मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर ‘जब सैंया’ आणि ‘ढोलिडा’ ही दोन गाणी रिलीज झाली होती. त्यानंतर आता या चित्रपटाचं नवं गाणं ‘मेरी जान’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे गाणं प्रदर्शनानंतर लगेचच सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे कारण या गाण्यात आलिया भट्ट आणि शांतनू माहेश्वरी यांचा कारमधील रोमान्स चित्रत करण्यात आला आहे. ज्याची सर्वाधिक चर्चा होताना दिसत आहे.
‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटातील ‘मेरी जान’ या गाण्यात गंगूबाई यांच्या आयुष्याची दुसरी बाजू दाखवण्यात आली आहे. गाण्यात कारच्या बॅक सीटवर बसलेली आलिया तिचा प्रेमी अफसान म्हणजेच शांतनूसोबत प्रेमाचे क्षण व्यतित करताना दिसत आहे. दातांमध्ये गुलाब पकडून ती शांतनूला किस करण्यासाठी प्रवृत्त करते. जेव्हा तो तिला किस करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मात्र ती चिडते आणि त्याच्या कानाखाली मारते. पण त्यानंतर ती त्याचा राग शांतही करते. या गाण्यात आलिया आणि शांतनू यांच्यातील प्रेमळ रुसवा- फुगवा आणि भांडणाची झलक दाखवण्यात आली आहे. ज्याला गायिका निती मोहनचा रेट्रो टच असलेला आवाज परफेक्ट वाटतो.
मुंबईतील माफियांच्या टोळीत असलेल्या गंगूबाईचा बेधडक स्वभाव आणि तिच्या आयुष्यातील अनेक टप्पे ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटात दाखवण्यात येणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केलं आहे. अगदी कमी वयात स्वतःच्या नवऱ्यानंच कमाठीपुरामधील एका कोठ्यावर विकल्यानंतर अनेक संघर्ष करत गंगूबाई तिथल्या माफिया क्वीन कशा झाल्या, याची कथा आता मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. हा चित्रपट २५ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटात आलिया भट्ट व्यतिरिक्त अभिनेता अजय देवगणचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. अजय देवगण या चित्रपटात करीम लालाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेता शांतनू माहेश्वरीच्या भूमिकेचं नाव ‘अफसान’ असं आहे. याशिवाय अभिनेता विजय राज देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.