चौदा विद्या, चौसष्ठ कलांचा अधिपती आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणार्या गणपती बाप्पाचं यंदा घरोघरी दणक्यात स्वागत झालं. मात्र सध्या देशावर करोनाचं संकट असल्यामुळे दरवर्षी असणारा जल्लोष, मिरवणुका हे पाहायला मिळालं नाही. परंतु, तरीदेखील बाप्पा आल्यामुळे सगळीकडे चैतन्याचं आणि आनंदाचं वातावरण पसरलं आहे. तसंच सध्या सगळेच जण देशावर ओढावलेलं संकट दूर कर ही एकच प्रार्थना बाप्पाकडे करत आहेत. यामध्ये कलर्स मराठीवर लवकरच ‘बाप्पा मोरया रे’ या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक कलाकार बाप्पाचं नामस्मरण करुन त्याला वंदन करणार आहेत. तसंच त्यांच्या खास शैलीमध्ये देशावरील संकट दूर कर यासाठी गणरायाला साकडंदेखील घालणार आहेत.
‘बाप्पा मोरया रे’ या कार्यक्रमात सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमातील सूरवीर त्यांच्या खास शैलीत बाप्पावर आधारित गाण्यांचं सादरीकरण करणार आहेत. तर अनेक नृत्यप्रकारांचं सादरीकरण होणार आहे.
दरम्यान, या कार्यक्रमात अभिनेत्री मृणाल दुसानीस, शशांक केतकर, अशोक फळदेसाई, विदुला चौघुले, मनिराज पवार, शिवानी सोनार, सुमित पुसावळे, ऐश्वर्या नारकर, रेवती लेले, अमोल बावडेकर ही कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत. हा कार्यक्रम कलर्स मराठीवर ३० ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ वाजता रंगणार आहे.