संजय लीला भन्साळी म्हटलं की भव्य दिव्य सेट्स, उत्तम दिग्दर्शन, तगडी स्टार कास्ट या सर्वच गोष्टी डोळ्यासमोर येतात. अर्थात गंगूबाई काठियावाडी चित्रपट प्रदर्शित झाला आणि याचा प्रत्यय पुन्हा आला. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट या ना त्या कारणानं सातत्यानं चर्चेत होता. चित्रपटाचं नाव, चित्रपटात दाखवण्यात आलेला कामाठीपुरा हा भाग यावरून बरेच वाद देखील झाले. पण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आलिया भट्टच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. चित्रपटातील दमदार संवादांनी तर प्रेक्षकांवर वेगळाच प्रभाव पाडला आहे.

‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाची कथा आहे ती गंगा जगजीवनदास काठियावाड (आलिया भट्ट) या मुलीची. जिचं मुंबईला जाऊन अभिनेत्री होण्याचं स्वप्न असतं. पण आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलंय याची पुसटशी कल्पनाही तिला नसते. गंगा ते कामाठीपुराची गंगूबाई काठियावडी या संपूर्ण संघर्षाची ही कथा आलियानं मोठ्या पडद्यावर साकारली आहे. अभिनेत्री होण्याचं स्वप्न पाहणारी गंगा ही रमणीकच्या प्रेमात पडते. तिचं अभिनेत्री होण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचं आश्वासन देऊन तो तिला मुंबईला आणतो. पण मुंबईत आल्यावर तो गंगाला कामाठीपुरामधील एका कोठ्यावर तिला विकून टाकतो आणि तिथून सुरू होतो तिच्या संघर्षाचा प्रवास…

आणखी वाचा- कौटुंबीक हिंसाचार प्रकरणात टेनिसपटू लिएंडर पेस दोषी, एक्स गर्लफ्रेंडला भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश

आलिया भट्टनं या अगोदर अशाप्रकारची भूमिका साकरलेली नाही. नेहमीच बोलकी, नटखट, थोडीशी मस्तखोर अशा अवतारात दिसलेली आलिया या चित्रपटात गंगूबाई काठियावाडी यांची दमदार भूमिका साकारताना दिसत आहे. आलियानं या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत तिच्या अभिनयात दिसून येतेय. यासोबत चित्रपटातील बरेचसे संवाद प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाहीत. गंगा ते गंगूबाई काठियावाडी हा तिने साकारलेला प्रवास अतिशय रंजक आहे. बराच संघर्ष केल्यानंतर लोकांकडून मिळालेलं प्रेम आणि संघर्षाची ही कथा मनाला स्पर्शून जाते. कामाठीपुराच्या रेड लाइट भागातील मुलांच्या हक्कांसाठी त्यांनी दिलेला लढा आणि त्यात त्यांना मिळालेलं यश या सर्वच गोष्टी मोठ्या पडद्यावर आलियानं उत्तम साकारल्या आहेत.

आलिया भट्ट व्यतिरिक्त या चित्रपटात अभिनेता अजय देवगणची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या काही मिनिटांच्या भूमिकेसाठी अजयनं तगडं मानधन देखील घेतलंय. या चित्रपटात त्यांनी माफिया डॉन करीम लाला यांची भूमिका साकारली आहे. अजयनं या भूमिकेला न्याय दिलाय असं म्हणायला हरकत नाही. याशिवाय अभिनेता शांतनू माहेश्वरीचा बॉलिवूड डेब्यू दमदार राहिला. थोडासा लाजरा पण गंगूबाईच्या प्रेमात आकंठ बुडालेला ‘अफसान’ त्यानं उत्तम साकारला आहे. याशिवाय अभिनेता विजय राजची भूमिका लहान असली तरीही त्या भूमिकेत तो अगदी व्यवस्थित बसलाय. त्याचं या चित्रपटात रजियाबाई नामक एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली आहे. ज्याची बरीच चर्चा होताना दिसतेय.

आणखी वाचा- कथित गर्लफ्रेंड सबा आझादसाठी हृतिक रोशनची पहिली पोस्ट, म्हणाला…

संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनाबाबत बोलायचं तर त्यांनी पहिल्यांदा बायोपिक तयार केला आहे. नेहमीच आपल्या उत्तम दिग्दर्शनासाठी ओळखले जाणारे भन्साळी या चित्रपटाच्या बाबतीत मात्र काही ठिकाणी कमी पडल्यासारखं वाटतं. गंगूबाई होण्यापूर्वीचं गंगाचं आयुष्य थोड्या विस्तारानं दाखवता आलं असतं. पण एका वेश्येचं आयुष्य, तिची दुःखं, समाजात तिला मिळणारी वागणूक आणि संघर्ष या सर्वच गोष्टी यांनी उत्तम हाताळल्या आहेत. याशिवाय रमणीक आणि गंगा यांची लव्हस्टोरी कुठेतरी तुटक असल्यासारखी वाटते. या व्यतिरिक्त पार्श्वसंगीत, गाणी, नृत्य या सर्वच बाबतीत चित्रपट दमदार वाटतो. विशेषता ‘ढोलिडा’ आणि ‘जब सैय्या’ यासारखी गाणी प्रेक्षकांना भावतात.

Story img Loader