मनिषा केळकर- माझ्या वरऴीच्या घरात गौरीसह गणपती येतो व अर्थातच ते चार-पाच दिवस घरात सगळी प्रचंड मंगलमय व उत्साहाचे वातावरण असते. माझे बाबा (पटकथाकार राम केळकर) आणि आई यांनी घरी गणपती आणणे सुरू करण्यामागे काही भावनिक कारणे आहेत, आपल्यास मुलगी हवी म्हणून त्यांनी घरी गणपती आणायला सुरूवात केली. तेव्हा माझा जन्म झाला, तर आपल्याला चांगली सून हवी अर्थात माझ्या भावास चांगली बायको हवी म्हणून घरी गौरी पुजन सुरू झाले. विशेष म्हणजे या दोन्ही गोष्टी पूर्ण झाल्या. त्यामुळे तर अधिकच उत्साहाने आमच्या घरी हा सोहळा पूर्ण होतो. आमच्या घरच्या गौरीला औसायला येणाऱया बऱयाच स्त्रियांची प्रामाणिक भावना अशी की, आमची गौरी नवसाला पावते. हे ऐकल्यावर तर, आमचा पूजेतला आनंद आणखी वाढायला लागतो. पूर्वी बाबा असताना आमच्या घरी गणपतीच्या दिवसात दुपारी व रात्री अशा दोन्ही दिवशी ‘पंगत’ असे, तर बाबांसोबत आम्ही तेव्हा गिरगाव, लालबाग, मग पुणे येथे सार्वजनिक गणपती पहावयास जायचो.
बाबांची आज खूप-खूप आठवण येते. आमचे घर रस्त्यावर असल्याने तर ‘अनोळखी’ माणसेदेखील आमच्या घरी गणपती दर्शनाला येतात.
गिरीजा जोशी- माझ्या काकांच्या पार्ल्याच्या घरी पाच दिवसाचा गणपती येतो व मी कुठे चित्रीकरणात मग्न नसले तर, अगदी निश्चितपणे तेथे जाते. तेव्हा त्यानिमित्ताने आलेले बरचसे नातेवाईक- मित्रमैत्रिणी भेटतात. बऱयाच गोष्टी कळतात. त्याला मी जरा जास्त महत्व देते. अन्यथा मला व्यक्तीश: मूर्तीपूजा आवडत नाही. पण इतरांच्या श्रद्धा व भावना यांचा मात्र पूरेपूर आदर ठेवते. जे सण-व्रत वगैरे वर्षानुवर्षे सुरू आहे. ते तसेच पुढे सुरू राहणे स्वाभाविक असले तरी आपण गणपती-दिवाळी हे सण अत्यंत शांतपणे देखील साजरे करू शकतो. खरं तर त्याचीच जास्त गरज आहे. खरं तर दहा दिवसाच्या गणेशोत्सवाच्या धूमशान काळात आपण आवाज, हवा, वायू यांचे किती प्रमाणात प्रदुषण करतो याची खुद्द आपल्यालाच कल्पना नाही. दुर्देवाने कोणी सामाजिक नेता व राजकीय नेता त्याची कल्पना देखील देत नाही. मला वाटते, या प्रथांबाबत आपण थोडसं गंभीर व्हायलाच हवे. अन्यथा सण-उत्सवाच्या उत्साहात आपण निसर्गाशी खेळतोय तो निसर्ग एके दिवशी आपला रुद्रावतार दाखवेल तेव्हा दुर्देवाने उशीर झालेला असेल. मी निसर्गाला देव मानते. गणेश विसर्जनाच्या ढोल-ताशांच्या गजरात त्या निसर्गाला विसरू नका इतकेच.
