गणेशोत्सव हा सण देशभरात धुमधडाक्यात साजरा केला जातो. येत्या बुधवारी ३१ ऑगस्टला गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर गणरायाचे आगमन होणार आहे. करोना संकट ओसरल्यानंतर पुन्हा जोशात साजरा होणार आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाची तयारी सुरू आहे. सामान्यांपासून ते मोठमोठ्या सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण बाप्पाच्या आगमनासाठी आतुर झाले आहेत.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी-कुंद्रा आणि तिचा नवरा राज कुंद्रा दोघेही गणेशभक्त आहेत. त्यांच्या घरी दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. गेल्या १२ वर्षांपासून शिल्पा घरी गणपती बाप्पाची लहान मूर्ती आणून त्या मूर्तीची पूजा करते. तिच्याकडे दिड दिवसाचे बाप्पा विराजमान होतात. शिल्पा शेट्टीच्या घरच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला अनेक सेलिब्रिटी येत असतात. दरवर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी तिच्या घरी प्रसादाचा निवैद्य तयार होतो. त्यातले काही पदार्थ शिल्पा स्वत: तयार करते. दुसऱ्या दिवशी राज, शिल्पा आणि त्याच्या घरातील सर्व सदस्य मिळून घराच्या मागे बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करतात.
काही दिवसांपूर्वी एका सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान शिल्पा शेट्टीच्या पायाला दुखापत झाली. सेटवर झालेल्या अपघातामुळे तिचा डावा पाय फ्रॅक्चर झाला. डॉक्टरांनी शिल्पाला सहा आठवडे आराम करायला सांगितले आहे. दरवर्षी ती आणि राज दोघे मिळून कारखान्यात जाऊन बाप्पाची मूर्ती घेऊन येतात. मात्र यंदा पायाला फ्रॅक्चर असल्यामुळे शिल्पाला मूर्ती आणण्यासाठी घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे. त्यामुळे राज कुंद्राला एकट्यानेच बाप्पाची मूर्ती घरी आणावी लागली.
आणखी वाचा-शिल्पा शेट्टीचा मुलगा वयाच्या १० व्या वर्षीच झाला बिझनेसमन, करतोय अनोखा व्यवसाय
राज कुंद्राचा गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो गाडीतून उतरुन गणपती कारखान्यात जाताना दिसत आहे. राज कुंद्रा मूर्ती घरी नेण्याआधी करायचे सर्व विधी पार पाडून बाप्पाची इको फ्रेंडली मूर्ती सोबत घेऊन जाताना दिसतोय. पांढऱ्या रंगाचे स्वेटशर्ट आणि जीन्स अशा लूकमध्ये तो दिसला. त्यासोबत त्याने चेहऱ्यावर भलेमोठ्या आकाराचे मास्क लावले आहे. मात्र यामुळे लोक त्याला पुन्हा एकदा ट्रोल करत आहेत.