श्रीगणेशांना भेटायला आले त्यांचे आजी आजोबा
पृथ्वीलोकावरील दैत्यांचा संहार करण्यासाठी आणि एका भक्ताची देवमाता होण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी श्री गणेशांनी कश्यप पत्नी अदिती यांच्या पोटी महोत्कट रुपात जन्म घेतला. आपलं त्या जन्मातलं अवतारकार्य संपवून श्रीगणेश स्वस्थानी म्हणजेच कैलासावर परतही गेले. परंतु काही कारणास्तव आदिशक्तीला मात्र भूलोकावरच वास्तव्य करणं भाग होतं. अशात श्रीगणेशांना शिवालयात एक सुखद आणि अनपेक्षित धक्का मिळाला. त्यांचे आजोबा हिमालय आणि आजी मैनावती सर्वांच कुशल जाणून घ्यायला शिवालयात आलेले आहेत. आपली कन्या पार्वती हिच्या अनुपस्थितीत महाराणी मैनावती श्रीगणेशांना आजीची माया तर देतीलच परंतु त्यांनी शिवालयात पाऊल टाकता क्षणीच एक नवीन पवित्रा घेतलाय. त्यांनी शिवालयाचा ताबाच घेतला आहे जणू. मात्र ही नवी व्यवस्था केवळ त्रासदायक ठरणार आहे का? की पार्वती महादेव आणि श्रीगणेशांच्या आयुष्यावरही त्याचे पडसाद उमटणार आहेत ? हे लवकरच गणपती बाप्पा मोरया मालिकेच्या कथानकात पाहावयास मिळणार आहे. ही मालिका कलर्स मराठी वाहिनीवर लागते.
दरम्यान, निश्चलनीकरणाचे बरेवाईट परिणाम अनुभवत रोजच्या मालिकांचे दळण दळणाऱ्या वाहिन्यांना त्याच्या नवनवीन परिणामांना तोंड द्यावे लागत आहे. नोटाबंदीमुळे वाहिन्यांवरच्या जाहिरातींचा ओघ कमी झाला आहे. त्यामुळे एक तर मालिकांची लांबी वाढवा, नाही तर आपल्याच कार्यक्रमांची प्रसिद्धी वाढवा, असे पर्याय वाहिन्यांकडून अजमावले जात आहेत. दिवसभराच्या चित्रीकरणानंतर केवळ २० ते २३ मिनिटांचे वापरण्याजोगे ‘फुटेज’ हाती लागत असल्याने मालिकांची वाढलेली लांबी ‘भरणे’ निर्मात्यांकरिता मात्र डोकेदुखीचे ठरते आहे. निश्चलनीकरणाचा कमी-अधिक परिणाम सर्वसामान्यांप्रमाणेच मालिकांचे निर्माते आणि पर्यायाने वाहिन्यांनाही जाणवतो आहे.
दिवसभराच्या चित्रीकरणानंतर निर्मात्यांना मालिकेच्या दैनंदिन भागासाठी साधारणत: २० ते २३ मिनिटांचे फुटेज सापडते. जाहिराती अचानक कमी झाल्याने एपिसोडची लांबी वाढवण्याचे वाहिनीकडून सांगण्यात आले आहे. पण हा जो वाढीव चित्रित झालेला भाग आहे त्यासाठीचे वेगळे शुल्क आम्हाला देण्यात येणार की नाही, याचे चित्र स्पष्ट नाही. त्यामुळे आमच्यासाठी ते नुकसानच आहे. शिवाय, सर्वसामान्यपणे दीड दिवसाचे आमचे चित्रीकरण आम्ही करतो तोही वेळ वाढणार हे साहजिक आहे, असे ‘गणपती बाप्पा मोरया’ या मालिकेचे निर्माते महेश कोठारे यांनी सांगितले होते.