किशोरी शहाणे- माझा गणेशोत्सव आठवणीतला आहे. तसाच मी लोकप्रिय झाल्यानंतरचाही आहे. अंधेरीच्या महाकाली विभागातील माझ्या माहेरी म्हणजे लहाणपणाच्या घरी पूर्वी पाच दिवसाचा गणपती येई व आम्ही सगळी भावंडे त्यासाठीची आरस, पूजेची तयारी, महाआरती यात प्रचंड आनंदाने सहभागी होत असू. अर्थात, सर्वसाधारण घरा-सारखेच ते वातावरण असे विशेषत: परीक्षांच्या बाबतीत या देवाकडे माझे कायम, ‘मला भरपूर गुण दे रे देवा’ असे गाऱहाणे असे. प्रत्येक वर्षी त्या ऐक्क्यात वाढदेखील व्हायची म्हणून तर कधी बरे एकदा घरी गणपती येतो आहे व त्याच्याकडे गुणांची मी मागणी करते आहे. असे व्हायचे. सध्या काही कारणास्तव त्या घरी गणपती आणणे थोडं थांबवले आहे. लग्नानंतर जुहूच्या आनंद नगरामध्ये राहायला आले. तेव्हा सोसायटीच्या गणपतीत दीपकजी व मी विशेष रस घेवू लागलो. महत्वाचे म्हणजे, मराठी चित्रपट व मालिका यांच्यातील काही सहकारी कलाकारांना मी आवर्जून बोलावू लागले. त्यामुळे लक्ष्मीकांत बेर्डेपासून अनेक कलाकार येथे येवून गेले. सार्वजनिक गणेशोत्सवांचा गणपती पहायला जाण्याची मला प्रचंड हौस आहे. त्यामुळे लालबागच्या राजांपासून बरेच मोठे गणपती पाहणे होते.
सई लोकूर- मी मूळची बेळगावची. आमच्या बेळगावातही घरगुती गणपतीपासून सार्वजनिक गणेशोत्सवापर्यंत गणेशपूजन होते. आमच्या घरचा गणपती माझ्या काकांच्या बंगल्यात येतो, आमच्या बंगल्याच्या शेजारीच त्यांचा बंगला आहे. व मी माझी मुंबई-पुणे येथील चित्रीकरणाची सर्व कामे बाजूला ठेवून आमच्या या पाच दिवसांच्या गणपतीसाठी बेळगावला पळते. मी खूप पारंपारिक वळणाची व श्रद्धावादी आहे. मला गणपती पूजा खूपच महत्वाची वाटते. अर्थात, चित्रपटांतून मी गॅमरस रुपात दिसते. हे कामाचा भाग झाला. मनातील श्रद्धा यापेक्षा महत्वाची! गणपती मला नेहमीच सकारात्मक ऊर्जा देतो. वर्षभर आपण सतत बऱया-वाईट अनुभवांतून जात असतो. त्यातील वाईट अनुभव आपल्या मनाला टोचत असतात, ते या गणपती पूजनाने बाजूला पडतात व पुढचे काही दिवस खूपच छान जातात. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीबाबत सांगायचे तर, मुंबईतला रोंबा-सोंबा धटींगपणा मला अजिबात आवडत नाही, त्यात कुठेही श्रद्धेच स्थान दिसत नाही. पुणे शहरातील विसर्जन मिरवणुका अधिक शिस्तबद्ध व परंपरा जपणाऱया असतात. या सणाचे महत्व व भाविकता जपणे गरजेचे आहे.
शीतल पाठक- माझ्या नवीन मुंबईतील बेलापूर येथील घरी पाच दिवसाचा श्रीगणेशाचा उत्साह असतो. या दिवसांत शक्यतो एकही चित्रीकरण असू नये. याकडे माझे प्रत्येक वर्षी लक्ष असते. आतापर्यंत त्यात कोणताही अडथळा आलेला नाही. पण, नेमकी याच वर्षी थोडी अडचण आली असून नेमके काय करावे याची मला थोडी चिंता आहे. मराठी चित्रपटाची निर्मिती वाढलीय व मी हिंदी चित्रपटातूनही भूमिका साकारत आहे. त्यामुळे यंदाच्या गणपतीच्या दिवसात मला कामासाठी घराबाहेर पडावे लागणार आहे. पण आपले काम हीच आपली देवपूजा आहे. असे आपण मानावे. गणपतीच्या दिवसात आपल्या घरचे मंगलमय वातावरण सुखकारक ठरते व त्या दिवसात आपल्या घरी येणारे मित्रमंडळी व कुटुंबिय या साऱयामुळे खूप मानसिक सुख मिळते. पुढील वाटचालीसाठी भरपूर उर्जा देण्याचे सामर्थ्य या सणांत आहे. आमच्या घरी या पाचही दिवशी आम्ही विविध प्रकारचा नैवेद्य गणेशाला दाखवतो. सार्वजनिक गणेशोत्सवातील गणपती दर्शनाला मी आवर्जून जाते. पण अजून लालबागचा राजा पाहू शकलेले नाही. तो योग मात्र लवकरच यावा.
कलाकारांच्या घरी गणपती
माझ्या वरऴीच्या घरात गौरीसह गणपती येतो व अर्थातच ते चार-पाच दिवस घरात सगळी प्रचंड मंगलमय व उत्साहाचे वातावरण असते.
आणखी वाचा
First published on: 09-09-2013 at 02:47 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganpati at acress house