशेष करून सहभाग असतो. लहान असल्यामुळे स्वयंपाक घरात कोणी फिरकूसुद्धा द्यायचं नाही. अंगणात खेळायला जा म्हणायचे. पण, आता सगळे आवर्जून म्हणतात, स्वयंपाकात मदत कर. खासकरून तर मोदक करण्यासाठी. बाकीचा नैवेद्य तर पटकन आटोपताही येतो. मात्र, मोदक करण्यासाठी चार-पाचजणींना बसावेच लागते. मोदक केल्यानंतर कोणाचा मोदक चांगला झाला आहे, कोणाचा वाकडा हे तर आम्ही खासकरून बघतो. तेव्हा खूप मज्जाच येते. लहान असताना माझी चुलत बहीण आणि मी खूप फुगड्या घालायचो. तेव्हा, आमच्या फुगड्या बघून माझी आजी आमच्या हातावर दोन-दोन रुपये ठेवायची. त्याचं फार अप्रूप वाटायचं आम्हाला. आता ते दिवस राहिले नाहीत पण त्या आठवणी मात्र अजून तशाच मनात आहेत. गावी कोळीवाड्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. लहान असताना आम्ही सर्व भावंडे मिळून संपूर्ण दिवस गणपती बघण्यातचं घालवायचो. तेव्हा हातावर साखर-फुटाणे प्रसाद म्हणून द्यायचे. आता लहानपणीसारखं सगळीकडे जाता येत नाही पण जितका वेळ बाप्पासोबत घालवता येईल, तितका वेळ घालवण्याचा नक्कीच प्रयत्न असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा